इस्रायल पंतप्रधानांच्या निवासावर पुन्हा हल्ला
महिन्याभरात दुसऱ्यांदा केले लक्ष्य
वृत्तसंस्था/ जेरुसलेम
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सीझेरिया येथील निवासावर पुन्हा हल्ला झाला आहे. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, पंतप्रधानांच्या घराच्या दिशेने दोन फ्लेअर (फायर गोळे) उडवण्यात आले. हे बॉम्बगोळे त्यांच्या निवासाच्या अंगणात पडले. इस्रायली पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे. हा हल्ला कुठून झाला आणि कोणी केला याची माहिती सध्या उपलब्ध नाही.
या घटनेत कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. हल्ल्याच्या वेळी नेतान्याहू आणि त्यांचे कुटुंबीय घरी नव्हते, असे इस्रायली सुरक्षा एजन्सी शिन बेटने एका निवेदनात म्हटले आहे. सुरक्षा यंत्रणांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. यापूर्वी 19 ऑक्टोबरला नेतन्याहू यांच्या घरावर हिजबुल्लाहने हल्ला केला होता. त्यानंतर नेतन्याहू यांच्या घराजवळील इमारतीवर ड्रोन पडले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यावेळीही नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा घरी नव्हते.
इस्रायलच्या पंतप्रधानांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा सर्व राजकीय पक्षांनी निषेध केला आहे. विरोधी पक्षनेते यायर लॅपिड आणि बेनी गँट्झ यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हल्लेखोरांनी मर्यादा ओलांडल्या आहेत. सुरक्षा यंत्रणांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करावी, असे इस्रायलचे संरक्षणमंत्री पॅट्झ यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.