ब्रिटनच्या दोन खासदारांना इस्रायलने नाकारला प्रवेश
विमानतळावरच घेतले ताब्यात : ब्रिटन सरकार संतप्त
वृत्तसंस्था/ लंडन
इस्रायलमध्ये ब्रिटनच्या दोन खासदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. ब्रिटनचे विदेशमंत्री डेव्हिड लॅमी यांनी इस्रायलकडून दोन ब्रिटिश खासदारांना ताब्यात घेणे आणि त्यांना देशात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रकार अस्वीकारार्ह आणि गंभीर चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे. ब्रिटनमधील सत्तारुढ मजूर पक्षाच्या खासदार युआन यांग आणि अब्तिसम मोहम्मद या लंडनहून इस्रायलसाठी रवाना झाल्या होत्या, परंतु त्यांना इस्रायलच्या अधिकाऱ्यांना प्रवेशापासून रोखत ब्रिटनमध्ये परत पाठविले आहे.
इस्रायलची ही कारवाई अस्वीकारार्ह, प्रतिकूल आणि चिंतेचा विषय आहे. इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी एका संसदीय शिष्टमंडळात सामील दोन ब्रिटिश खासदारांना ताब्यात घेतले आणि प्रवेशापासून रोखले आहे. इस्रायलच्या विदेशमंत्र्यांसमोर ब्रिटिश खासदारांसोबत अशाप्रकारचे वर्तन स्वीकारार्ह नसल्याची भूमिका मांडली आहे. आम्ही दोन्ही खासदारांच्या संपर्कात आहोत आणि त्यांना समर्थन देत आहोत असे लॅमी यांनी सांगितले आहे.
शस्त्रसंधी संपुष्टात आल्यावर कारवाईला वेग
ब्रिटन सरकारचे प्राथमिक लक्ष्य संघर्षविराम लागू करणे, ओलिसांची मुक्तता आणि गाझामधील हिंसा समाप्त करण्यासाठी चर्चेला पुढे नेणे असल्याचे लॅमी यांनी म्हटले आहे. मागील महिन्यात एक अंतरिम संघर्षविराम संपुष्टात आल्यावर इस्रायलने गाझापट्टीत सैन्य अभियान पुन्हा तीव्र केले आहे. या क्षेत्रावरील नियंत्रण वाढवत हमासच्या ताब्यातील ओलिसांची मुक्तता सुनिश्चित करत असल्याचे इस्रायलचे सांगणे आहे.
आतापर्यंत 50 हजारांहून अधिक बळी
हमासच्या आरोग्य मंत्रालयानुसार इस्रायलकडून करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत 50,609 जणांचा मृत्यू झाला आहे. हमासने भीषण दहशतवादी हल्ले केल्यामुळे हे युद्ध सुरू झाले होते. हमासच्या हल्ल्यात इस्रायलमधील 1218 जणांना जीव गमवावा लागला होता.