For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज-उद्धवची आघाडी भाजपसाठी बिघाडी?

06:11 AM Dec 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
राज उद्धवची आघाडी भाजपसाठी बिघाडी
Is the Raj-Uddhav alliance a setback for the BJP?
Advertisement

देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नेमका कोणता फरक पडणार, याबाबत अनेक शंका-कुशंका उत्पन्न केल्या जात आहेत. मुंबई ही मराठी माणसांचीच आहे आणि ती महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही, असे आश्वासन देऊन देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सहकार्याने राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडे युती करून निर्विवाद यश प्राप्त केले. या निवडणुकीत ठरल्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या ‘उबाठा’ या शिवसेना गटाचे मोठ्या प्रमाणात पानिपत झाले आणि राज ठाकरे यांच्या ‘मनसे’ या पक्षाची तर अक्षरश: दाणादाण उडाली. गेल्याच आठवड्यात महाराष्ट्रातील जिल्हा पंचायती तसेच नगरपरिषद नगरपालिका यांच्या झालेल्या निवडणुकीत देखील उद्धव ठाकरे आणि ‘मनसे’ यांना प्रचंड प्रमाणात अपयश आले. भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकारी युतीमधील घटकांना महाराष्ट्रातील जनतेने उदंड  प्रतिसाद दिला. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे एकाकी शिलेदार पडले. त्यामुळे त्यांना राज ठाकरेंबरोबर आघाडी करण्याशिवाय दुसरा  पर्याय नव्हता. वास्तविक उद्धव ठाकरे शिवसेना यांनी काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाबरोबर आघाडी केली होती. अखिल भारतीय स्तरावर ‘इंडी’ नावाची आघाडी स्थापन झालेली आहे. त्या आघाडीचे उद्धव ठाकरे यांचा शिवसेना गट हे एक घटक पक्ष आहेत. असे असताना उद्धव ठाकरे यांनी ‘इंडी’ला विचारात आणि विश्वासात न घेता काँग्रेस पक्षाला बाजूला सारून, राज ठाकरेंबरोबर आघाडी केली आणि भारतीय जनता पक्षाला धडा शिकविण्यासाठी ही मंडळी एकत्र आली परंतु त्यांचा हा डाव फसणार तर नाही ना? असा मुद्दा उपस्थित होतो कारण काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी करून उद्धव ठाकरे सेनेने राज्यातील निवडणुका लढविल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत चांगले यश आले खरे परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांचा डाव पूर्णत: फसला. एवढेच नव्हे तर राज्यातील नगरपालिका आणि जिल्हा पंचायत निवडणुकीमध्ये देखील त्यांना मोठे अपयश आले. काँग्रेस पक्षाबरोबर गेल्यामुळे अपयश आले की काय, असा प्रश्न उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना कदाचित पडला असेल. या दोघांनी वीस वर्षानंतर पुन्हा एकत्र येण्याचे ठरविल्याने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात आनंद पसरला परंतु उद्धव ठाकरे यांनी, त्यांचा लढा केवळ भारतीय जनता पक्षाच्या विरोधातच आहे असे नव्हे तर त्यांचा लढा हा शिवसेनेविऊद्ध देखील आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला फेकण्यासाठी त्यांचा हा डाव कितपत यशस्वी होईल, हे आताच सांगता येणार नाही. हे करताना त्यांनी एका बाजूने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढा देण्याचे ठरविले आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या विरोधात पुढे जाण्याचे ठरविले. शेवटी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला उभा राहील. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचा डाव फसण्याची शक्यता आहे कारण काँग्रेसबरोबर सर्वजण एकत्र येऊन देखील जिथे ते यशस्वी होऊ शकले नाहीत, त्या ठिकाणी ज्या राज ठाकरेंचे कुठेही वजन नाही, अशावेळी त्यांच्याबरोबर युती करून शिवसेनेचा उद्धव गट नेमका कोणता दिग्विजय करणार हे कळण्यास मार्ग नाही. मात्र सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तिन्ही घटक एवढे मजबूत आहेत की, त्यांच्याशी लढा देत असताना उद्धव ठाकरेंना काँग्रेसशी देखील लढाई द्यावी लागेल. राज ठाकरेंच्या सभेला मोठी गर्दी जमली तरी या गर्दीचे रुपांतर मतदानामध्ये होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच युतीची घोषणा केल्यानंतर देखील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने महाराष्ट्रात विशेषत: मुंबई महापालिकेत फार मोठा चमत्कार होईल, असे वाटत नाही. केवळ वातावरण निर्मिती मात्र चांगली होऊ शकते. भारतीय जनता पार्टीला तोंड देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जो पर्याय निवडला, त्यातून त्यांनी सध्या त्या पक्षाला आधार असलेल्या काँग्रेसला देखील बाजूला झिडकारले. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीला मुंबई महापालिकेमध्ये लाभ होऊ शकतो. महापालिका निवडणूक ही भाजपसाठी नव्हे तर उद्धव सेनेसाठी अस्तित्वाची लढाई ठरणारी आहे. त्याकरिताच त्यांनी मत विभाजन टाळण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे युती केली. प्रत्यक्षात मात्र काँग्रेस पक्षाला बाजूला सारून उद्धव ठाकरे यांनी जे फासे टाकलेले आहेत, ते कितपत यशस्वी होतील! हा लाख मोलाचा प्रश्न आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. सुऊवातीला त्यांना जनतेची सहानुभूती मिळाली. विधानसभा निवडणुकीत देखील थोडे-फार यश मिळाले परंतु नंतरच्या काळात राज ठाकरे यांना जनतेने पूर्णत: नाकारले. आता त्याच राज ठाकरेंची मदत घेऊन उद्धव ठाकरे यांनी एक नवी खेळी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. या निवडणुकीत देखील उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे हाच एकमेव आधार वाटला. दोन्ही बंधू एकत्र आल्याने ‘उबाठा’मधील कार्यकर्त्यांमध्ये आनंद पसरला मात्र जवळपास 75 टक्के शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राहिल्याने खरेतर गाठ त्यांच्याशीच आहे आणि शिंदेंबरोबर भारतीय जनता पक्ष व त्यांचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने आहेत. या दोघांच्या लढाईत काँग्रेस पक्ष नेमकी कोणती भूमिका घेईल! आणि मुंबई महापालिका निवडणुकीत जय कोणाचा होईल, याबाबत उत्कंठा वाढली. महाराष्ट्रातील महापालिकांची निवडणूक जानेवारीमध्ये होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारी प्रारंभ झालेला आहे. राज आणि उद्धव यांची आघाडी ही महाराष्ट्रात नेमकी कोणकोणत्या महापालिकेमध्ये होईल, याबाबत त्यांनी अद्याप वाच्यता केलेली नाही. शिवाय नेमक्या किती जागांवर त्यांचे वाटप निश्चित आहे, याबाबत दोन्ही नेत्यांनी भाषण केलेले नाही. ही आघाडी भाजप-शिवसेनेची झोप उडवू शकते काय? तेवढी क्षमता या आघाडीमध्ये आहे काय? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. महाराष्ट्राचे राजकारण हे भाजपच्या हाती पोहोचलेले आहे. अशावेळी भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित केलेला आहे. हा त्यांचा प्रयत्न केवळ मुंबई पुरताच मर्यादित राहणार नाही तर इतर महापालिकांमध्ये देखील राहील. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे तर भाजप शिवसेनेसमोर खऱ्याअर्थाने आव्हान निर्माण झालेले असणार. तथापि विधानसभा, जिल्हा पंचायत आणि नगरपालिका निवडणुकीत मिळालेले घवघवीत यश पाहता भाजपसमोर उद्धव-राज यांचे आव्हान कितपत टिकेल, हे येणारा काळच दाखवून देईल.

Advertisement

Advertisement
Tags :

.