‘जल आणि जंगल’ यांचे अस्तित्वच धोक्यात?
जीवनासाठी ऑक्सिजन, अन्न, इंधन यासह अनेक नैसर्गिक संसाधनांची आवश्यकता असते, जी आपल्याला वनातून मिळते. तथापि, राष्ट्रे विकासाच्या दिशेने इतकी प्रगत आहेत की जंगलतोड वाढत आहे आणि जंगलांची जागा उंच इमारती आणि रस्ते इत्यादींनी घेतली आहे. जंगलांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 21 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट जंगलांचे संवर्धन आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणे आहे. हा दिवस आपल्याला आपल्या पृथ्वीसाठी जंगले किती महत्त्वाची आहेत, हे लक्षात ठेवण्याची संधी देतो. जर आपल्याला भावी पिढ्यांसाठी स्वच्छ हवा, पाणी आणि निरोगी वातावरण सुनिश्चित करायचे असेल तर आपल्याला जंगलांच्या संवर्धनाबाबत गंभीर असले पाहिजे. संयुक्त राष्ट्रामहासभेने 21 डिसेंबर 2012 रोजी 21 मार्च जागतिक वनीकरण दिन किंवा आंतरराष्ट्रीय वन दिवस म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा केली. पहिला अधिकृत कार्यक्रम 21 मार्च 2013 रोजी आयोजित केला गेला. हा दिवस उत्तर गोलार्धात वसंत ऋतूतील विषुववृत्त आणि दक्षिण गोलार्धात शरद ऋतूतील विषुववृत्ताच्या जवळ येतो. 21 मार्च रोजी दिवस आणि रात्र समान असतात, जे निसर्ग आणि पर्यावरणाच्या संतुलनाचे प्रतीक आहे. जंगले ही जटिल परंतु महत्त्वाची परिसंस्था आहेत जी जैवविविधतेचे संरक्षण करतात, हवामानाचे नियमन करतात आणि स्वच्छ हवा, पाणी आणि माती संवर्धन यासारख्या आवश्यक सेवा देतात. जागतिक वन दिवस साजरा केल्याने जंगलांचे महत्त्व व त्यांचे संवर्धन आणि शाश्वत व्यवस्थापनाची तातडीची गरज याबद्दल जागरुकता निर्माण करण्याची संधी मिळते. हे वन परिसंस्थांचे संरक्षण करण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर एक व्यासपीठ म्हणून काम करते. हा पर्यावरण जतन करण्याच्या संकल्पाचा दिवस आहे. आजच्या पिढीने वनसंवर्धनासाठी पुढाकार घेतला नाही, तर भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील. प्रत्येक व्यक्तीने झाडे लावणे, जंगलतोड थांबवणे आणि नैसर्गिक संसाधनांचा जबाबदारीने वापर करणे ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी जंगले महत्त्वाची भूमिका बजावतात. सेंद्रिय जैवविविधता टिकवण्यासाठी जंगले आधारभूत आहेत. वनाशेजारील समुदायांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी वने महत्त्वाची भूमिका बजावतात.
जगातील 40 टक्के ऑक्सिजन फक्त अरण्यातून मिळतो. वृक्ष कार्बन डायऑक्साइड शोषून ऑक्सिजन सोडतात, त्यामुळे प्रदूषण कमी होते. जंगल पर्जन्यमान वाढवतात आणि पृथ्वीचे तापमान नियंत्रणात ठेवतात. झाडे उन्हाळ्यात थंडावा आणि हिवाळ्यात उष्णता राखण्यास मदत करतात. जगातील 50 टक्के प्राण्यांची आणि वनस्पतींची जातिविविधता जंगलांमध्ये आहे. अनेक दुर्मिळ प्राणी आणि पक्षी फक्त जंगलांमध्ये आढळतात. जंगलांमधून औषधी वनस्पती, लाकूड आणि अन्न मिळते. अनेक लोकांचे उत्पन्न वनउत्पादनांवर अवलंबून असते. आज जगभरात वने झपाट्याने कमी होत आहेत. यामागची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
वनतोड: अंधाधुंद वृक्षतोड केल्याने जंगलांचे प्रमाण घटते. शहरीकरण आणि औद्योगिकीकरण जंगल तोडून शहरे आणि कारखाने उभे राहत आहेत. वाढते तापमान आणि हवामान बदल ग्लोबल वॉर्मिंगमुळे जंगलांची हानी होत आहे.
वनाग्नि: नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आगीमुळे मोठ्या प्रमाणावर वने जळून नष्ट होतात. जगभरातील अनेक देशांमध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत असताना पाण्याचा प्रचंड अपव्ययदेखील होतो.
दुसरीकडे 22 मार्च हा दिवस जगभरात जागतिक जलदिन म्हणून साजरा करण्यात येतो. ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेनं ‘जागतिक जल दिन’ साजरा करण्याचा 1992 मध्ये निर्णय घेतला. त्यानंतर दरवर्षी 22 मार्चला ‘जागतिक जल दिन’ साजरा करण्यास सुरुवात झाली. स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे त्यासाठी कटिबद्ध राहणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे याची आठवण देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पाण्याचा प्रश्न आज गाव, शहर, तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा सर्व स्तरावर तीव्र बनलेला आहे. शेतीसह विविध उद्योग आणि उर्जानिर्मितीसाठी पाण्याची गरज असते. मात्र, देशाच्या विविध भागांमध्ये पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीनं वापर करून जलसंवर्धन करणं ही काळाची गरज ठरत आहे. समृद्धीसाठी आणि शांततेसाठी पाणी ही संकल्पना घेऊन यंदा जागतिक जलदिन साजरा करण्यात येतो. जगभरातल्या जलसंकटाचा सामना करण्यासाठी जागरूकता निर्माण करून, कृतीला प्रेरणा देणं हे याचं उद्दिष्ट आहे. जागतिक जल दिवस हा 2030 सालापर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता सुनिश्चित करण्याच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी जोडला आहे.
अद्याप 2 अब्जांहून अधिक लोक सुरक्षित पिण्याच्या पाण्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. घाणेरडे पाणी आणि अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांमुळे दर दोन मिनिटांनी पाच वर्षाखालील एका बालकाचा मृत्यू होतो. जगभरातील 447 दशलक्ष मुलं अशा शाळेत जातात जिथे विश्वसनीय स्वच्छ पाण्याची सोय उपलब्ध नाही. 2021 मध्ये, 2 अब्जांहून अधिक लोक पाण्याच्या ताणाखालील देशांत राहत होते. हवामान बदल, लोकसंख्या वाढीमुळे स्थिती आणखी वाईट होईल. सध्याच्या गतीने जग 2049 पर्यंत शाश्वत जल व्यवस्थापन साध्य करणार नाही.
-प्रा. डॉ. गिरीश नाईक