14 वर्षांनी ईशाने घेतला घटस्फोट
बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपी राहिली आहेत, जी एकेकाळी स्वत:च्या प्रेमकथेमुळे चर्चेत राहिली होती. अनेक वर्षे एकत्र संसार केल्यावर अचानक ही जोडपी विभक्त होत असल्याचे वृत्त समोर येते. आता आणखी एक जोडपं वेगळे झाले आहे. ईशा कोप्पिकर आणि टिमी नारंग यांचा घटस्फोट झाला आहे. ईशाने पूर्वाश्रमीचा पती टिमी नारंगचे घर सोडले आहे. अभिनेत्री आता स्वत:च्या 9 वर्षीय मुलीसोबत स्वत:च्या पालकांच्या घरी राहत आहे. ईशा आणि टिमीने विवाहाच्या 14 वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी मला काहीच बोलायचे नाही. मला माझे खासगीत्व जपायचे आहे, असे ईशाने म्हटले आहे.
ईशा आणि टिमी नारंगची पहिली भेट जिममध्ये झाली होती. तेथेच ते परस्परांच्या प्रेमात पडले होते. परस्परांना डेट करण्यापूर्वी दोघांनीही मैत्रीचे नाते निभावले होते. 2009 मध्ये त्यांनी विवाह केला होता. तर ईशाने अभिनयाच्या क्षेत्रापासून दूर राहत स्वत:चा व्यवसाय सुरू केला होता. अभिनेत्री आता एक हॉस्पिटॅलिटी कंपनी चालविते.
ईशाने 1998 मध्ये ‘एक था दिल एक थी धडकन’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने ‘फिजा’, ‘प्यार इश्क और मोहब्बत’, ‘कंपनी’, ‘कांटे’, ‘डॉन’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.