भारताकडून रॉकेट लाँचर खरेदी करणार इस्रायल
150 कोटीची ऑर्डर : संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी मैलाचा दगड
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महत्त्वपूर्ण संरक्षण प्रणालींचा अग्रणी भारतीय निर्माता एनआयबीई लिमिटेडला इस्रायलच्या जगप्रसिद्ध अग्रगण्य तंत्रज्ञान आधारि कंपनीकडून सुमारे 150 कोटी रुपयांच्या निर्यात ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरमध्ये 300 किलोमीटर पर्यंतच्या मारक पल्ल्याची क्षमता असलेल्या युनिव्हर्सल रॉकेट लाँचरची निर्मिती आणि पुरवठा सामील आहे. भारतात निर्मित एक अत्याधुनिक प्रगत तंत्रज्ञानाला पहिल्यांदाच विदेशातून ऑर्डर मिळाली आहे.
ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी एक गौरवपूर्ण मैलाचा दगड आहे. या करारासोबत आम्ही पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि मेक इन इंडियाच्या दृष्टीकोनाबद्दल आमच्या प्रतिबद्धतेची पुष्टी करतो असे एनआयबीई लिमिटेडच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
युनिव्हर्सल रॉकेट लाँचर स्वत:च्या श्रेणीत सर्वात अत्याधुनिक असून याला वर्तमानात उपलब्ध जागतिक पर्यायांपेक्षा चांगली कामगिरी करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. ही ऑर्डर एनआयबीई लिमिटेडच्या आंतरराष्ट्रीय विस्तारासाठी एक मोठे पाऊल आहे, तसेच अत्याधुनिक युद्धप्रणालींच्या क्षेत्रात भारताच्या रणनीतिक स्थितीला मजबूत करणारी आहे.