टी-20 फलंदाजांच्या मानांकनात इशान किशान अव्वल
वृत्तसंस्था, दुबई
भारताचा आक्रमक यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन याने बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी पुरूष टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत अव्वल स्थान पटकाविले.
वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या टी-20 विश्वचषकातीवल सातत्यपूर्ण कामगिरीमुळे किशन (876 रँकिंग गुण) अव्वल स्थानावर पोहोचला आहे. या स्पर्धेत या डावखुऱ्या आक्रमक फलंदाजाने जवळपास 200 च्या स्ट्राईक रेटने 317 धावा केल्या होत्या. ज्यात कोलंबो येथे पाकिस्तानविरुद्ध सामनावीर ठरलेल्या कामगिरीचाही समावेश होता. अभिषेक (869 रँकिंग गुण) जवळपास 12 महिने अव्वल स्थानावर होता. आता किशन अशा निवडक खेळाडूंच्या गटात सामील झाला आहे. ज्यात विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या या सर्वोच्च स्थानावर पोहोचणारा तो भारताचा चौथा पुरूष खेळाडू ठरला आहे.
या यादीत पाकिस्तानचा साहिबजादा फरहान 948 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ताज्या यादीत भारताचा नवनियुक्त उपकर्णधार तिलक वर्मा (747 रेटिंग गुण) सहाव्या स्थानावर कायम आहे. तर माजी कर्णधार सूर्यकुमार यादाव एका स्थानाच्या घसरणीसह आठव्या क्रमांकावर आला आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या वरुण चक्रवर्ती आणिजसप्रित बुमराह यांची प्रत्येकी एका स्थानाने घसरण झाली असून ते अनुक्रमे तिसऱ्या आणि सहाव्या स्थानावर आले आहेत. अफगाणिस्तानच्या रशीद खानने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. पुरूषांच्या कसोटी फलंदाजी क्रमवारीत ट्रॅव्हिस हेडने थेट अव्वल स्थान गाठले आहे. तर जो रूट तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल एका स्थानाच्या सुधारणेसह सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे तर यशस्वी जैस्वाल एका स्थानाने घसरुन नवव्या क्रमांकावर आला आहे. पहिल्या 10 खेळाडूंमध्ये यादीबाहेर ऋषभ पंत 13 व्या क्रमांकासह सर्वोत्तम मानांकन असलेला भारतीय खेळाडू ठरला आहे. गोलंदाजांमध्ये बुमराह अव्वल स्थानावर आहे.