इस्लामपुरात रिव्हॉल्व्हर, तलवार बाळगणारे दोघे जेरबंद! इस्लामपूर पोलिसांची कारवाई
शस्त्र विक्रीसाठी आणलेली
इस्लामपूर प्रतिनिधी
बेकायदा, विनापरवाना रिव्हॉल्व्हर, तलवार व पिस्टल विक्रीसाठी आलेल्या येथील दोघांना इस्लामपूर पोलिसांनी जेरबंद केले. रोहन राजन शिंदे (वय 22 रा. अभियंतानगर इस्लामपूर) व सुशांत सुभाष कुडाळकर (वय 37 रा. दत्तटेकडी, इस्लामपूर) अशी संशयितांची नावे असून त्यांना अटक कऊन एक रिव्हॉल्व्हर, तलवार व बुलेट गाडी असा 1 लाख 81 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांना न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.
पोलीस निरीक्षक संजय हारूगडे, स.पो.नि. राहुल घुगे व पोलिस पथक हे पेट्रोलिंग करत असताना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दत्त टेकडी परिसरात बुलेट मोटरसायकल क्र.एम.एम. 12ए.0020 सह रोहन शिंदे थांबला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत झडती घेतली असता त्याच्या डाव्या बाजूच्या कमरेला एक रिव्हॉल्व्हर मिळून आली. तसेच सिटजवळ प्लास्टीकच्या गोणीत तलवार मिळून आली.
त्याला विश्वासात घेवून अधिक चौकशी केली असता त्याने 3 महिन्यापुर्वी सुशांत कुडाळकर याच्याकडून पिस्टल घेतल्याचे सांगत ते पिस्टल परत त्याला दिल्याचे सांगितले. तो कामेरी रोड भागात थांबलेला असतो. पोलिसांनी त्या ठिकाणी जात सुशांत कुडाळकर याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक पिस्टल मिळून आले. याबाबत पोलिसांनी शिंदे व कुडाळकर याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून 1 लाख 81 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल जप्त करणेत आला.
पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अपर अधिक्षक रितू खोखर, उपधिक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय हारूगडे, स.पो.नि. राहुल घुगे, पो.हे.कॉ. संदीप गुरव, पो.कॉ. सतीश खोत, अमोल सावंत, दिपक घस्ते, विशाल पांगे, तौसिफ मुला यांनी कारवाईत सहभाग घेतला.