ट्रम्प विधेयक भारतीयांना लाभदायक?
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्वाच्या कर आणि सरकारी खर्च विधेयकाला अमेरिकेच्या दोन्ही सभागृहांनी संमती दिली आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी आनंद व्यक्त केला आहे. हे विधेयक अमेरिकेला आणखी श्रेष्ठत्वास नेणार आहे, अशी प्रशंसा त्यांनी केली. हे विधेयक अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांनाही लाभदायक ठरणार आहे, असे काही तज्ञांचे प्रतिपादन आहे.
अमेरिकेतून जे पैसे बाहेरच्या देशांमध्ये पाठविले जातात, त्यांच्यावर 5 टक्के कर लावण्याची ट्रम्प यांची प्रथम योजना होती. तथापि, नंतर हा कर त्यांनी कमी केला. अंतिम विधेयकात हा कर 1 टक्का करण्यात आला. यामुळे भारतीयांवरील दडपण बरेच कमी झाले आहे. कारण, अमेरिकेत काम करणारे भारतीय वंशाचे नागरिक मोठ्या प्रमाणात असा पैसा भारतात पाठवितात. आता या पैशांवर केवळ एक टक्का कर असल्याने भारतीयांना आणि भारतालाही दिलासा मिळाला आहे. शिवाय हा एक टक्का करही काही वेशिष्ट परिस्थितीतच लागू होणार आहे. अन्य परिस्थितींमध्ये तो एक टक्का करही लागू केला जाणार नाही.
ट्रम्प यांची स्वाक्षरी होणार
अमेरिकेच्या सिनेट आणि काँग्रेस या दोन्ही सभागृहांनी हे विधेयक संमत केल्यानंतर आता त्यावर अध्यक्षांची स्वाक्षरी आवश्यक आहे. ही स्वाक्षरी लवकरच होणार असून त्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार आहे. अमेरिकेत काम करणारे इतर देशांचे नागरिक अमेरिकेतून जितका पैसा आपल्या देशांमध्ये पाठवितात त्यात भारतीय वंशाच्या नागरीकांचा वाटा सर्वाधिक, अर्थात 14.3 टक्के आहे. 21 व्या शतकातील हा सर्वाधिक वाटा मानला जात आहे. केरळ, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांसाठी हा पैसा (रेमिटन्स) केवळ महत्वाचा नसून येथील नागरीकांचे जीवन त्याच्यावर अवलंबून आहे. या पैशावर आता नगण्य कर द्यावा लागणार असल्याने भारतात येणारा पैसा कमी होणार नाही, अशी शक्यता आहे.
अमेरिकेचा वाटा 28 टक्के
भारतात इतर देशांमधून रेमिटन्सच्या माध्यमाद्वारे जो पैसा येतो, त्यातील 28 टक्के वाटा अमेरिकेतून येणाऱ्या पैशाचा असतो. अमेरिकेने या पैशावर अत्यल्प कर लावल्याने आता तेथील भारतीय मोठ्या प्रमाणावर भारतात पैसा पाठवू शकणार आहेत. यामुळे भारताचाही लाभ होऊन परकीय चलनाचा ओघ कायम राहणार आहे, असे मत अनेक अर्थतज्ञांनी व्यक्त केले आहे.
कंपन्यांवरील करात कपात
ट्रम्प यांच्या या विधेयकाचा लाभ अमेरिकेतील कंपन्यांनाही होणार आहे. त्यांच्यावरील करांचे ओझे कमी होणार असल्याने अमेरिकेची अर्थव्यवस्था अधिक मोकळी होणार आहे. भारतीय वंशाचे जे उच्च उत्पन्न गटातील लोक अमेरिकेत आहेत, ते अशा मोठ्या कंपन्यांमध्ये काम करत आहेत. ट्रम्प यांच्या आर्थिक सुधारणांचा लाभ त्यांना होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ट्रम्प यांचे हे कर आणि आर्थिक सुधारणा विधेयक भारतालाही लाभदायक होणे शक्य आहे. अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांचे उत्पन्न तेथील विदेशी वंशाच्या लोकांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आहे. या वर्गाला या विधेयकामुळे दिलासा मिळेल.