For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयएस कमांडर अबू खादिजाचा खात्मा

06:55 AM Mar 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
आयएस कमांडर अबू खादिजाचा खात्मा
Advertisement

अमेरिकन सैन्याकडून हवाई हल्ला : इराकच्या गुप्तचर विभागाची मदत : खातरजमा झाल्यानंतर इराक पंतप्रधानांकडून घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/ बगदाद, वॉशिंग्टन

अमेरिकन सैन्याने हवाई हल्ल्यात आयएस म्हणजेच इस्लामिक स्टेटचा कमांडर अबू खादिजाचा खात्मा केला आहे. 13 मार्च रोजी अमेरिकन सैन्याने इराकच्या अल-अनबार प्रदेशात खादिजाची गाडी हवाई हल्ल्याद्वारे उडवून दिली. या हल्ल्यात खादिजा याच्यासह अन्य एक साथीदार मारला गेला आहे. दोघांच्याही हत्येसंबंधी खातरजमा झाल्यानंतर शनिवारी इराकच्या पंतप्रधानांकडून त्यासंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आली.

Advertisement

इराक आणि सीरियामधील इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अब्दुल्लाह माकी मुसलेह अल रिफाई उर्फ अबू खादिजा याचे पर्व अखेर संपुष्टात आले आहे. इराकच्या पंतप्रधानांनी ट्विटरवर शनिवारी यासंबंधी माहिती दिली. इराकच्या  गुप्तचर सेवा आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत खादिजा मारला गेल्याचे इराकी पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांनी सांगितले. पश्चिम इराकमधील अनबार प्रांतातील खादिजाच्या ठिकाणांना हवाई हल्ल्यांनी लक्ष्य करून ही कारवाई करण्यात आली. बशर अल-असदच्या पतनानंतर सीरियामध्ये आयएसच्या उदयाबद्दल इराकी अधिकारी चिंतेत असताना ही कारवाई करण्यात आली आहे.

जगभरातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचे जाळे व्यापलेले आहे. मध्य पूर्वेचा विचार केला तर या प्रदेशातील सर्व देशांमध्ये इस्लामिक स्टेटचे दहशतवादी आहेत. अमेरिका अनेकदा या दहशतवाद्यांवर कारवाई करते. त्याअंतर्गत आणखी एक गुप्त कारवाई करत इस्लामिक स्टेटच्या अबू खादिजा या कुख्यात दहशतवाद्याला ठार मारण्यात आले. अमेरिकेने क्षेपणास्त्र वापरून केलेल्या हवाई हल्ल्यात अबू खादिजाचा मृत्यू झाला. हा हवाई हल्ला अबू खादिजा लपून बसलेल्या इराकच्या अल अन्वर प्रांतात करण्यात आला.

इस्लामिक स्टेट संघटनेचा प्रमुख

अबू खादिजा हा इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा दुसरा प्रमुख आणि जागतिक कारवायांचा प्रमुख होता. तो इराकसाठी ‘मोस्ट वॉन्टेड’ होता. तसेच तो इराक आणि जगातील सर्वात धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक मानला जातो. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात त्याच्यासोबत आणखी एक इस्लामिक स्टेट दहशतवादीही ठार झाला. तो इस्लामिक स्टेटच्या सर्वात महत्त्वाच्या निर्णय घेणाऱ्या गटाचा भाग होता. अबू खादिजा इस्लामिक स्टेटच्या जागतिक कारवाया, रसद आणि नियोजनाची जबाबदारी हाताळत होता. तसेच दहशतवादी संघटनेच्या वित्तपुरवठ्याची हाताळणीही तो करत होता.

दहशतवाद्यांच्या मृतदेहांची ओळख पटली

या हवाई हल्ल्यानंतर अमेरिकन सैनिक क्षेपणास्त्र हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचले आहेत. त्यांनी अबू खादिजा आणि अन्य दहशतवाद्याचे मृतदेह ओळखले. दोन्ही दहशतवाद्यांनी आत्मसंरक्षण जॅकेट परिधान केलेले होते. त्यांच्या तळावरून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. इराकी सैन्याकडे अबू खादिजाच्या डीएनएचा नमुना होता. हा नमुना त्याच्या शरीराशी जुळवल्यावर तो अबू खादिजा असल्याची खात्री पटली आहे.

Advertisement
Tags :

.