इस्रायलच्या सैन्य प्रमुखांचा राजीनामा
हमासचा खात्मा न करता आल्याचे दु:ख
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायल आणि हमास यांच्यादरम्यान झालेल्या युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे कमांडर लेफ्टनंट जनरल हेरजी हालेवी यांनी स्वत:च्या पदाचा राजीनामा दिला आहे. युद्धविरामावरून ते दु:खी होते, असे समजते. हमासला पूर्णपणे संपविण्याचा संकल्प पूर्ण करता आलेले नाही, तसेच हमासचे हल्लेही रोखता आले नाहीत असे त्यांचे सांगणे आहे.
जोपर्यंत हमासचा पूर्णपणे खात्मा होत नाही तोपर्यंत युद्ध थांबणार नसल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी वारंवार म्हटले होते. तरीही रविवारपासून गाझामध्ये युद्धविराम लागू झाला आहे. यानंतर इस्रायल आणि हमास दोघांनीही स्वत:च्या ताब्यातील लोकांची मुक्तता केली आहे.
7 ऑक्टोबर रोजीचा हमासचा हल्ला न रोखता आल्याने मी अत्यंत दु:खी आहे. लवकरच मी एखाद्या सक्षम व्यक्तीकडे स्वत:ची जबाबदारी सोपविण्याचा विचार करणार असल्याचे हालेवी यांनी अलिकडेच सांगितले होते. 15 महिन्यांपूर्वी हमासने इस्रायलमध्ये हल्ले करत 1200 जणांची हत्या केली होती. तर 200 हून अधिक जणांचे अपहरण केले होते. तर इस्रायलने केलेल्या कारवाईत गाझापट्टीत 46 हजार जणांना जीव गमवावा लागला होता.
इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या युद्धविराम कराराच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात हमासकडून तीन महिला ओलिसांची मुक्तता करण्यात आली आहे. तर याच्या बदल्यात इस्रायलने 90 महिला कैद्यांची मुक्तता केली आहे. सध्या हमासने 33 ओलिसांची मुक्तता करण्याची तयारी दर्शविली आहे. 6 आठवड्यांच्या आत या ओलिसांना मुक्त केले जाणार आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्याचा करार होणार आहे. तर गाझापट्टीत सहाय्य सामग्री पोहोचविण्यासाठी ट्रक्सना अनुमती देण्यात आली आहे.