For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्रायल-हिजबुल्ला शस्त्रसंधीचे स्वागत

07:00 AM Nov 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
इस्रायल हिजबुल्ला शस्त्रसंधीचे स्वागत
Advertisement

भारताने नेहमीच शांततेचा केला पुरस्कार : भारताचे प्रतिपादन, शस्त्रसंधी दोन महिन्यांसाठी

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

एक वर्षाहून अधिक काळ संघर्ष झाल्यानंतर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात दोन महिन्यांसाठी शस्त्रसंधी झाली आहे. अमेरिकेने ही शस्त्रसंधी घडवून आणण्यामध्ये पुढाकार घेतला असून ही शस्त्रसंधी घडवून आणण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांना दोन दिवसांपूर्वी यश आले आहे. त्यामुळे संघर्ष निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताने या शस्त्रसंधीचे स्वागत केले आहे. भारताने नेहमीच कोणतीही समस्या शांततेच्या आणि सामोपचाराच्या मार्गाने सोडविण्याचा आग्रह धरलेला आहे. त्यामुळे या शस्त्रसंधीचा भारताला विशेष आनंद होत आहे. या शस्त्रसंधीमुळे या प्रदेशात स्थायी शांतता आणि स्थिरता निर्माण होईल, अशी आम्हाला आशा आहे, अशी प्रतिक्रिया भारताने व्यक्त केली.

Advertisement

अमेरिका-फ्रान्सचा पुढाकार

इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात मर्यादित शस्त्रसंधी घडवून आणण्यासाठी अमेरिका आणि फ्रान्सने पुढाकार घेतला आहे. या शांतता कराराच्या अटी आणि शर्तीही या दोन देशांच्या पुढाकाराने ठरविण्यात आल्या आहेत. या कराराला मंगळवारी इस्रायलने मान्यता दिली. त्यानंतर या शस्त्रसंधीच्या क्रियान्वयनाला प्रारंभ झाला. या घडामोडीचे स्वागत जगभरातील अनेक देशांनी स्वागत केले आहे.

करारात तरतुदी कोणत्या आहेत...

या कराराच्या सर्व तरतुदी अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. मात्र महत्वाच्या अटींच्या अनुसार शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर दक्षिण लेबेनॉनमध्ये हजारो लेबेनॉनी सैनिक आणि आंतरराष्ट्रीय शांती सैनिक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच इस्रायल आणि हिजबुल्ला यांनी एकमेकांवर हल्ले करायचे नाहीत, अशीही अट या करारात आहे. इस्रायलने या कराराला मान्यता दिली असली तरी ती सशर्त आहे. हिजबुल्लाने जर शस्त्रसंधीचा भंग केला तर इस्रायल आपला स्वसंरक्षणाचा अधिकार उपयोगात आणण्यास मागे पुढे पाहणार नाही, असे या देशाच्या प्रशासनाने मंगळवारी कराराला मान्यता देतानाच स्पष्ट केले आहे.

शस्त्रसंधी टिकणार का ?

इस्रायल आणि हमास किंवा हिजबुल्ला यांच्यात आजवर अनेकदा शस्त्रसंधी झालेली आहे. तथापि, अत्यंत कमी वेळा ही शस्त्रसंधी तिच्या पूर्ण कार्यकाळासाठी टिकून राहिल्याचे दिसून येते. त्यामुळे या शस्त्रसंधीवरही प्रारंभापासूनच संशयाचे ढग आहेत. याचे प्रमुख कारण असे, की हिजबुल्ला किंवा हमास या दहशतवादी संघटनांचे अनेक गट आहेत आणि ते कमीअधिक प्रमाणात जहाल आहेत. त्यामुळे एका गटाकडून शस्त्रसंधीचे पालन झाले तरी ते अन्य गटाकडून होईलच याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे नेमके काय होणार हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल, असे मत अनेक आंतराष्ट्रीय तज्ञ आणि अभ्यासक व्यक्त करतात.

वर्षभरात प्रचंड जिवीत हानी

इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात एक वर्षाहून अधिक काळ चाललेल्या संघर्षात मोठ्या प्रमाणात जिवीत हानी झाली असल्याचे दिसून येते. हिजबुल्लाचे बहुतेक सर्व प्रमुख नेते इस्रायलने अचूकपणे केलेल्या हल्ल्यांमध्ये ठार झाले आहेत. हमास या दहशतवादी संघटनेचीही हीच गत झाली आहे. याशिवाय हिजबुल्लाचे 3 हजारांहून अधिक हस्तक मारले गेले आहेत. इस्रायलचीही या संघर्षात काही प्रमाणात हानी झाली असून या देशाचे 400 सैनिक मारले गेल्याची माहिती देण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरीकांचेही बळी या संघर्षात गेले असून त्यांची नेमकी संख्या उपलब्ध नाही. गाझापट्टीत हमासशी झालेल्या संघर्षात किमान 40 हजार पॅलेस्टाईनी नागरीक मारले गेले असावेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.