विरोधक गलितगात्र? विरोधक शक्तिमान?
राजकारणात नेहमी बदल होत असतो म्हणूनच त्यात मजा असते. गेल्या बारा वर्षात देशाच्या राजकारणाचे एक अजब डबके झाले आहे तो भाग वेगळा. पण आता त्यात हळूहळू बदल होऊ शकतो, अशी चिन्हे मात्र दिसू लागली आहेत. ती कितपत बरोबर अथवा चूक ते येणारा काळ दाखवेल. पण जेव्हढे जास्त एखादा चेंडू पाण्यात दाबला जातो तेव्हढाच जोराने तो नंतर वर उसळतो, हा विज्ञानाचा मूलभूत नियम आहे. त्यामुळे राजकारणातील चित्र बदलले अथवा बदलण्यात विरोधक यशस्वी झाले तर ते परत उसळी मारू शकतात, असे समजायला वाव आहे.
धीकधी राजकीय परिस्थिती अशी विचित्र बनते की नेमके काय होत आहे कळत नाही. सध्याचेच बघा. आपल्या केंद्रशासित प्रदेशाला परत राज्य बनवावे या तृणमूल काँग्रेससारखे पक्ष पालापाचोळ्याप्रमाणे उडून चालले आहेत, मूद्दामहून उडवून लावले जात आहेत असे एक चित्र आहे. तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री आणि त्यांचा टीवीके पक्षाशिवाय कोणत्याही प्रादेशिक पक्षाचे चांगले चालले आहे असे दिसत नाही. प्रत्येकाचे आपले एक वेगळे रडगाणे आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स सत्तेत असली तरी तिला फारसे अधिकारच नाहीत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला वारंवार आपल्या केंद्रशासित प्रदेशाला परत राज्य बनवावे म्हणून केंद्रापुढे साकडे घालत आहेत. वरकरणी केंद्र फारसे बोलत नसले तरी भाजपला ‘बॅकसीट ड्रायविंग’ करायला आवडत असल्याने त्यांच्या हाती काही लागणे सध्यातरी संभव दिसत नाही.
एकेकाळी लालू प्रसाद यादव यांच्यामागे असलेला ससेमिरा सध्या अभिषेक बॅनर्जी आणि ममता बॅनर्जी यांच्यावर आणि त्यांच्या समर्थकांवर आहे. जे फुटायला तयार नाहीत त्यांची घरे देखील जमीनदोस्त केली जात आहेत, असे भयानक आरोप होत आहेत. तृणमूलला तोडण्यासाठी 20 खासदारांची जरुरी आहे, आत्तापर्यंत 19 गळाला लागले आहेत. बिहारसारख्या प्रांतात पानिपत झाल्याने मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा फार काळ बाळगत असलेले राजदचे तेजस्वी यादव दिल्लीत राज्यसभेत आलेले आहेत तर निवडणुकीत यशस्वी होऊन मुख्यमंत्री झालेले नितीश कुमार यांनादेखील त्या सदनात ‘बढती’ देऊन भाजपने पाठवले आहे. एकेकाळी विरोधी पक्षांचे पंतप्रधानपदाची अपेक्षा करणारे नितीश प्रकृती अस्वास्थामुळे तसेच बदलत्या राजकीय परिस्थितीने एव्हढे शांत झाले आहेत की त्यांचा अजिबात काहीच आवाज नाही. अगदी ते आहेत की नाही याविषयी शंका यावी. दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत जेव्हा मोदींना पूर्ण बहुमत मिळाले नव्हते तेव्हा याच नितीश कुमार यांच्या तसेच तेलगू देशमच्या चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावर ते सरकारात आले होते. आता मात्र या मित्र पक्षांच्या नांग्या काढून घेतल्या गेलेल्या आहेत असे दिसत आहे. ज्यांना फार शक्तिशाली समजले जात होते ते नितीश आणि चंद्राबाबू हे आता पाळीव मांजराप्रमाणे आहेत, असे जाणकारांचे सरसकट मत आहे. चंद्राबाबू तर सध्या हिंदुत्वाचे गुणगान गातात असे दिसत आहे.
तात्पर्य काय तर सत्तेबाहेर गेले काय अथवा सत्तेत असले काय, विरोधी पक्षांबरोबर असले काय अथवा भाजपचे साथीदार असले काय, प्रादेशिक पक्षांना ना सत नाही ना गत नाही अशी त्यांची कठीण अवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. सर्वांनाच दंडुका मारला गेलेला आहे असे नाही तर काही जण प्रलोभनाचे बळी आहेत. चंद्राबाबू नायडू सारख्यांना आपल्या मुलाला राजकारणात स्थिर करायचे आहे. या ‘सही दिशा स्पष्ट नीती’ ने गैरभाजप आणि गैरकाँग्रेसी पक्षांची अशी दयनीय स्थिती करून ठेवलेली आहे.
प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व दिवसेंदिवस एव्हढे कोते झाले की त्यांनी आपले पक्ष म्हणजे स्वत:ची जहागीरच बनवून टाकली. ‘मी म्हणेल ती पूर्व, असे नेत्याने केल्याने पक्षातील महत्वाकांक्षी नेत्यांनी नवीन वाटा शोधल्या आणि या पक्षांची अजूनच डबकी झाली. मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा कारभार सुरु झाल्यावर अशा पक्षांच्या ओसाड वाड्या पडू लागल्या त्यात फारसे नवल नाही.
विरोधक शक्तिमान?
राजकारणात नेहमी बदल होत असतो म्हणूनच त्यात मजा असते. गेल्या बारा वर्षात देशाच्या राजकारणाचे एक अजब डबके झाले आहे तो भाग वेगळा. पण आता त्यात हळूहळू बदल होऊ शकतो, अशी चिन्हे मात्र दिसू लागली आहेत. ती कितपत बरोबर अथवा चूक ते येणारा काळ दाखवेल. पण जेव्हढे जास्त एखादा चेंडू पाण्यात दाबला जातो तेव्हढाच जोराने तो नंतर वर उसळतो, हा विज्ञानाचा मूलभूत नियम आहे. त्यामुळे राजकारणातील चित्र बदलले अथवा बदलण्यात विरोधक यशस्वी झाले तर ते परत उसळी मारू शकतात, असे समजायला वाव आहे. त्यात मात्र विरोधक पुढील मार्गक्रमण किती सूज्ञपणाने करतात त्यावर हे अवलंबून आहे हे मात्र नक्की. जर अक्कलहुशारीने काम केले नाही आणि सरकार आणि सत्ताधाऱ्यांची चालाखी ठीकपणे ओळखली नाही तर मात्र देव देखील विरोधकांचे भले करू शकणार नाही ही काळ्या दगडावरची रेष.
जबर गळती लागलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीची गेल्याच आठवड्यात झालेली बैठक त्यामुळेच महत्त्वाची ठरली आहे/ठरणार आहे. तिचा दूरगामी परिणाम होणार आहे. विरोधकांमध्ये नुकत्याच झालेल्या जबर पडझडीच्या पार्श्वभूमीवर ओमर अब्दुल्ला यांनी एक स्पष्टोक्तीच केली. ते म्हंटले: नवीन परिस्थितीत काँग्रेस हा एकमेव पक्ष राहिलेला आहे जो पूर्ण देशभर पसरलेला आहे. त्यामुळे या आघाडीचे नेतृत्व हे केवळ काँग्रेसकडे जाऊ शकते. त्यांची ही स्पष्टोक्ती ममतादीदींना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष टोमणा होता.
विरोधी पक्षातील मीच सर्वात जेष्ठ नेता आहे असे आत्तापर्यंत ममतादीदींचे तुणतुणे होते. त्यामुळे राहुल गांधी यांना जमेल तिथे आणि जमेल तेव्हा कसे दुमडून मुडपता येईल याचेच राजकारण त्यांनी गेली 12 वर्षे केले. एकेवेळी बंगालमध्ये केंद्र जास्त त्रास द्यायला लागले तेव्हा ‘मोदी चांगले, शाह वाईट’ असा सिद्धांत मांडून त्यांनी स्वत:ची गोड फसवणूक करून घेतली आणि आपण किती शहाणे आहोत, हे सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न केला. एकदा त्या दिल्लीला आल्या तेव्हा पत्रकारांनी विचारले होते की तुम्ही सोनिया गांधींना भेटणार का? तेव्हा ‘सोनिया गांधींना का म्हणून भेटले पाहिजे?’ अशा पद्धतीची पृच्छा त्यांनी केली होती.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला विरोध करणारे अरविंद केजरीवाल हे आपणहून विरोधी पक्षांच्या आघाडीतून बाहेर पडले आहेत. काँग्रेसच्या बाबतीत सुंठीवाचून खोकला गेलेला आहे. काँग्रेस त्यांना आता पंजाबसह जिथेतिथे नडणार आहे. नितीशकुमार यांना विरोधी आघाडीचे निमंत्रक बनवले नाही तेव्हा त्यांनी जवळजवळ एका रात्रीत इंडियाला पाठ दाखवली होती. आता काँग्रेसच्या नेतृत्वाला ललकारणारी वा त्याच्याशी अरेरावी करणारी कोणतीही संघटना अथवा नेता राहिला नसल्याने इंडिया आघाडी एकजिन्सी होण्यास मदत होईल, असे जाणकारांना वाटते. नुकत्याच झालेल्या विरोधकांच्या बैठकीत इंडिया आघाडीचे अनभिषिक्त नेते म्हणून उदयाला आलेल्या राहुल गांधी यांनी जे आश्वासक भाषण केले त्याने गेल्या 12-13 वर्षात त्यांनी जे धक्के खाल्ले आहेत, जे घाव सोसले आहेत त्याने ते तावून सुलाखून कसे वर आलेले आहेत ते दिसून आले. मित्रपक्षांच्या कोणत्याही टीकेचे हलाहल आपण शिवभक्ताप्रमाणे सहर्ष प्राशन करू असे आश्वासन देत त्यांनी जर आपण साऱ्यांनी एकदिलाने सत्ताधाऱ्यांच्या जुलुमाला तोंड दिले तर विजय सर्वस्वी आपलाच आहे, असे सांगत आपल्या विरोधकांचा पापाचा घडा आता भरलेला आहे, असे सूचित केले.
सुनील गाताडे