हा विरोधाभास नव्हे का ?...
रामा काणकोणकर यांना झालेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद गोव्यात उमटले. रामा काणकोणकर प्रकरणातून विरोधकांनी सध्या सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालविला आहे. या मारहाणीमागे राजकीय सूत्रधार असल्याचा आरोप विरोधक करतात मात्र त्या राजकीय सूत्रधाराचे नाव घेण्याचे धाडस आजपर्यंत विरोधकांनी केलेले नाही. दुसऱ्या बाजूने माजोर्डा येथे बेकायदा धिरयो आयोजित करून त्यात राजेश निस्तानी याचा बळी गेला तर त्यावर विरोधक एक शब्दसुद्धा उच्चारत नाही. हा विरोधाभास नव्हे का?
सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांना भर दिवसा झालेली मारहाण सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमांतून सर्वांनी पाहिली व त्याचे तीव्र पडसाद उमटले. भरदिवसा मारहाण करण्यापर्यंत जेव्हा गुन्हेगारांची मजल जाते, तेव्हा त्याला कुणाचा तरी आशीर्वाद असावा, याला पुष्टी मिळते. या मारहाण प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करताना गुन्हेगारीची पार्श्वभूमी अँथनी नादर, फ्रान्सिस नादर, सुरेश नाईक, मिंगेल आरावजो, मनीष हडफडकर यांना अटक केली. हे सर्वजण हिस्ट्री-शीटर असून त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे नोंद झालेले आहेत. या प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ असलेल्या जेनिटो कार्दोज यालाही पोलिसांनी अटक केली. त्यानंतरही विरोधी पक्षांनी एका मंत्र्यांचा हात असल्याचा आरोप लावून धरला.
मात्र, एकही राजकीय विरोधक उघडपणे मंत्र्यांचे नाव घेण्याचे धाडस करीत नाही. त्यानंतर काही मंत्र्यांनी विरोधकांनाच आव्हान देताना, मंत्र्याचे नाव जाहीर करा, असे सांगितले. परंतु आजपर्यंत विरोधकांनी उघडपणे एकाही मंत्र्याचे नाव घेतले नाही. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रामा काणकोणकर मारहाण प्रकरणात आपल्या सरकारमधील एकही मंत्री गुंतला नसल्याचा खुलासा केला. विरोधकांनी उगाच खोटे आरोप करू नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
ज्या पद्धतीने रामाला मारहाण झाली, त्याचे समर्थन कुणीच करणार नाही. सर्वांनीच या मारहाणीचा निषेध केला मात्र, बेकायदेशीररित्या आयोजित केलेल्या रेड्याच्या ‘धिरयो’त एकाचा बळी गेला. त्यावर विरोधकांनी मौन पाळले. हे मौन का व कशासाठी? या ठिकाणी रेड्याचे शिंग लागून एकाचा बळी जातोय आणि विरोधक साधा निषेधसुद्धा करीत नाही, ही कशाची लक्षणे. ज्या तत्परतेने रामाला मारहाण झाल्यानंतर प्रतिक्रिया आल्या, तशाच प्रतिक्रिया का नाही आल्या? अशा ‘धिरयो’मागे विरोधकांचे काय गुपित आहे?.
कायद्याने ‘धिरयो’ आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. ‘धिरयो’ आयोजनातून मुक्या जनावरांची क्रूरता केली जातेय. रेडे-बैल गंभीररित्या जायबंदी होत असल्याने ही बंदी घातलेली आहे. परंतु, ‘धिरयो’ म्हणजे अनेकांचे कमाईचे साधन बनलेले आहे. त्यात राजकीय नेत्यांचा देखील समावेश आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ‘धिरयो’ आयोजित करण्यासाठी राजकीय आशीर्वाद असतोच. त्यामुळे ज्या भागात ‘धिरयो’ आयोजित केला जाणार त्या भागात पोलिस पायसुद्धा ठेवत नाहीत. दर ‘धिरयो’मागे पोलिसांचा हप्ताही ठरलेला असतो.
दक्षिण गोव्यात खास करून सासष्टीच्या किनारपट्टी भागात दर शनिवारी व रविवारी तसेच सण-उत्सवाच्या दिवशी ‘धिरयो’ आयोजित केल्या जातात. ‘धिरयो’ हे मनोरंजनाचे साधन म्हणून बघितले जात असले तरी त्यात मोठ्या प्रमाणात ‘बेटिंग’ होत असते. लाखो रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळेच ‘धिरयो’वर बंदी असताना देखील त्या बंद होऊ शकलेल्या नाहीत.
रामा काणकोणकर मारहाण प्रकरणानंतर सरकारवर दबाव टाकण्यासाठी सर्व राजकीय विरोधक पणजीत एकत्र आले. जोरदार शक्ती प्रदर्शन घडविले. बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी भाजप कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र तेच वेन्झी व्हिएगस, माजोर्डा येथे ‘धिरयो’त एकाचा बळी गेला, त्यावर का अशाप्रकारे आक्रमक झाले नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे. राजेश निस्तानीचा बळी गेल्यानंतर त्यांनी आक्रमक होत ‘धिरयो’वर बंदी घाला, अशी सरकार दरबारी मागणी का केली नाही, असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
‘धिरयो’ला कायदेशीर मान्यता द्यावी, अशी मागणी एकदा वेन्झी व्हिएगस यांनी विधानसभेत केली होती. विदेशात ज्या पद्धतीने ‘धिरयो’चे आयोजन केले जाते, तशाच प्रकारे गोव्यात आयोजन व्हावे, त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल तसेच काहीजणांना रोजगार मिळेल, असा मुद्दाही त्यांनी मांडला होता. मात्र, सरकार ‘धिरयो’ला कायेदशीर मान्यता देण्यास राजी नाही.
जर सरकारने ‘धिरयो’ला कायदेशीर मान्यता दिली तर अनेकांच्या कमाईवर टाच येईल. ‘धिरयो’ बेकायदेशीर असल्यामुळेच आज अनेकांची लाखो रुपयांची कमाई होत आहे. त्यामुळेच सासष्टीतील काही राजकीय व्यक्ती, सत्ताधाऱ्यांमधील काही जणांचे गुणगान करतात, हे देखील तेवढेच सत्य आहे.
अमूक ठिकाणी ‘धिरयो’ आयोजित होणार, त्या ठिकाणी पोलिस पाठवायचे नाही, असा वरिष्ठ पातळीवरून संदेश येत असतो, हे सुद्धा आता लपून राहिलेले नाही. सासष्टीत ‘धिरयो’ला विरोध करणे म्हणजे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रकार आहे. कारण, त्यामागे लपलेय ते अर्थकारण.
यापूर्वी सासष्टीत अनेक राजकीय नेत्यांकडे ‘धिरयो’चे रेडे-बैल होते. तेव्हा हे राजकीय नेते सत्तेत असल्यामुळे त्यांना अडविणारे-रोखणारे कोणी नव्हतेच. मात्र, आता हे नेते पूर्वीप्रमाणे सक्रिय नसल्याने त्यांनी रेडे-बैल पाळण्याचे सोडून दिले असले तरी ‘धिरयो’ आयोजनामागे त्यांचा हात असतोच. ‘धिरयो’ने आजपर्यंत अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतलेला आहे तर काहीजणांना कायमस्वरुपी जायबंदी करून ठेवले आहे. तरीसुद्धा ‘धिरयो’ बंद होत नाही तसेच राजकीय विरोधक त्यावर आवाज उठवत नाही.
महेश कोनेकर