इस्रायल-हमास संघर्षात चोवीस तासात 11 ठार
वृत्तसंस्था/ कीव
इस्रायल-हमास युद्धाला तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. या संघर्षादरम्यान इस्रायलचे सैन्य हमासच्या ठाण्यांना सातत्याने लक्ष्य करत आहे. इस्रायली लष्कराने 24 तासांत 11 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. इस्रायली विमाने, रणगाडे आणि सैन्य दलाने गेल्या 24 तासात गाझाच्या खान युनिसवर हल्ले वाढवल्याचे लष्कराने शनिवारी सांगितले. या हल्ल्यात सुमारे 11 दहशतवादी मारले गेले आहेत. इस्रायलच्या सैन्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून झाल्यानंतर त्यांच्यावर रायफल आणि रॉकेटद्वारे गोळीबार करण्यात आल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली.
7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सुमारे 1,200 लोक मारले गेले आणि सुमारे 250 लोकांना हमासने ओलीस ठेवले होते. यानंतर इस्रायलने हमासला प्रत्युत्तर दिले. इस्रायली सैन्याने गाझापट्टीतील हमासच्या स्थानांना लक्ष्य केले. गाझामधील मृतांची संख्या शुक्रवारपर्यंत 26 हजारहून अधिक झाली असून 64,400 हून अधिक जखमी झाले आहेत.