इस्रायलचा गाझावर हल्ला : 21 जण ठार
वृत्तसंस्था/तेल अवीव
इस्रालयने गाझा पट्टीत हमासच्या केंद्रांवर पुन्हा जोरदार हल्ला चढविला आहे. या हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आहे. या हल्ल्यानंतर इस्रायल आणि हमास यांच्यात शांततेसाठी चर्चा व्हावी असे प्रयत्न मध्यस्थांकडून होण्यास प्रारंभ झाला आहे. गुरुवारी इस्रायली विमानांनी गाझा पट्टीच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बॉम्बफेक केली. शेख वदवान भागात बेघर लोकांचे आश्रयस्थान असलेल्या एका शाळेवर पडलेल्या बॉम्बमुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. हा भाग गाझा शहराचे उपनगर म्हणून ओळखला जातो. तसेच खान युनिस भागात एका तंबू वसाहतीवर झालेल्या हल्ल्यात आणखी 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अन्यत्र आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलकडून अद्याप या मृत्यूंना दुजोरा मिळालेला नाही. मात्र, हमासवर हल्ले होतच राहतील असे इस्रायलने स्पष्ट केले आहे.
अद्याप ओलीसांची सुटका नाही
2023 मध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या दक्षिण भागात हल्ला केला होता. त्या हल्ल्यात 1 हजार 200 हून अधिक ज्यू नागरिकांची हत्या करण्यात आली होती. ज्यू महिलांवर अत्याचार करण्यात आले होते. तसेच 250 हून अधिक नागरिकांचे अपहरण केले होते. अद्यापही या सर्व नागरिकांची सुटका झालेली नाही. त्यामुळे हमासवरील हल्ले असेच होत राहतील, असे इस्रायलच्या सेनेने स्पष्ट केले आहे. हमास ही दहशतवादी संघटना असून तिला दुर्बळ केल्याशिवाय इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होणार नाहीत. त्यामुळे हमासला धारेवर धरण्याचे अभियान थांबविले जाणार नाही. हमासने त्याच्या ताब्यात असणाऱ्या सर्व ओलीसांची सुटका केल्याखेरीज इस्रायल आपली भूमिका सौम्य करणार नाही, असे प्रतिपादन करण्यात आले आहे.
हमासचे म्हणणे
हमासशी स्थायी शस्त्रसंधी करण्यास इस्रायल राजी झाल्यास आणि त्याने गाझा पट्टीतून आपली सेना मागे घेतल्यास सर्व ओलीसांची सुटका करण्यात येईल, असे हमासचे म्हणणे आहे. 7 ऑक्टोबर 2023 या दिवशी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी इस्रायलने हमासवर केलेल्या कारवाईत आतापर्यंत जवळपास 60 हजार गाझा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच गाझा पट्टीतील बहुतेक सर्व मोठ्या इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेक आस्थापने आणि रुग्णालयेही नष्ट झाली आहेत, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. गेले दीड वर्ष हा संघर्ष होत असून शांततेचेही अनेक प्रयत्न या काळात करण्यात आले आहेत. मात्र, ते सर्व अपयशी ठरल्याने संघर्ष होतच आहे.