इस्रायलने ग्रेटा थनबर्गला परत पाठविले
वृत्तसंस्था/ तेल अवीव
कथित सामाजिक कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला इस्रायलमधून परत पाठविण्यात येत आहे. यासंबंधीची माहिती इस्रायलच्या विदेश मंत्रालयाने मंगळवारी दिली आहे. गाझाच्या दिशेने जाणारे जहाज जप्त करण्यात आले आहे. याच जहाजातून ग्रेटा प्रवास करत होती. तिच्यासोबत आणखी काही कथित कार्यकर्ते होते आणि गाझासाठी मदतसामग्री देखील होती. याचबरोबर इस्रायलच्या विदेश मंत्रालयाने एका विमानाचे छायाचित्र शेअर केले आहे. याच विमानातून ग्रेटा फ्रान्स येथे जात असल्याचे इस्रायलचे सांगणे आहे.
गाझामधील लोकांसाठी मदतसामग्रीच्या नावावर ग्रेटा या जहाजातून दाखल झाली होती. या जहाजात ग्रेटासोबत आणखी 12 जण होते. या जहाजाने मंजुरीशिवाय गाझामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने इस्रायलकडुन ते जप्त करण्यात आले आहे. तत्पूर्वी इस्रायलच्या प्रशासनाने ग्रेटा थनबर्गला तिच्या सहकाऱ्यांसोबत ताब्यात घेतले होते आणि मग त्यांना तेल अवीव येथील विमानतळावर नेण्यात आले. ग्रेटाला तेल अवीवमधून डिपोर्ट करण्यात आले. तर स्वीडनची नागरिक असलेली ग्रेटा आता फ्रान्ससाठी रवाना झाली आहे.
गाझामध्ये प्रवेश केल्यास कुठलीही कारवाई करण्यास स्वतंत्र आहोत असा इशारा इस्रायलने ग्रेटाला दिला होता. गाझाला मदत करणे एकप्रकारे हमासला बळ पुरविणे असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. ग्रेटा ही मॅडलीन नावाच्या जहाजातून प्रवास करत होती. या जहाजात अल जजिरा या वृत्तवाहिनीचा पत्रकार उमर फयाद देखील सवार होता. ग्रेटासमवेत सर्व 12 जणांना इस्रायलने डिपोर्ट केले आहे.
शो समाप्त : इस्रायल
सेल्फी यॉटचे सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांना सँडविच आणि पाणी पुरविण्यात आले आहे. शो आता समाप्त झाला असल्याची उपरोधिक टिप्पणी यापूर्वी इस्रायलच्या विदेश मंत्रालयाने केली होती. संरक्षणमंत्री इस्रायल काट्ज यांनी ग्रेटा थनबर्ग आणि इतरांना हमासच्या हल्ल्याचा व्हिडिओ दाखविण्याचा आदेश दिला होता.
तुर्किये, इराण, स्पेनकडून टीका
तुर्कियेने मॅडलीन जहाज रोखण्याच्या कृतीची निंदा केली आहे. या जहाजावर तुर्कियेतील कार्यकर्ता सुएब ओरडू देखील सवार होता. इस्रायलची ही कृती आंतरराष्टीय कायद्याचे उल्लंघन करणारी असून यामुळे सागरी सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असल्याचे तुर्कियेने म्हटले आहे. इराणने इस्रायलच्या या कृतीला सागरी दरोडा संबोधिले आहे. स्पेनने देखील या घटनेवरून आक्षेप नोंदविला. स्पेनच्या विदेश मंत्रालयाने इस्रायलच्या मुत्सद्याला पाचारण केले आहे. या जहाजावर स्पॅनिश नागरिक सर्जियो टोरिबियो देखील होता.