गाझामधील रुग्णालयांवर इस्रायली लष्कराची कारवाई
इंधनासह मूलभूत वस्तूंच्या कमतरतेमुळे 24 रुग्णांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ गाझा
गाझापट्टीतील सर्वात मोठ्या अल शिफा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन, इंधन आणि इतर मूलभूत वस्तूंच्या पुरवठ्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे तीन नवजात आणि इतर 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इंधनाचा पुरवठा कमी झाल्याने आरोग्य सेवांवर विपरित परिणाम झाला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील हिंसक संघर्षामुळे आतापर्यंत दोन्ही बाजूंचे 11 हजारांहून अधिक लोक मरण पावले आहेत.
इस्रायल आणि हमास यांच्यातील हिंसक संघर्षाच्या दरम्यान गाझा पट्टीमध्ये लढाई तीव्र झाली आहे. सुमारे 42 दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धात इस्रायलने हमासला नेस्तनाबूत करण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार केला आहे. इस्रायली सैन्याच्या योजना आणि पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या आक्रमक धोरणांमध्ये मानवतावादी संकट सतत वाढत आहे. अनेक देशांनी तात्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केल्यानंतरही संघर्ष सुरूच आहे. दक्षिण गाझासह हमासचे अस्तित्व असलेल्या कोणत्याही ठिकाणी हल्ला करण्याची तयारी इस्रायलने चालवली आहे. तेथे नागरिक आश्र्रय घेत असले तरीही कारवाई केली जात असल्यामुळे आतापर्यंत शेकडो लोकांचे बळी गेले आहेत.
7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यात 1400 इस्रायली मारले गेल्यानंतर इस्रायलने जमिनीवर हल्ला सुरू केला. 42 दिवसांच्या युद्धामध्ये अल शिफा हॉस्पिटल नवीनतम युद्धक्षेत्र बनले आहे. इस्रायली सैन्याने हमासचा नायनाट करण्यासाठी गाझामध्ये कारवाया सुरू ठेवल्या आहेत. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गाझाच्या सर्वात मोठ्या रुग्णालयातील ऑक्सिजन, इंधन आणि इतर मूलभूत वस्तूंचा साठा संपला आहे. तसेच या भागात इस्रायली सैन्य घुसल्यानंतर आता कोणतीही तमा न बाळगता कारवाई आणि इशारे दिले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. गेल्या 48 तासांत विविध विभागांतील 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे ठप्प झाली आहेत. इस्रायली सैनिकांनी शनिवारी तिसऱ्या दिवशी हॉस्पिटलची झडती घेतली.
इस्रायली संरक्षण दलाने हमासच्या बोगद्यांचे व्हिडिओ जारी केले आहेत. रुग्णालयाच्या आवारात बोगदे सापडले आहेत. आयडीएफने अल शिफामध्ये एका ओलिसाचा मृतदेह सापडल्याचा दावाही केला आहे. इस्रायलने कम्युनिकेशन ब्लॅकआउट समाप्त करण्यासाठी मर्यादित वितरणास परवानगी देण्याची अमेरिकेची विनंती स्वीकारली आहे. करारानंतर, इंधनाची पहिली खेप इजिप्तमधून गाझाला पाठवण्यात आली. आता दोन दिवसांपासून मदतीचा वेग मंदावला आहे.
सर्वसामान्यांसाठी नव्याने इशारा
उत्तर गाझावरील हल्ल्यानंतर इस्रायलने नव्याने इशारा दिला आहे. यामध्ये दक्षिण भागातील नागरिकांना स्थलांतर करण्यास व युद्धक्षेत्रात येण्याचे टाळण्यास सांगण्यात आले आहे. आम्ही लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगत आहोत. मला माहित आहे की ही प्रक्रिया त्यांच्यापैकी अनेकांसाठी सोपी नाही, परंतु आम्हाला क्रॉस फायरमध्ये अडकलेले नागरिक नको आहेत, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे सहाय्यक मार्क रेगेव यांनी सांगितले.