For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साहित्य संमेलन राजकारणासाठी की साहित्यासाठी?

06:06 AM Feb 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
साहित्य संमेलन राजकारणासाठी की साहित्यासाठी
Advertisement

यापूर्वी महाराष्ट्रात केवळ निवडणुकीपुरते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असत, निवडणुकीनंतर मात्र जनतेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरण्याची प्रथा आहे. मात्र 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या पक्षफुटीनंतर प्रत्येक मुद्याचा राजकारणासाठी वापर केला जात असून राजकीय नेत्यांकडून तुफान चिखलफेक सुऊ आहे. या चिखलफेकीसाठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठही सुटत नाही. राजकारणासाठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर ही बाब नवीन नसून सध्याची ताळतंत्र सुटलेल्या राजकीय विधानांनी साहित्य संमेलने ही नेमकी राजकारणासाठी की साहित्य पोषणासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे....

Advertisement

.गेल्या पाच वर्षात जनतेच्या प्रश्नापेक्षा एकमेकांवर विरोधी पक्ष आणि विद्यमान सरकारकडून भरपूर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. हे आरोप प्रत्यारोप करण्यासाठी प्रत्येक क्षेत्राचा वापर केला, मग तो पुरस्कार असो, कोणत्या नेत्याची निवड असो, लालबागचा राजा भविष्यात गुजरातला हलवतील असे केलेले वक्तव्य असो. ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर त्यांना न्याय मिळवून देणे सोडा त्यांनी मोठ्या कष्टाने उभारलेल्या एनडी स्टुडीओचे सरकारने काय केले, उलट देसाई यांच्या आत्महत्येचे राजकारण केले गेले.

आता साहित्य संमेलन गाजले ते राजकीय नेत्यांच्या उपस्थितीने आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याने. त्यामुळे आता साहित्य संमेलन हे कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. मराठी भाषा आणि मराठी साहित्य यावर चर्चा घडावी, त्याचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. यंदा तब्बल 70 वर्षानंतर देशाची राजधानी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन पार पडले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदा होत असलेले हे साहित्य संमेलन गाजले ते राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपाने. दिल्लीत झालेल्या साहित्य संमेलनाचे पडसाद महाराष्ट्रात चांगलेच उमटले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले.

Advertisement

दिल्लीत होणाऱ्या या संमेलनाचे आयोजन सरहद संस्थेने केले. त्यामुळे या संमेलनावर राजकीय नेत्यांचा जास्त प्रभाव असल्याची टीका झाली. ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा दावा त्यांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे एकच गजहब उडाला. गोरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोपाचे राजकीय संमेलन सुरू झाले असून या संमेलनात आता भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी सहभाग घेतला आहे. गेल्या काही दिवसातील महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या वरीष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी तसेच पदांसाठी आरोप प्रत्यारोप करण्याची अहमहमिका लागली आहे.

खालच्या पातळीवर टीका केलेल्यांना माध्यम जास्त प्रसिध्दी देत असल्याने फुकट मिळणाऱ्या सवंग लोकप्रियतेचा जास्तीत जास्त कसा उपयोग होईल हे राजकारण्यांशिवाय कोणाला अधिक चांगले कळणार, साहित्य संमेलनात अनेक विषयांवर चर्चा होत असते. साहित्यातील नवनवीन प्रयोग, डिजिटल माध्यमांच्या प्रभावानंतर साहित्यात झालेले बदल, नव-नवीन लेखकांची ओळख तसेच ग्रामीण भागातील प्रश्न हे प्रामुख्याने साहित्य संमेलनात मांडले जात. साहित्य संमेलनात जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देताना काही ठराव देखील केले जात असत. 1946 मध्ये बेळगाव येथे विसावे मराठी साहित्य संमेलन भरले होते.

या संमेलनाचे अध्यक्ष ग. त्र्यं. माडखोलकर यांनी 12 मे 1946 रोजी संयुक्त महाराष्ट्रासंबंधी एक ठराव मांडला व तो एकमताने संमत करण्यात आला. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महाराष्ट्र एकीकरण समितीने इतिहास घडवला, मात्र ज्या बेळगावमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा ठराव करण्यात आला, ते बेळगाव मात्र अजुनही महाराष्ट्रात आलेले नाही. जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, त्यांचे प्रश्न शासन दरबारी धसास लावण्यासाठी साहित्य संमेलनाचा वापर केला जात होता. 2019 च्या यवतमाळ येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी वैशाली गाडे यांना बोलावण्यात आले होते.

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, दुष्काळ या प्रश्नांवर मोठा उहापोह साहित्य संमेलनात केला जात असे, साहित्याचे आपल्या आयुष्यातील स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. साहित्यातून विचाराची प्रेरणा मिळते, जीवन जगण्याची प्रेरणा नाटकाच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून समाज माणसापर्यंत पोहचत असते. आपल्याकडे साहित्यिकांनी दिलेला प्रगल्भ दृष्टीकोन आहे. जीवन उत्तम पद्धतीने जगायचे असेल तर साहित्य हे महत्त्वाचे अंग आहे. मात्र गेल्या काही वर्षात राजकारण्यांचा हस्तक्षेप साहित्य संमेलनात वाढल्याने या संमेलनात राजकीय नेत्यांचा प्रभाव दिसून येत आहे. दिल्लीत झालेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपामुळे आता एकमेकांची उणी दुणी काढण्याची स्पर्धा लागली आहे. या आरोप प्रत्यारोपातून सर्व सामान्यांना काय प्रेरणा मिळणार हे महत्त्वाचे आहे.

साहित्य संमेलनानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले असून, एकनाथ शिंदे यांना दिलेला पुरस्कार त्यानंतर शरद पवार यांच्यावर त्यांचेच खास असणाऱ्या संजय राऊत यांनी केलेले आरोप, निलम गोऱ्हे यांनी मातोश्रीवर केलेले आरोप, या आरोपानंतर प्रत्यारोप करण्यासाठी लागलेली स्पर्धा बघता खूप राजकीय गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनानंतर महाराष्ट्रात राजकीय संमेलनाची सुरूवात झाली असून, याचा समारोप कधी होणार हे देवच जाणो !

प्रवीण काळे

Advertisement

.