हे हॉटेल की गुहा ?
सध्याचे युग कल्पनाशक्तीचे आहे. ज्याच्याजवळ ही कल्पकता असेल, त्याचा व्यवसाय जोरात चालतो असे दिसून येते. व्यवसाय नेहमीचाच असला तरी तो काहीतरी नवी शक्कल लढवून लोकांसमोर आणला की, त्या नाविन्यापोटी लोक त्याला मोठा प्रतिसाद देतात आणि अशा व्यावसायिकाची चांदी होते.
दिल्लीत इंद्रजित नामक एक हॉटेल व्यावसायिक सध्या अशाच कल्पनाशक्तीच्या जोरावर कोट्यावधी रुपये कमावत आहे. त्याने काही वर्षांपूर्वीच हा व्यवसाय हाती घेतला. पण त्याचे हॉटेल नेहमीच्या स्वरुपातील नाही. त्याने या हॉटेलची रचना सिंहाच्या गुहेसारखी केली आहे. त्याचे नावही त्याने ‘केव्ह हॉटेल’ असेच ठेवले आहे. या अनोख्या स्वरुपातील हॉटेलची निर्मिती करण्यासाठी त्याला 40 लाख रुपयांचा खर्च आला आहे. या हॉटेलातील खोल्याही गुहेसारख्याच आहेत. इतकेच नव्हे, तर हे संपूर्ण हॉटेल त्याने स्क्रॅप मालापासून बनविले आहे. त्यामुळे त्याचा निर्मिती खर्च कमी आला आहे. 2018 मध्ये या हॉटेलची रचना पूर्ण झाली.
या हॉटेलला लोकांचा मोठा प्रतिसाद अल्पावधीतच मिळण्यास प्रारंभ झाला. आज या हॉटेलचा प्रारंभ होऊन सहा वर्षे झाली आहेत. याची वार्षिक उलाढाल 10 कोटी रुपयांहून अधिक आहे. अशा प्रकारची वेगळ्या थीम वर आधारित हॉटेले देशाच्या अनेक भागांमध्ये आज आहेत. तथापि, अशा सर्व हॉटेलांपेक्षा या हॉटेलचा व्यवसाय अधिक चालतो, असे इंद्रजित यांचे म्हणणे आहे. अर्थातच, या हॉटेलात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचा आणि सेवेचा दर्जाही उत्तम आहे. कारण नुसता हॉटेलचा आकार बघून इतकी गर्दी तेथे सातत्याने होणार नव्हती. तरीही ही अनोखी कल्पना त्याने साकारल्याने त्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे, ही बाब महत्वाची आहे. अशा कल्पक व्यावसायिकांपासून स्फूर्ती घेऊन अन्य व्यावसायिकही आपल्या कल्पनाशक्तीला चालना देण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे.