For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईशा सिंग, गुलवीर, श्रीशंकरचे रुपेरी यश

06:55 AM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
ईशा सिंग  गुलवीर  श्रीशंकरचे रुपेरी यश
Nagoya: India's Esha Singh poses with her silver medal won in the women's 25m pistol event during the ongoing 20th Asian Games, in Nagoya, Japan, Monday, Sept. 28, 2026. (PTI Photo/Atul Yadav)(PTI09_28_2026_000123B)
Advertisement

आशियाई गेम्सच्या पदकतालिकेत भारत 12 व्या स्थानी कायम :  भालाफेकमध्ये यशवीरचा थ्रो रौप्यपदकावर, रोहितला कांस्य

Advertisement

वृत्तसंस्था/ नागोया

आशियाई क्रीडा स्पर्धेत सोमवारी नेमबाजीत 25 मी पिस्तूल प्रकारात भारताची युवा नेमबाज इशा सिंगने रौप्यपदकाला गवसणी घातली. अंतिम फेरीत इशाने अखेरच्या क्षणापर्यंत कडवी झुंज दिली; मात्र अवघ्या एका शॉटच्या फरकाने तिचं सुवर्णपदक हुकले. अॅथलेटिक्समध्ये 1500 मी शर्यतीत गुलवीर सिंगने तर 5000 मी शर्यतीत पारुल चौधरीने कांस्यपदक पटकावले. याशिवाय, महिलांच्या 400 मी हर्डल्समध्ये विथ्या रामराजने कांस्यपदक जिंकले आहे. कुराशमध्ये पिंकी बलहाराने शानदार कामगिरी करत कांस्य मिळवले आहे. दरम्यान, स्पर्धेत भारतीय संघ 4 सुवर्णपदकासह एकूण 45 पदकांची कमाई करत 12 व्या स्थानी आहे.

Advertisement

25 मी पिस्तूल प्रकारात ईशाने आपले पदक कायम राखले असून, हे तिचे सलग दुसरे रौप्य पदक ठरले आहे. सोमवारी सकाळी गोल्ड मेडलसाठी अंतिम सामना थरारक ठरला. इशा सिंग आणि चीनच्या नेमबाजात विजेतेपदासाठी जोरदार चुरस दिसून आली. संपूर्ण सामन्यात दोन्ही नेमबाजांनी एकमेकांना कडवी टक्कर दिली. निर्धारित फेऱ्यानंतर दोन्ही खेळाडू 38-38 पॉईंट्समध्ये बरोबरीत राहिल्या. निर्णायक शूट-ऑफमध्ये चिनी खेळाडूने बाजी मारल्याने इशाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

मनू भाकर-राहीची खराब कामगिरी

दरम्यान, दोन ऑलिम्पिक पदकांची मानकरी मनू भाकर महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही. तिने पात्रता फेरीत 579 गुण मिळवत 11वा क्रमांक पटकावला. यापूर्वी स्पर्धेतील महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारातही मनूला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. दुसरीकडे, राही सरनोबतला या प्रकारात पदक जिंकता आले नाही.

नेमबाजीत भारताला 12 पदके

ईशाने आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत भारताच्या खात्यात 7 वे रौप्यपदक जमा केले. यंदाच्या हंगामात भारताला 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळाले आहे. याशिवाय 4 कांस्यपदकांसह नेमबाजीत भारताने आतापर्यंत एकूण 12 पदकांची कमाई केली आहे.

गुलवीर सिंगचा धमाका, 1500 मी शर्यतीत रौप्य

भारताचा अव्वल धावपटू गुलवीर सिंगने पुरुषांच्या 1500 मीटर अंतिम फेरीत 3:36.72 सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले आणि रौप्यपदकावर नाव कोरले. याआधी त्याने पुरुषांच्या 10,000 मीटर अंतिम फेरीतही भारतासाठी रौप्यपदक जिंकले होते. जपानच्या काझुतोने या सुवर्ण तर नागिया मोरीने कांस्यपदक जिंकले आहे. भारतीय लष्करात नायब सुभेदार असणाऱ्या गुलवीरने यंदाच्या स्पर्धेत दुहेरी पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे. त्याच्या यशाचे केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी कौतुक केले आहे. दरम्यान, याच प्रकारात अन्य भारतीय धावपटू युनूस शाह नवव्या स्थानी राहिला. त्याला फायनलमध्ये अपेक्षित अशी कामगिरी साकारता आली नाही.

लांब उडीत मुरली श्रीशंकरला रौप्य

भारताच्या श्रीशंकर मुरलीने पुरुषांच्या लांब उडीत रौप्यपदक जिंकले. दुखापतग्रस्त असूनही, त्याने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 8.07 मीटर उडी मारून दुसरे स्थान पटकावले. चीनच्या शू युहाओने 8.17 मीटरच्या थ्रो सह सुवर्णपदक तर उझबेकिस्तानच्या अन्वर अन्वरोव्हने 8.07 मीटरच्या थ्रोसह कांस्यपदक पटकावले. याच प्रकारात भारताचा डेव्हिड सोलोमन सातव्या स्थानी राहिला. दरम्यान, मुरलीचे हे आशियाई स्पर्धेतील दुसरे पदक ठरले आहे. याआधी त्याने 2023 हांगझाओ स्पर्धेत त्याने रौप्य पटकावले होते.

भालाफेकमध्ये भारताचा दुहेरी धमाका, यशवीरला रौप्य तर रोहितला कांस्य

सोमवारी भालाफेक क्रीडा प्रकारात भारताने दोन पदके जिंकली. भारताच्या यशवीर सिंगने रौप्यपदक पटकावले. त्याने अंतिम फेरीत 85.72 मीटरची भाला फेक करत रौप्य जिंकले. रोहित यादवने 84.35 मीटरच्या कामगिरीसह कांस्यपदक पटकावले. श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेने 88.55 मीटरच्या अंतिम फेरीतील कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले. दरम्यान, रौप्य जिंकणाऱ्या यशवीरची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. दुसरीकडे, नीरज चोप्रा जखमी झाल्यामुळे भारताची मदार यशवीरवर होती. यशवीरनेही निराश न करता पदक जिंकले आहे.

पारुल चौधरीचा दरारा कायम, 5000 मी शर्यतीत जिंकले कांस्य

भारताची स्टार धावपटू पारुल चौधरीने महिलांच्या 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकले आहे. तिने 15 मिनिटे 14.61 सेकंदांची वेळ नोंदवत तिसरे स्थान मिळवले. यासह पारुलने यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी दुसरे पदक पटकावले आहे. बहरीनच्या विनफ्रेड यावीने 15 मिनिटे 10.18 सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक, तर जपानच्या नोझोमी तनाकाने 15 मिनिटे 11.65 सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले. दरम्यान, दोन दिवसापूर्वी पारुलने 3000 मी स्टीपलचेस प्रकारात कांस्य जिंकले होते.

 विथ्या रामराजने पीटी उषाचा विक्रम मोडला

महिला धावपटू विथ्या रामराजने 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. विथ्याने भारताची दिग्गज धावपटू पीटी उषा यांचा तब्बल 42 वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत क्रीडा जगताला थक्क केले आहे. 400 मीटर अडथळा शर्यतीत विथ्या रामराजने अवघ्या 54.75 सेकंदात शर्यत पूर्ण केली. ही तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली. या कामगिरीसह तिने 1984 च्या लॉस एंजिल्स ऑलिंपिकमध्ये पीटी उषा यांनी नोंदवलेला 55.42 सेकंदांचा 42 वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम इतिहासजमा केला. संयुक्त अरब अमिरातीच्या मरियम करीमने 54.31 सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले, तर कझाकस्तानच्या एडेलिना जेम्सने 54.58 सेकंद वेळ घेत रौप्यपदकावर कब्जा केला.

 कुराशमध्ये पिंकी बलहाराने पदक जिंकत रचला इतिहास

‘कुराशच्या महिलांच्या 78 किलो वजन गटात पिंकीने चमकदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे. पिंकी बलहाराने 2018 च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत कुराशमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते. आता नागोयात कांस्य जिंकून तिनं सलग दोन आशियाई स्पर्धांमध्ये पदकावर मोहर उमटवली आहे. सेमीफायनलमध्ये दक्षिण कोरियाच्या मो सुमीन हिच्या आक्रमक चालींसमोर पिंकीला सावरण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई खेळ 2026 मधील कुराश स्पर्धेत महिलांच्या 78 किलो वजनी गटात पिंकीचा प्रवास कांस्यपदकावर संपला.

Advertisement
Tags :

.