केरळच्या इसमाला तालिबानकडून अटक
इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांची संबंध
वृत्तसंस्था/ काबूल
अमेरिकेला काढता पाय घेण्यास भाग पाडलेल्या तालिबानलाही एक दहशतवादी संघटना त्रस्त करत आहे. इसलामिक स्टेट खुरासान प्रॉविन्स नावाची ही संघटना अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट अन् आत्मघाती हल्ले घडवून आणत आहे. आता तालिबानने इस्लामिक स्टेटशी संबंधित एका इसमाला अटक केली असून तो केरळचा रहिवासी आहे.
भारतीय नागरिक सनाउल इस्लामला कंधारमध्ये तालिबानी पोलिसांनी पकडले आहे. कंधारमध्ये येण्याचे कारण विचारण्यात आले असता सनाउल समर्पक उत्तर देऊ शकला नसल्याचे तालिबान राजवटीतील गुप्तचर विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
सनाउल हा ताजिकिस्तानच्या मार्गाने अफगाणिस्तानात पोहोचला आहे. यामुळे तो इस्लामिक स्टेटमध्ये सामील झाल्याचे संशय बळावला आहे. सनाउलची आता तालिबानची गुप्तचर यंत्रणा अधिक चौकशी करणार आहे. 2014 पासून इस्लामिक स्टेट खुरासान प्रॉविन्समध्ये सामील किमान 11 भारतीय नागरिक अफगाणिस्तानात मारले गेले आहेत किंवा पकडले गेले आहेत. यातील बहुतांश जण हे केरळचे रहिवासी होते.
केरळच्या इसमाला इस्लामिक स्टेटशी संबंध बाळगल्याप्रकरणी अटक झाल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या चिंता वाढल्या आहेत. यापूर्वीही एनआयएने केरळमध्ये आयएस मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. तर अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यापासून इस्लामिक स्टेटच्या कारवाया वाढल्या आहेत. यामुळे केवळ अफगाणिस्तानच नव्हे तर पूर्ण क्षेत्रासाठी धोका निर्माण झाला आहे. भारताच्या विरोधात देखील इस्लामिक स्टेटकडून कट रचले जात आहेत.
तालिबानचे मुजाहिदीन आणि अफगाणिस्तानचे सर्वसामान्य नागरिक यांना आता इस्लामिक स्टेटमुळे धोका निर्माण झाला आहे. इस्लामिक स्टेटकडून अफगाणिस्तानच्या अनेक प्रांतांमध्ये स्फोट घडवून आणले जात आहेत. एका अहवालानुसार तालिबानच्या विरोधात आता इस्लामिक स्टेटला पाकिस्तानकडून बळ पुरविले जात आहे. तर अफगाणिस्तानात तालिबान इस्लामिक स्टेटच्या विरोधात कारवाई करत आहे.