वेस्ट बँकेत हमास कमांडरचा इस्रायलकडून खात्मा
इमारतींना घेरून केले लक्ष्य
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
इस्रायलच्या सैन्याने उत्तर वेस्ट बँकेतील शहर जेनिनच्या पूर्व भागात राबविलेल्या एका सैन्य मोहिमेत कसम ब्रिगेडचा वरिष्ठ कमांडर आणि एका पॅलेस्टिनी नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हमास नेटवर्कचा प्रमुख आयसर अल-सादीला अटक करण्यासाठी छापा टाकण्यात आला होता, परंतु मोहिमेदरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे इस्रायलच्या सैन्याकडून सांगण्यात आले.
गोळीबारात हमासचा आणखी एक सदस्यही मारला गेला आहे. तर हमासच्या तीन सदस्यांना अटक करण्यात आली आहे. इस्रायलच्या सैन्याने जेनिनच्या पूर्व भागात अनेक नागरी इमारतींना घेरले होते, यामुळे तेथे हिंसक झटापट झाली, ज्यात हमासचा कमांडर मारला गेल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.
इस्रायलच्या सुरक्षा दलांनी उत्तर वेस्ट बँकेतील जेनिनमध्ये ऑपरेशन आयर्न वॉल नावाने स्वत:ची दहशतवादविरोधी मोहीम राबविली आहे. या मोहिमेदरम्यान इस्रायलचे सैनिक ‘ईटन’ चिलखती वाहनांचा वापर करत आहेत. शिन बेट या गुप्तच्रा यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सुरक्षा दलांनी जेनिनमधील एका ठिकाणी दहशतवादी आयसर अल-सादीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता.
तेथे झालेल्या गोळीबारानंतर सादी आणि एक दहशतवादी मारला गेला. तर तीन वाँटेड दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हमासने सादीच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत इस्रायलवर निष्पापांची हत्या घडवून आणल्याचा आरोप केला आहे.