ईशान खट्टरला मिळाली मोठी संधी
तीन दिग्गज नायिकांसोबत करणार काम
ईशान खट्टरने बॉलिवूडमधील स्वतःच्या कारकीर्दीला 2018 मध्ये ‘धडक’ चित्रपटाद्वारे सुरुवात केली होती. या चित्रपटात तो जान्हवी कपूरसोबत दिसून आला होता. परंतु ईशान त्यानंतर फारसा चमकलेला नाही. चालू वर्ष ईशानसाठी चांगले ठरणार आहे. एकीकडे ईशान लवकरच बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री कॅटरिना कैफसोबत ‘भूत पुलिस’ चित्रपटात दिसून येणार आहे. तर आता त्याला बॉलिवूडच्या तीन दिग्गज नायिकांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.
‘जी ले जरा’ या चित्रपटात ईशान हा आलिया भट्ट, कॅटरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा यांच्यासोबत झळकणार आहे. चित्रपटात ईशानची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगण्यात येत आहे. ईशानच्या नावाची घोषणा करण्यासाठी निर्माते योग्य वेळेची प्रतीक्षा करत आहेत. आलिया, कॅटरिना आणि प्रियांका चोप्राच्या या चित्रपटाचे चित्रिकरण पुढील वर्षी सुरू होणार आहे. या तिन्ही अभिनेत्री सध्या अन्य प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असल्याने या चित्रपटाचे चित्रिकरण आतापर्यंत सुरू होऊ शकलेले नाही. ईशान खट्टरसोबत अन्य कुठले कलाकार सामील असतील याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्याकडून निर्मित होणाऱया या चित्रपटाचे दिग्दर्शन जोया अख्तर करणार असल्याचे समजते.