इस्लामपूरच्या डॉक्टरांची 'सहनशक्तीचा देव : श्री गणेश' थीम
इस्लामपूर :
इस्लामपूर येथील वैद्यकीय क्षेत्रातील सहकाऱ्यांचा गणेशोत्सव दरवर्षी काहीसा वेगळ्याच पद्धतीने साजरा केला जातो. यंदा इंडियन मेडिकल असोसिएशन, इस्लामपूर आयोजित ‘अथर्वोत्सव २०२५’ ला विशेष स्वरूप प्राप्त झाले असून, यावर्षीची थीम आहे – ‘सहनशक्तीचा देव : श्री गणेश’.
गणेश हे केवळ विघ्नहर्ता नव्हे, तर सहनशीलता, ज्ञान आणि भक्तीचे प्रतीक आहेत. जीवनातील अडथळ्यांना धैर्याने सामोरे जाण्याची प्रेरणा गणेशभक्तीमधून मिळते, हा संदेश या थीमद्वारे अधोरेखित करण्यात आला आहे.
इस्लामपूर शहर व वाळवा तालुक्यातील अनेक डॉक्टर दरवर्षी मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. या स्पर्धांतून फिटनेस आणि आत्मशक्तीचा संगम दिसून येतो. "मॅरेथॉन म्हणजे केवळ धावणे नव्हे, तर ती सहनशक्तीची खरी परीक्षा असते. स्वतःशीच स्पर्धा करत उत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते," असे मत डॉक्टरांनी मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर व्यक्त केले.
गेल्या अनेक वर्षांप्रमाणे, यंदाही गणेशमूर्ती प्रतिष्ठापना मॅरेथॉनमध्ये सातत्याने भाग घेणारे ज्येष्ठ डॉ. शिवाजी राजे, डॉ. राम कुलकर्णी आणि डॉ. माधुरी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी आयएमए इस्लामपूरचे सर्व पदाधिकारी आणि वैद्यकीय सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सव भक्ती, शिस्त आणि सहनशीलतेचा संदेश देतो. इस्लामपूरचा ‘अथर्वोत्सव २०२५’ हा यंदा खऱ्या अर्थाने एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उत्सव ठरत आहे.
विशेष म्हणजे, गणपती रस्त्यावर न बसवता IMA च्या सभागृहात बसवला जातो. दरवर्षी सामाजिक भान ठेवून समकालीन घडामोडींवर आधारित देखावे तयार केले जातात आणि त्यातून समाजप्रबोधनाचाही प्रयत्न केला जातो.
प्रतिष्ठापनेवेळी डॉ. अतुल मोरे, डॉ. गोरख मंद्रूपकर, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. कपिल जोशी, डॉ. गणेश माने, डॉ. चंद्रकांत मोरे, डॉ. वंदना मोरे यांच्यासह इतर डॉक्टरांची उपस्थिती होती.
"मॅरेथॉन धावणाऱ्या डॉक्टरांचा फिटनेस, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या ताकदीचा गर्व न बाळगता ती समाजासाठी कशी वापरावी, याचे उत्तम उदाहरण हे डॉक्टर आहेत."
– डॉ. अमितकुमार सूर्यवंशी