अमेरिका इराणवर हल्ल्यासाठी सज्ज ?
चर्चा फिस्कटल्यात जमा, ट्रंप यांचे सूचक विधान
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिका पुन्हा इराणवर हल्ला करण्यासाठी सज्ज होत असल्याचा संकेत मिळत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी तसे सूचक विधान केले आहे. इराणला केवळ बाँब्जचीच भाषा समजते असा संदेश त्यांनी प्रसारित केला आहे. कोणत्याही परिस्थितीत इराणला अणुबाँबसज्ज होऊ देणार नाही, असा त्यांचा निर्धार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. अमेरिका आणि इराण यांच्यात होत असलेली शांतता चर्चा आता जवळपास फिस्कटल्यात जमा आहे, असेही मानले जात आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने करुन पाहिला. तथापि, पाकिस्तानचा उद्देश स्वच्छ नाही, असा आरोप इराणने केला. पाकिस्तान दुहेरी खेळ खेळत आहे. प्रत्यक्षात तो अमेरिकेच्या बाजूचा आहे, असे स्पष्ट करत इराणने आता चर्चेचे स्थान रशियात नेले असून इराणचे काही नेते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेटले आहेत. त्यामुळे पाकिस्तानची मध्यस्थी इराणने नाकारली आहे काय, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
ट्रंप यांचे विधान
इराणला शब्दांची भाषा समजत नाही. त्याला बाँब्जचीच भाषा कळते. शांतता चर्चेतून काहीही निष्पन्न न झाल्या आम्ही ती अनिर्बंध काळासाठी पुढे चालवू इच्छित नाही, असे संकेत अमेरिकेकडून मिळत आहेत. दोन्ही देशांकडून शब्दयुद्ध मात्र चालविले जात आहे. जे पराभूत असतात ते अटी घालू शकत नाहीत, असे खोचक विधान इराणने नुकतेच केले. तर इराणला आमच्या अटी मानाव्याच लागतील, अशी भूमिका अमेरिकेने घेतली. होर्मुझची सामुद्रधुनी मुक्त करण्याच्या प्रश्नावरुनही दोन्ही देशांमध्ये वाद आहे. त्यामुळे वातावरण तणावग्रस्त बनले आहे.
भारताच्या दोन नौका मुंबईत
अमेरिका आणि इराण या दोघांकडूही होर्मुझची सामुद्रधुनी बंद झालेली असताना, भारताच्या दोन वायू आणि तेलवाहक नौका ही सामुद्रधुनी ओलांडून मुंबईच्या बंदरात पोहचल्या आहेत. त्यामुळे भारतात टंचाई निर्माण होणार नाही, अशी शक्यता आहे. मात्र, अमेरिकेने पुन्हा हल्ला केल्यास युद्धाचा भडका उडू शकतो. भारतानेही ही शक्यता गृहित धरुन पुढची उपाययोजना चालविलेली आहे. शांतता चर्चेचे चित्र येत्या चार ते सहा दिवसांमध्ये स्पष्ट होईल, असे दिसून येते