शहरात इस्कॉनची हरेकृष्ण रथयात्रा उत्साहात
शहर कृष्णमय : भक्तांचा उत्साह : पुष्पवृष्टी अन् आकर्षक रांगोळ्या : सजवलेल्या बैलजोड्या-चित्ररथ देखावे आकर्षण
प्रतिनिधी/ बेळगाव
फुलांनी सजविलेला रथ... त्यात विराजमान भगवान जगन्नाथ अर्थात भगवान श्रीकृष्ण, बंधू बलराम व भगिनी सुभद्रा यांच्या मूर्ती, आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या, भगवे झेंडे अन् टाळ-मृदंगांच्या गजरात ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे! हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे’ या भजनात तल्लीन झालेले भाविक अशा भक्तिमय वातावरणात शनिवारी शहरात इस्कॉनची रथयात्रा उत्साहात पार पडली.
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे 27 व्या हरे कृष्ण रथयात्रेला धर्मवीर संभाजी चौकातून प्रारंभ झाला. बेळगाव इस्कॉनचे अध्यक्ष प. पू. भक्तीरसामृत स्वामी महाराज, मूळचे मॉरिशसचे असलेले चंद्रमौली स्वामी महाराज आणि देश-विदेशातून आलेल्या भक्तांच्या हस्ते आरती झाली. त्यानंतर रथयात्रेला प्रारंभ झाला. रथयात्रेत भक्त नामजपात तल्लीन झाले होते. रथयात्रेने शहरातील वातावरणही ‘कृष्णमय’ झाले होते. रथयात्रा मार्गावर व्यापारी भक्तांनी दुतर्फा थांबून दर्शन घेतले. रथयात्रेत इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्री प्रभुपाद यांचा पुतळाही ठेवला होता. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित विविध देखाव्यांमध्ये भीष्म, नृसिंह देव, कालिया मर्दन यांचा समावेश होता.
रथयात्रेत सजविलेल्या बैलगाड्यांसह भगवद्गीतेवर आधारित विविध प्रसंग दर्शविणारे चित्ररथ सहभागी झाले होते. लहान मुलांनाही अध्यात्माची रुची निर्माण व्हावी यासाठी विविध चित्ररथ काढण्यात आले होते. रथयात्रा मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टीही करण्यात आली. त्याचबरोबर भक्तांना पाणी, सरबत, केळी, फळांचे व प्रसादाचे वाटप करण्यात आले.
आकर्षक रांगोळ्या
रथयात्रा मार्गावर सुंदर पुष्पवृष्टी आणि आकर्षक रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यामुळे रथयात्रा मार्गही भक्तिमय झाला होता. विशेषत: दुपारच्या कडाक्याच्या उन्हातही भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. धर्मवीर संभाजी चौकातून सुरू झालेली रथयात्रा पुढे कॉलेज रोड, समादेवी गल्ली, खडेबाजार, शनिवार खूट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली, पाटील गल्लीमार्गे रेल्वे ओव्हरब्रिजवरून कपिलेश्वर रोड, एसपीएम रोड, खडेबाजार शहापूर, नाथ पै सर्कल, बीएमके आयुर्वेदिक कॉलेज रोड, गोवावेसमार्गे इस्कॉनच्या मागे असलेल्या मैदानात सांगता झाली.
स्वच्छतेचा संदेश
रथयात्रा मार्गावर भक्तांनी स्वच्छतेची सेवा केली. रथ निघाल्यानंतर प्लास्टिकचे ग्लास आणि इतर कचरा भक्तांनी स्वत: संकलित केला. शिवाय या यात्रेतून नवीन स्वच्छतेचा आदर्श घालून दिला. यंदा प्रथमत:च हा उपक्रम सर्वांना विचार करावयास लावणारा ठरला. रथयात्रा मार्गावर पाठीमागून भक्तांनी स्वत: कचरा उचलून भक्तीबरोबर स्वच्छतेचे कामही केले.
आज विविध कार्यक्रम
रविवार दि. 2 रोजी सायंकाळी 4.30 ते 5.30 पर्यंत नृसिंह यज्ञ, यामध्ये अनेक भक्त सहभागी होणार आहेत. 6.30 ते 10 पर्यंत भजन, कीर्तन, प्रवचन, नाट्यालिला आणि महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. श्री राधागोकुळानंद मंदिराच्या पाठीमागील बाजूस मंडप उभारण्यात आला आहे. त्या ठिकाणी भगवद्गीता प्रदर्शन, स्लाईड शो, मेडिटेशन पार्क, गोवा सेवा स्टॉल, आध्यात्मिक पुस्तकांचे प्रदर्शन, युवकांना मार्गदर्शन करणारे स्टॉल उभारले आहेत. शिवाय या ठिकाणी भजन, कीर्तन, तसेच ज्येष्ठ संन्याशांची प्रवचने, नाट्यालिला कार्यक्रम होणार आहेत.