इशा सिंगला नेमबाजीत कांस्य
वृत्तसंस्था / कैरो (इजिप्त)
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफच्या विश्व नेमबाजी स्पर्धेत भारताची महिला नेमबाज इशा सिंगने महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजी प्रकारात कांस्यपदक पटकाविले. मात्र या क्रीडा प्रकारात भारताची ऑलिम्पिकपदक विजेती मनु भाकरला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
महिलांच्या 25 मी.पिस्तुल नेमबाजी प्रकारात कोरियाच्या विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन नेमबाज यांग जीनने 40 गुणांसह सुवर्णपदक मिळविले. तर चीनच्या याओ क्वियानझूनने 38 गुणांसह रौप्य पदक तर इशा सिंगने 30 गुणांसह कांस्यपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात भारताची अव्वल नेमबाज तसेच दोनवेळा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणारी मनु भाकरने पूर्ण निराशा केली. तिने 23 गुणांसह पाचवे स्थान मिळविले. आयएसएसएफच्या विश्व रायफल-पिस्तुल चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत भारताने एकूण तीन सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्यपदकांसह पदक तक्त्यात तिसरे स्थान मिळविले आहे. चीनने 10 सुवर्णपदकांसह पहिले तर कोरियाने 6 सुवर्णपदकांसह दुसरे स्थान घेतले आहे.