इशा सिंगला सुवर्ण तर मनूला कांस्यपदक
वृत्तसंस्था, हांगझोयू
आयएसएसएफच्या विश्वचषक रायफल-पिस्तुल-शॉटगन आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सोमवारी भारताच्या नेमबाज इशा सिंगने सुवर्णपदक तर मनू भाकरने महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजीत कांस्यपदक पटकाविले.
महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजी प्रकारात 21 वर्षीय इशा सिंगने दर्जेदार कामगिरीचे दर्शन घडविताना आपल्याच देशाच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकरला मागे टाकत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या क्रीडा प्रकारात इशा सिंगने 40 शॉट्स नोंदवित सुवर्णपदक मिळविले. तर मनु भाकरने 28 शॉट्स नोंदवून कांस्यपदक मिळविले. पात्र फेरीअखेर मनू भाकरने 586-20×, गुणांसह आघाडीचे स्थान तर इशा सिंगने 585-18× गुणांसह दुसरे स्थान मिळविले होते. या क्रीडा प्रकारात भारताची माजी आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती राही सरनोबतने 582-16× तसेच सिमरनप्रित कौरने 576-20× आणि अभिज्ञा पाटीलने 573-16× गुण नोंदविले. यापूर्वी म्युनिचमध्ये झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत इशा सिंगने कनिष्ठ आणि वरिष्ठांच्या विभागात नवे विश्वविक्रम केले होते. भारताचे क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी इशा सिंग आणि मनू भाकर यांच्या या कामगिरीचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले आहे.
पुरूषांच्या 50 मी. रायफल थ्री पोझीशन्स नेमबाजी प्रकारात भारताच्या ऐश्वर्यप्रताप सिंग तोमर आणि निरजकुमार यांची कामगिरी असमाधानकारक झाली. त्यांना अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तोमरने 314.3 तर निरजने 303.4 गुण नोंदविले. चीनचा ऑलिम्पिक चॅम्पियन झेंग चेंगहाँगने सुवर्णपदक मिळविताना विश्वविक्रमासह 363 गुणांची नोंद केली. हंगेरीच्या पेनीने रौप्य तर पोटापोव्हने कांस्यपदक पटकाविले. या स्पर्धेमध्ये पदक तक्त्यात चीनचा संघ आघाडीवर असून त्यांनी 6 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कांस्य अशी एकूण 13 पदके मिळविली आहेत. जर्मनी आणि अमेरिका पदकतक्त्यात संयुक्त दुसऱ्या स्थानावर असून त्यांनी आतापर्यंत प्रत्येकी 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकाविले आहे.