इस्रायली सेनेचा ‘राफा’ला वेढा
वृत्तसंस्था / जेरुसलेम
गाझा पट्टीच्या महत्वाच्या राफा विभागाला इस्रायली सेनेने वेढा दिला आहे. गाझा पट्टीचा रिक्त झालेला जास्तीत जास्त भाग ताब्यात घेणे, हा इस्रालयचा हेतू असून अमेरिकेचाही याकामी इस्रायलला पाठिंबा आहे. गाझा पट्टीतून लोकांना बाहेर काढण्याचे अभियानही सध्या इस्रायलने हाती घेतल्याची माहिती दिली गेली.
गाझा पट्टीतील लोकांनी बाहेर पडावे, असे आवाहन इस्रायली सेनेकडून वारंवार केले जात आहे. 18 मार्चला इस्रायली सेनेने गाझातील राफा भागात पुन्हा कारवाईचा प्रारंभ केला होता. या कारवाईत मोठे यश प्राप्त केल्याचे प्रतिपादन इस्रायली सेनेने पेले आहे. हमासचा प्रतिकार मोडून काढण्यात आमची सेना यशस्वी ठरली असून लवकरच गाझा पट्टीचा मोठा भाग आमच्या हाती येईल. नंतर या भागाची पुनर्बांधणी करण्यात येईल, असे वक्तव्य सेनेच्या प्रवक्त्याने केले.
आक्रमणात वाढ करणार
गाझा पट्टीत आपले नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी इस्रायल आपल्या कारवाईची कक्षा विस्तारित करणार आहे. राफा भागावर इस्रायलचे विशेष लक्ष आहे. हा भाग गाझा पट्टीच्या दक्षिणेच्या टोकाला असून तो इजिप्त या देशाला लागून आहे. याच भागातून इजिप्तचा इस्रायलशी गाझा पट्टीशी संपर्क होत असतो. हा 60 चौरस किलोमीटरचा भाग इस्रायलच्या हाती आल्यास संपूर्ण गाझापट्टीवर त्या देशाचे नियंत्रण होऊ शकते, अशी स्थिती आहे. इस्रायली सेनेने आपल्या 36 तुकड्या या भागात पाठविल्या असून हा भाग बराचसा रिकामा करण्यात आला आहे.
50 हजार पॅलेस्टाईनी ठार
7 ऑक्टोबर 2023 या दिवशी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात 1 हजार 200 ज्यूंचा बळी गेला होता, तर 251 जणांचे अपहरण करण्यात आले होते. या हल्ल्यामुळे इस्रायलने केलेल्या प्रतिहल्ल्यात आतापर्यंत 50 हजारांहून अधिक पॅलेस्टाईनींचा मृत्यू झाला आहे. आता इस्रायल संपूर्ण गाझा पट्टीच हस्तगत करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे.