हिजबुल्लाहच्या गुप्त ड्रोन फॅक्ट्रीवर इस्रायलचा कब्जा
चकित करणारी छायाचित्रे आली समोर : भुयारी जाळे नष्ट करण्यात येणार
वृत्तसंस्था/ तेल अवीव
मध्यपूर्वेत जारी तणावादरम्यान इस्रायलच्या सैनिकांनी दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या सीमेनजीक एका पर्वतात दडलेल्या हिजबुल्लाहच्या मोठ्या भूमिगत ड्रोन उत्पादन सुविधेचा शोध लावला आहे. या गुप्त फॅक्ट्रीचा वापर इराणनिर्मित ड्रोन पार्ट्सची जुळणी करणे आणि त्यांना इस्रायलच्या दिशेने डागण्यासाठी केला जात होता. ही अत्याधुनिक सुविधा मागील एक दशकादरम्यान इराणचे प्रत्यक्ष समर्थन, वित्तपुरवठा आणि तांत्रिक सहकार्याने निर्माण करण्यात आली होती असे इस्रायलच्या सैन्याधिकाऱ्यांचे सांगणे आहे.
हा भूमिगत परिसर इस्रायलच्या सीमेपासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावरील मजदल जौन गावाखाली आहे. इस्रायलच्या सैन्याने चालू महिन्याच्या प्रारंभी दक्षिण लेबनॉनमधील सैन्य अभियानाच्या दरम्यान या क्षेत्रावर कब्जा केला होता. भुयार पर्वताच्या आत शेकडो मीटरपर्यंत फैलावलेले असून जमिनीपासून सुमारे 29 मीटर खोलवर आहे. ही सुविधा मोठ्या स्टीलच्या विस्फोटविरोधी दरवाजांद्वारे सुरक्षित होती आणि पूर्वी शोधण्यात आलेल्या हिजबुल्लाहच्या अन्य भुयारांच्या तुलनेत अधिक प्रभावी होते असे इस्रायलने म्हटले आहे.
ड्रोन असेंबली अन् शस्त्रास्त्र
इस्रायलच्या सैनिकांना या भुयारात अनेक कक्ष आढळून आले असून तेथे तस्करीद्वारे आणले गेलेल्या सुट्या भागांना जोडून ड्रोन तयार केले जात होते. इस्रायलच्या सैन्याने तेथे जवळपास 50 ड्रोनही हस्तगत केले असून त्यावर 30 किलोग्रॅमपर्यंत विस्फोटके जोडण्यात आली होती. हे ड्रोन इस्रायलवर यापूर्वी डागण्यात आलेल्या ड्रोन्सशी मिळतेजुळते आहेत. इस्रायलच्या सैन्याला पहिल्यांदाच अशाप्रकारची पूर्णपणे सुरक्षित ड्रोन फॅक्ट्री आढळून आल्याने हिजबुल्लाहच्या क्षमतांबद्दल महत्त्वपूर्ण गुप्त माहिती प्राप्त झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.
लाँच शाफ्ट
सैन्याने या स्थळाला ड्रोन फॅक्ट्री आणि ‘भूमिगत तळा’चे संयुक्त स्वरुप ठरविले आहे. पर्वताच्या दक्षिण हिस्स्यात विशेष प्रक्षेपण शाफ्ट आढळून आले असून ते वेळप्रसंगी खुले केले जाऊ शकत होते. भुयाराच्या अखेरीस विस्फोटविरोधी दरवाजांनी सुरक्षित 4 एक्झिट पॉइंट आहेत. हे दरवाजे उघडून सहजपणे इस्रायलच्या दिशेने यूएव्ही लाँच केले जाऊ शकत होते अशी माहिती आयडीएफच्या याहलोम लढाऊ इंजिनियरिंग युनिटच्या कमांडरने दिली आहे. या भुयारी केंद्रात सुमारे 8 टन विस्फोटक सामग्री देखील हस्तगत झाली आहे.
पुढे काय होणार?
आयडीएफनुसार 2024 च्या हिजबुल्लाह विरोधी संघर्षादरम्यान या स्थळाला हवाई हल्ल्यांद्वारे लक्ष्य करण्यात आले होते. परंतु हिजबुल्लाहने त्यानंतर पुन्हा हे केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. आता इस्रायलच्या सैनिकांनी पूर्ण भुयारी जाळ्याची सखोल तपासणी आणि स्कॅनिंग केले आहे. चौकशीनंतर या पूर्ण भूमिगत परिसराला उद्ध्वस्त करण्यात येणार आहे. इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील युद्धविराम करारानंतरही सीमेवर तणाव आणि संघर्ष सुरू असताना इस्रायलच्या सैन्याने हा शोध लावला आहे.