इस्रायलचा लेबनॉनवर मोठा हवाई हल्ला
गाझानंतर आता नवे युद्ध भडकण्याची चिन्हे
वृत्तसंस्था / जेरुसलेम
गाझापट्टीतील दहशतवादी संघटना हमाससोबतचा युद्धविराम मोडल्यानंतर आता इस्रायलने आता दक्षिण लेबनॉनमध्ये मोठा हवाई हल्ला केला आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेसनी (आयडीएफ) शनिवारी दक्षिण लेबनॉनवर तोफखाना आणि हवाई हल्ले चढवले. या मोठ्या हल्ल्यानंतर आता लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी देश एका नवीन युद्धात अडकण्याचा इशारा दिला आहे. यासंबंधी लेबनॉनने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात पंतप्रधान नवाफ सलाम यांनी देशाच्या दक्षिण सीमेवर नवीन लष्करी कारवाईविरुद्ध इशारा दिला आहे. या कारवाईमुळे देश युद्धात अडकण्याचा धोका आहे. युद्धाचा भडका उडाल्यास लेबनॉन आणि लेबनीज लोकांसाठी धोका निर्माण होऊ शकतो, असे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी म्हटले आहे.
इस्रायलने सुरुवातीला लेबनीज जिह्यातून एकूण तीन रॉकेट डागण्यात आल्याचे म्हटले आहे. सीमेच्या पलीकडून डागलेले रॉकेट इस्रायलच्या सैन्याने यशस्वीपणे रोखले. त्यानंतर इस्रायलनेही प्रत्युत्तरादाखल प्रतिहल्ला केल्याचा दावा केला आहे. इस्रायली हल्ल्यांमुळे लेबनीज शहरात प्रचंड विनाश झाला आहे. दक्षिण लेबनॉनमधील दोन शहरांमध्ये तोफखान्याचा मारा केला, तर इस्रायली सैन्याने सीमेजवळील इतर तीन शहरांमध्ये हवाई हल्ले केले. दक्षिण लेबनॉनमध्ये दोन्ही बाजूंमधील हा हल्ला इस्रायल आणि गाझा यांच्यातील युद्धबंदी करार मोडल्यानंतर झाला आहे. लेबनीजचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी देशाच्या दक्षिण भागात पुन्हा लष्करी कारवाई सुरू करण्याचा इशारा दिला आहे.