इस्रायली संरक्षणमंत्र्यांचा युद्ध थांबवण्यास विरोध
नेतान्याहू सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायल आणि हमास यांच्यात झालेला युद्धबंदीचा करार ही एक मोठी उपलब्धी मानली जात असतानाच युद्धविराम करण्याला इस्रायलच्या काही मंत्र्यांचा विरोध असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. ओलिसांच्या सुटकेसाठी हमाससोबत वाटाघाटी करणाऱ्या पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सरकारला अंतर्गत दबावाचा सामना करावा लागत आहे. इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनीच युद्ध थांबवण्यास विरोध दर्शवताना सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी दिल्याने नेत्यानाहू यांच्यासमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
सद्यस्थितीत इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या करारानुसार हमास पुढील सहा आठवड्यात 33 ओलिसांना सोडेल, तर इस्रायल शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांना मुक्त करेल. हा करार दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात ओलिसांच्या सुटकेसाठी वाटाघाटी केल्या जातील. तर दुसऱ्या टप्प्यात पुरुष सैनिकांसह उर्वरित ओलिसांच्या सुटकेसाठी वाटाघाटी केल्या जातील. या कराराबाबत त्यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांनी देश फिलाडेल्फिया कॉरिडॉरमधून माघार घेतल्यास राजीनामा देण्याची धमकी दिली आहे.