For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणचे शिष्टमंडळ चर्चेसाठी सज्ज ?

06:50 AM Apr 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराणचे शिष्टमंडळ चर्चेसाठी सज्ज
Advertisement

येत्या सोमवारपासून पुन्हा चर्चा होण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था / तेहरान

इराणचे शिष्टमंडळ अमेरिकेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे शिष्टमंडळ शनिवारी पाकिस्तानला जाऊ शकते. तर अमेरिकेचे शिष्टमंडळ येत्या रविवारी पाकिस्तानात जाऊ शकते. दोन्ही शिष्टमंडळांमध्ये सोमवारपासून चर्चेची दुसरी फेरी होऊ शकते. मात्र, अद्यापही या चर्चेवर अनिश्चिततेचे सावट असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे चर्चा झालीच, तर ती कितपत यशस्वी होणार, याचीही कोणती शाश्वती नाही, अशी परिस्थिती आहे. अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व जेडी व्हान्स करणार आहेत.

Advertisement

दोन्ही देशांमधील चर्चेची पहिली फेरी अयशस्वी ठरली होती. 21 तास सलग चर्चा होऊनही तोडगा निघाला नव्हता. त्यानंतर अमेरिकेने शस्त्रसंधीच्या कालावधीत वाढ केली आहे. तर इराणने अमेरिकेशी चर्चा करण्यात कोणतेही स्वारस्य नाही, असे दर्शविले आहे. तरीही चर्चा केली जाईल, असे राजकीय वर्तुळात मानले जाते.

इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची चर्चा

इराणचे विदेश व्यवहार मंत्री अरघाची यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दर यांच्याशी शुक्रवारी दूरध्वनीवरुन चर्चा केली. त्यामुळे पुन्हा चर्चेच्या दुसऱ्या फेरीच्या वृत्तांना उजाळा मिळाला. चर्चेसाठी इराणचे सध्याचे नेते पेजेश्कियान हे पाकिस्तानला जाऊ शकतात, अशी माहिती देण्यात आली. तथापि, अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे नेमके काय होणार आहे, हे आणखी एक दोन दिवसांमध्ये समजून येईल, अशी शक्यता आहे. मात्र, साशंकता कायम आहे.

इराणचा पाकिस्तानवर हल्ला ?

शांतता चर्चेचे वातावरण असताना इराणने पकिस्ताच्या काही दहशतवादी संघटनांच्या तळांवर शुक्रवारी हल्ला केला, असे वृत्त आहे. या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाल्याचा दावा इराणकडून करण्यात आला. हा हल्ला क्षेपणास्त्रांनी करण्यात आला होता. इराण आणि पाकिस्तानच्या सीमेवर काही पाकिस्तानी दहशतवादी संघटना इराणच्या विरोधात कार्यरत आहेत, असा इराणचा आरोप आहे. पाकिस्तान, अमेरिकेशी चर्चा करण्याच्या संदर्भात दुहेरी डाव टाकत असल्याचा संशय इराणने व्यक्त केला आहे. पाकिस्तानने आरोप नाकारला आहे.

ट्रंप यांच्याकडून भारताची प्रशंसा

चीन, भारत आणि इतर काही देश ही नरकाची प्रवेशद्वारे आहेत, असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केले होते. अमेरिकेत जन्म झालेल्या बालकाला अमेरिकेचे राष्ट्रीयत्व मिळते, असा नियम आहे. या नियमाचा दुरुपयोग चीन, भारत आणि इतर काही देशांनी केल्याचे ट्रंप यांचे म्हणणे आहे. भारताने त्यांच्या या व्यक्तव्याचा निषेध केला होता. हे वक्तव्य चुकीच्या माहिती आधारित आणि चुकीच्या पद्धतीने केले आहे, असे भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने स्पष्ट करत ट्रंप यांचे आरोप ठाम भाषेत फेटाळले होते. त्यानंतर गुरुवारी डोनाल्ड ट्रंप यांनी भारताची प्रशंसा केली आहे. भारताविषयी मला आणि अमेरिकेला नेहमी आदर वाटत आलेला आहे, हे ट्रंप यांचे नवे विधान आहे.

Advertisement
Tags :

.