गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी कारवाई
24 तासांत 150 ठिकाणी बॉम्बहल्ला : तीन दिवसांत 250 मृत्यू
वृत्तसंस्था/ गाझा
इस्रायली सैन्याने हमासला पराभूत करण्यासाठी आणि त्यांच्या ओलिसांना सोडण्यासाठी गाझामध्ये पुन्हा मोठी लष्करी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईअंतर्गत इस्रायलने गेल्या तीन दिवसांत गाझावर अनेक मोठे हल्ले केले. या हल्ल्यामध्ये 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांतच गाझापट्टीत हमासच्या 150 हून अधिक ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. इस्रायलच्या ताज्या बॉम्बहल्ल्यात मोठ्या संख्येने लोक मारले गेले आहेत, असे पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. युद्धबंदी संपल्यानंतरचा हा आतापर्यंतचा सर्वात घातक हल्ला मानला जात आहे. हमासचा नाश होईपर्यंत इस्रायल आपली मोहीम सुरूच ठेवेल असे इस्रायलचे म्हणणे आहे.
इस्रायलने गाझाचा ताबा घेण्यासाठी 5 मे रोजी ‘गिदियन रॅरियट्स’ लष्करी कारवाई सुरू केली. त्यापूर्वी मार्च 2025 मध्ये इस्रायलने गाझाला अन्न आणि इंधन पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला. अशा निर्णयामुळे हमास कमकुवत होईल, असा दावा इस्रायली सरकारने केला आहे. याचदरम्यान आता युद्धबंदीच्या तडाख्यानंतर हमास चर्चेसाठी तयार झाल्याचे समजते. शनिवारी कतारमध्ये दोघांमधील चर्चा सुरू झाली. हमासने युद्ध संपवल्याशिवाय चर्चा करण्यास नकार दिला होता, परंतु जोरदार हवाई हल्ल्यांनंतर हमासच्या प्रतिनिधींनी चर्चा करण्यास सहमती दर्शविली, असे इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ म्हणाले.
गेल्या 19 महिन्यांपासून गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे 5 लाख लोक उपासमारीच्या धोक्यात आहेत. 12 मे रोजी संयुक्त राष्ट्रांनी गाझातील परिस्थितीवर एक अहवाल सादर केला. यानुसार, जर इस्रायलने निर्बंध हटवले नाहीत तर गाझामधील प्रत्येक 5 पैकी 1 व्यक्ती उपासमारीला बळी पडू शकते. याशिवाय 21 लाख लोकांना दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू झालेल्या इस्रायल-हमास संघर्षात आतापर्यंत 61 हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत.
गाझापट्टीतील उपासमार आणि दुष्काळाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी गाझाला अन्न पुरवठ्यावरील बंदी तात्काळ रद्द करावी अशी मागणी संयुक्त राष्ट्र आणि युरोपीय देशांनी इस्रायलकडे केली आहे. जर इस्रायलने लष्करी कारवाई वाढवली तर बहुतेक लोकांना अन्न, पाणी, निवारा आणि औषधांची कमतरता भासणार आहे.