ईशा सिंगला दोन सुवर्ण, सम्राट राणाला कांस्य
आशियाई रायफल-पिस्तुल नेमबाजी चॅम्पियनशिप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑलिम्पियन ईशा सिंगने मागील वर्षीचा फॉर्म पुढे चालू ठेवताना येथे सुरू झालेल्या आशियाई पिस्तुल-रायफल नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या वैयक्तिक 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण मिळविले तर सांघिक विभागात भारतीय महिलांना सुवर्ण मिळवून देण्यासही मोलाची मदत केली. वर्ल्ड चॅम्पियन सम्राट राणाला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
21 वर्षीय ईशा सिंगने पिछाडीवर पडल्यानंतरही अंतिम फेरीत 239.8 गुण मिळविताना चिनी तैपेईचे दोन नेमबाज चेंग येन चिंग (235.4), व यु अइ वेन (217.7) यांचा तसेच सुरुची सिंगचा कडवा प्रतिकार मोडून काढत सुवर्ण मिळविले. चेंग चिंगने रौप्य तर अइ वेनने कांस्यपदक मिळविले. वरिष्ठ आशियाई चॅम्पियनशिपमधील तिचे हे दुसरे वैयक्तिक सुवर्ण आहे. गेल्या वर्षी तिने आयएसएसएफ वर्ल्ड कपमध्ये तिने सुवर्ण मिळविले होते. 2024 मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेतही तिने वयाच्या 19 व्या वर्षी सुवर्ण मिळविले होते. भारताच्या सुरुची सिंगने अंतिम फेरीत सुरुवात चांगली केली. पण नंतर तिची घसरण झाल्याने तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळविणारी मनू भाकरला सातवे स्थान मिळाले.
पात्रता फेरीत सुरुचीने 576 गुण नोंदवत दुसरे स्थान मिळविले होते तर मनू व ईशा दोघींनीही 575 गुण घेतले. पण मनूला पुढचे स्थान मिळाले. सुरुची (576), मनू (575) व ईशा (575) या त्रिकुटाने एकूण 1726 गुण घेत सांघिक सुवर्ण पटकावले. व्हिएतनामने (1713) रौप्य व चिनी तैपेईने (1711) कांस्य मिळविले.
गेल्या वर्षी कैरोतील वर्ल्ड चॅम्पियनशिमध्ये सुवर्ण मिळविलेल्या सम्राट राणाने पात्रता फेरीत 581 गुण घेत दुसरे स्थान मिळवून आशा निर्माण केल्या होत्या. पण पदकाच्या अंतिम फेरीत त्याने 220.3 गुण मिळविल्याने त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. उझ्बेकच्या व्लादेमिर स्वेचनिकोव्हने (242.0) सुवर्ण, कझाकच्या व्हॅलेरी रखिमझानने (241.0) रौप्यपदक पटकावले. अंतिम फेरी गाठलेला आणखी एक भारतीय शरवन कुमारला चौथे स्थान मिळाले. मात्र सांघिक विभागात भारताला रौप्यपदक मिळाले. सम्राट (581), श्रवण (578), वरुण तोमर (573) यांनी एकूण 1732 गुण घेत सांघिक रौप्य मिळविले तर उझ्बेकच्या संघाने 1732 गुणांसह सुवर्ण, कझाक संघाने 1731 गुणांसह कांस्यपदक मिळविले. इनर 10 मध्ये भारताने 52 तर उझ्बेकने 58 स्कोअर केला होता. त्यामुळे उझ्बेकला सुवर्ण मिळाले.
कनिष्ठ विभागात पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या गविन अँटनीने 240.9 गुण घेत सुवर्ण, किर्गीझच्या इमान्दोस बेक्तेनोव्हने 236.7 गुणांसह रौप्य व मारुफ औलियाने 215.6 गुणांसह कांस्यपदक मिळविले. सांघिक विभागात भारताने 1735 गुणांसह सुवर्ण, कझाकने 1680 गुणांसह रौप्य मिळविले.