इस्कॉनतर्फे ओलमणी येथे गोपाष्टमी साजरी
बेळगाव : इस्कॉनमध्ये कार्तिक मासातील पहिल्या पंधरवड्यातील आठवा दिवस हा गोपाष्टमी म्हणून साजरा केला जातो. यंदा इस्कॉन बेळगाव शाखेच्यावतीने यावर्षी 30 ऑक्टोबर रोजी खानापूर तालुक्यातील ओलमणी येथे इस्कॉनच्या नंदग्राम गोशाळेमध्ये हा दिवस साजरा करण्यात आला. या उत्सवात बेळगावहून अनेक भक्त सहभागी झाले होते. प्रारंभी भजन, कीर्तन झाल्यानंतर इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत महाराज यांचे गोपाष्टमी यावर प्रवचन झाले. आपल्या प्रवचनात ते म्हणाले, जेव्हा भगवान श्रीकृष्ण गोपबालकांसमवेत गायींना चारण्यासाठी वेगवेगळ्या वनात घेऊन जायचे, त्यावेळी त्यांना पौष्टिक चारा मिळायचा. गायी स्वच्छ राहायच्या. त्यामुळे लोकांना चांगले दूध आणि दुधाचे पदार्थ मिळायचे. नंद महाराजांनी वृंदावनात 9 लाख गायी पाळल्या होत्या. अशाच प्रकारे आम्हीही इस्कॉनच्यावतीने नंदग्राम गोशाळेत अनेक गायी पाळल्या आहेत, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, मानवाच्या स्वास्थ्यासाठी गायीच्या दुधाची उत्पादने महत्त्वाची आहेत. आचार्य श्रील प्रभूपाद यांनी गायीच्या दुधाचे मानवजातीला असलेले महत्त्व सांगितले आहे. पण आजकाल जीवनाची मूल्ये हरवत चालली असल्याने विविध प्रकारचा उच्छाद मांडला जात असल्याचे त्यांनी सांगितले. महाराजांच्या प्रवचनानंतर सर्वांनी प्रसादाचा लाभ घेतला.