इराणवर सूड घेण्याचा इस्रायलचा निर्धार
इराणने डागलेली बहुतेक क्षेपणास्त्रे निकामी करण्यात यश, बैरुतवर इस्रायलचे हल्ले सुरुच
वृत्तसंस्था/ जेरुसलेम
मध्यपूर्वेतील संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. लेबेनॉनमधील इराणसमर्थित हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या नसराल्लाह याला इस्रायलने ठार केल्याने भडकलेल्या इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या या हल्ल्यात इराणने 180 ते 200 क्षेपणास्त्रे डागली असावीत असे अनुमान आहे. तथापि, इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ तंत्रज्ञानाने यापैकी 90 टक्क्यांहून अधिक क्षेपणास्त्रे पडण्यापूर्वीच निकामी केली असून काही क्षेपणास्त्रे इस्रयलच्या तेल अवीव भागात पडल्याची माहिती देण्यात आली आहे.
क्षेपणास्त्र हल्ल्याची सूचना मिळताच इस्रायली नागरिकांनी त्वरित सुरक्षित आसऱ्यांचा आधार घेतला. त्यामुळे जीवितहानी नगण्य झाली. इस्रायलने या हल्ल्याचा सूड घेण्याची प्रतिज्ञा केली असून आम्ही निर्धारित केलेल्या वेळी, स्थळी आणि प्रमाणात सूड उगविला जाईल, असे इस्रायलने स्पष्ट केले आहे. इराणने आता सर्व सीमा पार केल्या असून त्याने परिणाम भोगण्यास सज्ज रहावे. आमच्यावर हल्ला करून इराणने प्रचंड चूक केली आहे, असा कठोर इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणच्या नेतृत्वाला दिला आहे.
इराणचा दावा
इस्रायलच्या किमान तीन सेनातळांवर आम्ही हल्ला केला आहे. आम्ही इस्रायलची गुप्तहेर संस्था मोस्सादच्या मुख्यालयावरही क्षेपणास्त्रे डागली आहेत, असा दावा इराणच्या क्रांतिकारी सेनेने केला आहे. आम्ही आमची कारवाई संपविली आहे. पण इस्रायलने बदला घेण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही आणखी हल्ले करु असा इशारा इराणचे विदेश व्यवहारमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी दिला.
इस्रायलचे हल्ले सुरुच
लेबेनॉनची राजधानी बैरुतच्या दक्षिण भागातील हल्ले इस्रायलने सुरुच ठेवले आहेत. इस्रायलची सेना आता लेबेनॉनमध्ये घुसली असून तेथे इस्रायलाr सेनेचा संघर्ष हिजबुल्लाहशी होत आहे. अनेक इस्रायली रणगाडेही दक्षिण लेबेनॉनमध्ये पोहचले असून हिजबुल्लाहच्या संरक्षण भुयारांचा नाश त्यांनी सुरू केला आहे. हिजबुल्लाहची अग्निबाण डागण्याची यंत्रणा उद्ध्वस्त करण्याचे इस्रायलचे ध्येय आहे.
नेतान्याहूंची नेत्यांशी बैठक
परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी बुधवारी आपल्या सर्व सेनादलांच्या प्रमुखांबरोबर चर्चा केली. ही बैठक या देशाच्या संरक्षण विभागाच्या तेल अवीव येथील मुख्यालयात झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. कोणत्याही आणि कितीही आघाड्यांवर संघर्ष करण्यास इस्रायल सज्ज आहे, असा संदेश या देशाने इराणला दिला आहे. तसेच इराणला त्याच्या कृत्याची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही या बैठकीनंतर व्यक्त केला गेला.
संयुक्त राष्ट्र प्रमुखांच्या इस्रायल प्रवेशावर बंदी
इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलने संयुक्त राष्ट्र प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांना इस्रायलमध्ये येण्यास बंदी घातली आहे. संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी इराणच्या हल्ल्याचा निषेध केला नाही, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांना प्रवेश नाकारण्याचा निर्णय इस्रायलने घेतला आहे. गुटेरेस सध्याच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मध्यपूर्वेचा दौरा करणार होते. तथापि, आता त्यांनी येण्यासाठी ही योग्य वेळ नाही, असे कारण स्पष्ट करत इस्रायलने आपल्या भूमीवर त्यांना प्रवेश नाकारला आहे.
फ्रान्सकडून सैन्यात वाढ
संघर्षाची परिस्थिती पाहता फ्रान्सने आपल्या मध्यपूर्वेतील सैनिक तुकड्यांमध्ये वाढ केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये युद्धनौकाही अधिक संख्येने पाठविल्या जाण्याची शक्यता आहे. फ्रान्सने संघर्ष वाढल्यास काय करायचे याची सज्जता ठेवली असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
हुतीचा इस्रायलवर हल्ला
येमेनमधील इराणसमर्थित हुती बंडखोरांनी इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. तीन क्षेपणास्त्रे इस्रायलच्या भूमीत पडल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या हल्ल्यामुळे कोणतीही हानी झालेली नाही, अशी माहितीही देण्यात आली आहे. इस्रायल आता हुतींचा बंदोबस्त करण्यासाठी येमेनवरही हल्ला करण्याची शक्यता आहे. सध्या इस्रायलने आपल्या उत्तर आघाडीवर लक्ष केंद्रीत केले आहे.