इस्लामनेच शिकविले सर्वांना गणित !
काँग्रेस प्रवक्ती शमा मोहम्मद पुन्हा वादग्रस्ततेत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
काँग्रेसच्या प्रवक्ती शमा मोहम्मद यांनी पुन्हा एक नवा वाद निर्माण केला आहे. इस्लामच्या माध्यमातूनच जगाला गणिताची ओळख झाली, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर कडाडून टीका केली असून मुस्लीम लांगूलचालनामध्ये शमा मोहम्मद या राहुल गांधी यांच्याशी स्पर्धा करीत आहेत, अशी खोचक टिप्पणी या पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाचे प्रमुख अमित मालवीय यांनी केली आहे. या पक्षाच्या अन्य नेत्यांनीही मोहम्मद यांना धारेवर धरले आहे.
भारताचा क्रीकेट कप्तान रोहित शर्मा ‘जाड्या’ असून तो निष्प्रभ कप्तान आहे, असे अत्यंत वादग्रस्त विधान या प्रवक्तीने भारताच्या चँपियन्स करंडक स्पर्धेतील उपांत्य सामन्यापूर्वी केले होते. त्यामुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी टीकेचा भडिमार झाला होता. त्यामुळे त्यांना त्यांची टिप्पणी सोशल मिडियातून मागे घ्यावी लागली होती. भारतीय क्रीकेट संघानेही ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सामना 4 गडी राखून जिंकून दिमाखदार पद्धतीने अंतिम फेरीत प्रवेश करुन काँग्रेस प्रवक्तीचे माप तिच्याच पदरात घातले होते. आता पुन्हा मोहम्मद यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
गणिताचा शोध अत्यंत प्राचीन
गणित विषयाचे ज्ञान जगाला इस्लाममुळे झालेले नाही. इस्लाम जन्मालाही आला नव्हता, तेव्हापासून गणित आहे. गणिताचा शोध अत्यंत प्राचीन काळात लागला असून भारताचे आणि हिंदू संस्कृतीचे गणितात इस्लामपूर्व काळापासून अत्यंत मोठे आणि महत्वपूर्ण योगदान आहे. गणितातील सर्वात महत्वाच्या आणि सर्वात विकसीत झालेल्या बीजगणित या शाखेचा शोध तर भारतातच प्रथम लागला आहे. अरबी प्रवासी अल् बुरेनी याने भारतीय बीजगणित आणि भूमितीच्या ग्रंथांचे अरबी भाषेत भाषांतर करुन हे विषय अरब भूमीत पोहचविले होते, असा इतिहास आहे, अशी प्रतिक्रिया मोहम्मद यांच्या विधानावर अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे.
पूनावाला यांचा हल्लाबोल
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही शमा मोहम्मद यांच्यावर टीकेचे कोरडे ओढले आहेत. हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती यांची मानहानी करण्यात राहुल गांधींना स्पर्धा करणाऱ्या काँग्रेसमध्ये केवळ शमा मोहम्मद याच नाहीत. इतरही अनेक उच्चपदस्थ नेते नेहमी हे करीत असतात. सनातन धर्माला विविध रोगांची उपमा देऊन तो नष्ट केला पाहिजे, अशी विधाने करणे, धर्मापेक्षा देशाला अग्रस्थान देणाऱ्या मोहम्मद शमी या गोलंदाजावर, त्याने रोजा पाळला नाही, म्हणून त्याला गुन्हेगार मानणाऱ्या मौलवीच्या विधानांवर सोयीस्कर मौन बाळगणे इत्यादी प्रकारे सनातन धर्माचा अपमान काँग्रेस आणि तिच्या मित्रपक्षांकडून केला जात आहे, असे शहजाद पूनावाला यांनी स्पष्ट केले.