Sangli News : वाळव्यात चायनीज गाड्यावर पैशाच्या वादातून इसमाला लोखंडी रॉडने मारहाण
वाळवा येथे मारहाणीची घटना; आष्टा पोलिसांकडे गुन्हा दाखल
आष्टा : वाळवा येथे चायनीजच्या गाड्यावर राईसचे बिल न दिल्याच्या कारणावरून एका इसमास लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे.
आकाश शिवलाल राठोड (वय ४५ रा. वाळवा) व्यवसाय ड्रायव्हर असे या घटनेत जखमी झालेल्या इसमाचे नाव असून त्यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित राजेंद्र तुकाराम ऐवळे, बिराजी मारुती पारसे, सुशांत दादासो ऐवळे या तिघांवर गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी मित्रासह वाळवा येथील लक्ष्मी मंदिराशेजारील चायनीजच्या गाड्यावर राईस खात बसले होते. यावेळी संशयित राजू ऐवळे हा देखील तेथे होता. राजू ऐवळे याने तेथून जाताना आकाश राठोड यास माझे राईसचे बिल दे असे सांगितले.
यावेळी आकाश याने माझ्याकडे पैसे नाहीत तुझं तू दे, असे सांगितल्यावर तू माझे पैसे का देत नाहीस तुला दाखवतो असे म्हणून पिराजी मारुती पारसे, सुशांत दादासो ऐवळे यांना बोलावून घेऊन राजेंद्र ऐवळे याने हातातील लोखंडी रॉडने आकाशवर हल्ला चढवून जखमी केले. बिराजी पारसे, सुशांत ऐवळे यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून आकाश याला जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंद केला असून अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत.