इस्रायलने रोखला गाझाचा सामग्रीपुरवठा
अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी दबावतंत्र : ओलिसांच्या मुक्ततेवर सर्वांचे लक्ष
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायलने गाझापट्टीसाठी सर्व सहाय्य अन् पुरवठ्याला रोखले आहे. गाझापट्टीत सर्व वस्तूंचा पुरवठा रोखत असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. युद्धविरामाच्या विस्तारासाठी अमेरिकेचा प्रस्ताव मान्य न केल्यास हमासला अतिरिक्त परिणाम भोगावे लागतील असा इशारा इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने दिला आहे. सहाय्यसामग्रीचा पुरवठा पूर्णपणे रोखण्यात आला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. इस्रायल-हमास युद्धविरामाच्या पहिल्या टप्प्यात मानवीय सहाय्यात वाढ करण्याचा मुद्दा सामील होता. हा युद्धविराम शनिवारी संपुष्टात आला आहे.
हमास तसेच इस्रायलने अद्याप दुसऱ्या टप्प्याकरता चर्चा केलेली नाही. यात इस्रायलचे सैन्य मागे हटणे आणि स्थायी युद्धविरामाच्या बदल्यात हमासकडून उर्वरित ओलिसांची सुटका केली जाणार होती. रमजान किंवा 20 एप्रिलपर्यंत युद्धविरामाचा पहिला टप्पा वाढविण्याच्या प्रस्तावाचे समर्थन करत असल्याची भूमिका इस्रायलने मांडली आहे. हा प्रस्ताव ट्रम्प प्रशासनाचे मध्यपूर्वेतील प्रतिनिधी स्टीव विटकॉफ यांच्याकडून सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या अंतर्गत हमास पहिल्या दिवशी स्वत:च्या ताब्यात असलेल्या निम्म्या ओलिसांची मुक्तता करेल. तर उर्वरित ओलिसांची मुक्तता ही स्थायी युद्धविरामावर सहमती झाल्यावर करण्याचा प्रस्ताव आहे.
याप्रकरणी अमेरिका, इजिप्त किंवा कतारकडून तत्काळ कुठलीच टिप्पणी समोर आलेली नाही. हे देश एक वर्षापेक्षा अधिक काळापासून इस्रायल आणि हमास यांच्यात मध्यस्थी करत आहेत. तर हमासने या प्रस्तावाबद्दल कुठलीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
अमेरिकेचे म्हणणे इस्रायलला मान्य
इस्रायलने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिनिधी स्टीव विटकॉफ यांचा प्रस्ताव स्वीकारला आहे. यात रमजान आणि पासओव्हरदरम्यान गाझामध्ये तात्पुरत्या युद्धविरामाची तरतूद सामील आहे.