बैरूत विमानतळानजीक इस्रायलचे हवाई हल्ले
फ्रान्स अध्यक्षांकडून इस्रायलविरोधात वक्तव्य : नेतान्याहू यांनी दिले प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ बैरूत, जेरूसलेम
लेबनॉनमध्ये इस्रायलचे हल्ले आणि ग्राउंड ऑपरेशनदरम्यान इस्रायलच्या वायुदलाने बैरूत विमानतळानजीक हवाई हल्ले केले आहेत. दुसरीकडे लेबनॉनमधील लढाईवरून फ्रान्स आणि इस्रायलमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. फ्रान्सने आम्हाला साथ दिली नाही तरीही या युद्धात आम्ही विजयी होऊ शकतो. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅकॉन यांना स्वत:च्या वक्तव्याबद्दल लाज वाटली पाहिजे. इस्रायल दहशतवाद फैलावणाऱ्या हिजबुल्लाहशी लढत आहे. सर्व सुसंस्कृत देश इस्रायलच्या बाजूने उभे रहायला हवेत असे नेतान्याहू यांनी एक व्हिडिओ जारी करत म्हटले आहे.
गाझामध्ये लढाईसाठी इस्रायलला होणारा शस्त्रास्त्र पुरवठा रोखण्यात यावा. यानंतरच समस्येवर तोडगा काढण्यात यावा असे फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी म्हटले होते. नेतान्याहू यांनी प्रत्युत्तर दिल्यावर मॅक्रॉन यांच्या कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे. फ्रान्स इस्रायलचा पक्का मित्र आहे. इस्रायलच्या सुरक्षेचे फ्रान्स समर्थन करतो. इराण किंवा त्याच्या समर्थकाने हल्ला केला तर फ्रान्स नेहमीच इस्रायलसोबत उभा ठाकणार असल्याचे मॅक्रॉन यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.
हिजबुल्लाहच्या 440 सदस्यांचा मृत्यू
इस्रायलने हिजबुल्लाहचे अनेक कमांड सेंटर्स, शस्त्रास्त्र साठे, भुयार आणि तळांना नष्ट केले आहे. 30 सप्टेंबर रोजी लेबनॉनमध्ये ग्राउंड ऑपरेशन सुरू झाल्यापासून आतापर्यंत हिजबुल्लाहचे 440 सदस्य मारले गेल्याचे इस्रायल डिफेन्स फोर्सकडून सांगण्यात आले.
गाझामध्ये पुन्हा ऑपरेशन
इस्रायलच्या सैनिकांनी गाझामध्ये जबालियाला चहुबाजूने घेरले आहे. सैन्याने हमासच्या नव्या तळांना नष्ट करण्यासाठी पुन्हा ग्राउंड ऑपरेशन सुरू केले आहे. आयडीएफने जबालियात दाखल होणाऱ्या स्वत:च्या रणगाड्यांचा व्हिडिओही जारी केला आहे. तत्पूर्वी शनिवारी रात्री जबालियामध्ये इस्रायलने हल्ले केले. हमासच्या तळांना नष्ट करण्यासाठी अनेक एअरस्ट्राइक करण्यात आले आहेत. हमासचे सर्व तळ नष्ट होत नाहीत तोवर हे ऑपरेशन जारी राहणार आहे.
हल्ल्यांदरम्यान विमानांचे लँडिंग
बैरूतमध्ये रफीक हरीरी आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक शनिवारी रात्री इस्रायलने अनेक एअरस्ट्राइक केले आहेत. या हल्ल्यांदरम्यान बैरूतमध्ये विमानो•ाणे होत राहिली आहेत. लेबनॉनचे पंतप्रधान नजीब मिकाती यांनी इस्रायलवर शस्त्रसंधीसाठी दबाव आणण्याचे आवाहन केले आहे. करारासाठी अमेरिका आणि फ्रान्सच्या प्रयत्नांचे समर्थन करतो असे मिकाती यांनी म्हटले आहे.
इराणच्या कमांडरच्या मृत्यूचा संशय
इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या कुर्दस फोर्सचा कमांडर इस्माइल कानी एक आठवड्यापासून बेपत्ता आहे. कानी अखेरचा बैरूतमध्ये दिसून आला होता. हिजबुल्लाहच्या मदतीसाठी तेथे त्याला पाठविण्यात आले होते. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात कानीचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कानी हा इराणचा सर्वात शक्तिशाली नेता कासिम सुलेमानचा उत्तराधिकारी मानला जात होता. कानीचा मृत्यू झाला असेल तर इराणसाठी हा अत्यंत मोठा धक्का ठरणार आहे.
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला झाला असून यात एक महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 11 जण जखमी झाले आहेत. सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्याला इस्रायलच्या सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले आहे.