For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संघर्ष मूल्यांसाठी की मौल्यवान खनिजासाठी?

06:33 AM Mar 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
संघर्ष मूल्यांसाठी की मौल्यवान खनिजासाठी
Advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळाला युक्रेनचा मासा काही लागला नाही. व्हाइट हाऊसमधील बोलणी फिसकटली. कोण कृतज्ञ आणि कृतघ्न यापेक्षाही मानवी कल्याण महत्त्वाचे आहे. संघर्ष लोकशाही मूल्यांसाठी व्हावा ही अपेक्षा होती. पण हा संघर्ष मूल्यांचा की खनिजासाठीचा असा बिकट प्रश्न पडतो. आता निर्विवाद शांतता तोडगा निघाला नाही तर तिसरे महायुद्ध नव्या जगापुढे अटळ राहिल काय? हा प्रश्न व्यथित करणारा आहे.

Advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यालयात झेलेन्स्की पोहोचले. परंतु वादावादी, शाब्दिक चकमकी आणि टोकाचे मतभेद यामुळे करारावर सह्या झाल्या नाहीत आणि आता युक्रेनमध्ये शांतता हे एक मृगजळ ठरले आहे. ज्या पद्धतीने ट्रम्प यांनी प्रस्ताव दिला होता आणि युरोपीय देश झेलेन्स्की यांच्या बाजूने उभे होते त्यामुळे हा करार झेलेन्स्की किती मान्य करतील याबद्दल शंका होती. अमेरिकेच्या मदतीबद्दल युक्रेन कृतज्ञ नाही याचा खेद डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी

व्हॅन्स या दोहोंच्या आक्रमक पावित्र्यामुळे झेलेन्स्की यांनी पडत्या फळाची आज्ञा घेऊन चर्चेतून माघार घेतली. खरेतर, डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीसाठी केलेल्या प्रस्तावात थोडी दुसरी बाजू लंगडी होती. कारण रशियाने पुन्हा आक्रमण न करण्याची हमी युक्रेनला हवी होती. पण तशी हमी देण्याची तरतूद नसल्यामुळे झेलेन्स्की साशंक होते. शिवाय ज्या पद्धतीने खनिज संपत्तीवर ताबा मिळविण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न होता तोही झेलेन्स्की यांना पटलेला दिसत नाही. हा संघर्ष शांततेसाठी झाला असे म्हणता येईल काय? खरेतर, कुठलाही प्रस्ताव जेव्हा उभय बाजूंना मान्य होतो तेव्हा तो थोडासा सर्वसमावेशक असावा लागतो. पण तसे घडले नाही. त्यामुळे चर्चेचे वादळ कोणतेही फलित न देता घोंघावत राहिले आणि झेलेन्स्की निघून गेले.

Advertisement

चतुर ट्रम्प आणि सावध झेलेन्स्की?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मोठे मुत्सद्दी, चतुर आणि व्यवहारी आहेत. कुठल्याही प्रश्नात डिल कशी करावी आणि अमेरिकेचा नफा कसा करता येईल यावर त्यांचा भर असतो. रशिया आणि युक्रेन युद्धाला तीन वर्षे झाली. या तीन वर्षांनंतर हे युद्ध संपावे अशी अपेक्षा होती. या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी हे युद्ध आपण थांबवू असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे 21 जानेवारीला कार्यालयात पाऊल ठेवल्यानंतर महिन्याच्या आतच त्यांनी युद्धाची तीव्रता कमी केली आणि आता प्रत्यक्ष युद्ध नियंत्रणात आणले आहे. पण असे करताना जगाच्या कल्याणाचा विचार करण्यासाठी अमेरिका रिकामी नाही. त्यात अमेरिकेचे झालेले नुकसान भरून काढले पाहिजे हा त्यांचा विचार अमेरिका फर्स्ट या धोरणास अनुसरून होता.

खनिज कराराचे इंगित?

युक्रेनकडे पृथ्वी खनिजांचा मोठा अनमोल साठा आहे. त्यामध्ये युरेनियमसारख्या धातूचा समावेश आहे. अमेरिकेला अणुऊर्जेपासून सेमी कंडक्टरपर्यंत अनेक मौल्यवान वस्तूंच्या निर्मितीसाठी या खनिजांची विशेष गरज आहे. या संभाव्य करारामुळे अमेरिकेची या खनिज संपत्तीतील भागीदारी वाढणार आहे आणि युक्रेन युद्धावर अमेरिकेने जो अमाप खर्च केला तो भरून काढण्याची मोठी संधी या करारामुळे अमेरिकेला लाभणार आहे असा ट्रम्प यांचा दावा आहे. पण या बाबतीत आणखी एक गोष्ट अशी की, पुढे रशिया युद्धच करणार नाही अशी सुरक्षेची हमी युक्रेनला हवी आहे आणि अशी हमी देण्यात मात्र अनिश्चितता असल्यामुळे युक्रेनच्या नेत्यांना याबद्दल शंका वाटणे साहजिक आहे. या पार्श्वभूमीवर हा करार कसा फिसकटला ते लक्षात घेण्यासारखे आहे.

किती झाला खर्च?

अमेरिकेने युक्रेनची बाजू घेतली आणि रशिया विरुद्ध पवित्रा घेतला. नाहीतर अमेरिका पूर्णपणे युक्रेनला पराभूत करू शकली असती आणि युक्रेनला आपले सर्वस्व गमवावे लागले असते. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युद्ध सामुग्री, लष्करी सहाय्य, रसद या सर्व बाबतीत अमेरिकेचा किती खर्च झाला याचा विविध प्रकारे अंदाज केला जात आहे. हा खर्च किती झाला याबद्दल तीन सूत्रे उपलब्ध आहेत. कीव येथील संशोधन संस्थेने एक अहवाल प्रकाशित केला. शिवाय ट्रम्प यांचा एक स्वतंत्र दावा आहे. अन्य काही संस्थांनीही काही अंदाज व्यक्त केले आहेत. या सर्वांचा तौलनिक अभ्यास केला असता या खर्चाचा अंदाज येऊ शकतो. नाटो देशांनी 35 लाख अब्ज डॉलर्स एवढा युक्रेनवर खर्च केला. त्यापैकी जर्मनी आणि अमेरिकेने 15 टक्के खर्च केला होता. ट्रम्प यांच्या मते, अमेरिकेने 375 दशलक्ष डॉलर्स खर्च केले तर कीवच्या मते, हा आकडा 175 दशलक्ष डॉलर्सच्या पुढे जात नाही. तीन वेगवेगळे आकडे दिले जात आहेत. ट्रम्प खर्च फुगवून सांगतात असे विश्लेषकांना वाटते. बायडेन यांच्या काळात अमेरिकेच्या कर उत्पन्नातून झालेला हा युद्ध खर्च भरून काढावा असे ट्रम्प यांना वाटते.

युरोपचा विश्वामित्री पवित्रा?

फ्रान्स असो, इंग्लंड असो की अन्य युरोपीय देश या सर्व देशांना ट्रम्प यांची युक्रेनमधील ही लुडबूड फारशी योग्य वाटलेली नाही. या कराराच्या हालचाली सुरू झाल्या आणि 12 युरोपीय राष्ट्र प्रमुखांनी कीवला धाव घेतली आणि त्यांनी झेलेन्स्की यांना सहानुभूती दाखविली, समर्थन केले. आता कीव पुढे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे युरोपीय राष्ट्रांच्या समर्थनाने संघर्ष चालू ठेवायचा किंवा दुसरा म्हणजे ट्रम्प म्हणतील ते निमूटपणे मान्य करून शांततेचा करार करावयाचा. आता प्रे. ट्रम्प महोदय बायडेन प्रमाणे कीवच्या पाठीशी भक्कमपणे कसे उभे राहणार? कारण ते पुतीन यांचे समर्थक आहेत. पुतीन यांना चतुर, मुत्सद्दी असा नेता ते मानतात आणि कीव यांना हुकूमशहा व जोकर म्हणतात. अभिनेता झेलेन्स्की यांच्यापेक्षा मुत्सद्दी पुतीन यांच्यावर त्यांचा अधिक विश्वास आहे. त्यामुळे युरोपीय राष्ट्रे बिथरली आहेत. आता युरोपीय देशांनी जर स्वतंत्र वेगळी चूल मांडली आणि ट्रम्प यांना फूस देण्याचा प्रयत्न केला तर ट्रम्प यांची मोठी पंचाईत होईल. परंतु युरोपीय राष्ट्रांच्या तुलनेने अमेरिकेची शक्ती मोठी आहे आणि कराराचा दायराही मोठा आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी टाकलेले जाळे मोठे अद्भुत आहे. या जाळ्यात झेलेन्स्की यांचा मासा जवळजवळ सापडण्याच्या मार्गावर होता. पण त्यांनी तडकाफडकी सुटका करून घेतली. म्हणजे एका दगडात ट्रम्प दोन पक्षी मारू इच्छित होते.

तिसऱ्या महायुद्धाचे सावट?

डोनाल्ड ट्रम्प अशी शेखी मिरवित आहेत की, माझ्या करारामुळे, अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे रशिया व युक्रेनमधील लाखो निष्पाप लोक जे मरत होते तेही बचावतील आणि युक्रेनमधील असंख्य लोकांना दररोज मृत्यूला सामोरे जावे लागत होते त्यांचेही मरण टळेल. म्हणजे युक्रेन आणि रशिया दोन्ही बाजूंनी सैनिकांची जी मोठ्या संख्येने हत्या होत होती ती थांबेल. जीवित आणि वित्त हानी थांबेल. असे ट्रम्प यांना म्हणावयाचे होते. ट्रम्प यांच्या निवेदनातील प्रबळ आत्मविश्वास हा त्यांच्या मिजिगिशु वृत्तीचा द्योतक होता पण अतिविश्वास नडला आणि झेलेन्स्की यांनी प्रतिवाद करून वातावरण तापविले. सगळ्या जगाच्या माध्यमापुढे जो तमाशा झाला तो खेदजनक ठरला. झेलेन्स्की-ट्रम्प यांची संयुक्त पत्रकार परिषद झालीच नाही. तथाकथित मोठा करार खोटा ठरला आणि त्याचे सूप वाजले.

सहा प्रमुख पैलू?

या संभाव्य कराराचे म्हणजे अमेरिका व युक्रेनमध्ये झालेल्या संभाव्य कराराचे सहा प्रमुख पैलू होते. त्या पैलूंवर या कराराची सारी मदार अवलंबून होती. पहिला पैलू असा की, कीवने अमेरिकेचे म्हणणे ऐकावे आणि युद्ध थांबवावे. कारण युद्ध थांबविले नाही तर दोन्ही बाजूंनी विनाश अटळ आहे. या कराराचा दुसरा पैलू असा आहे की, अमेरिकेचे युक्रेनची बाजू घेण्यासाठी जेवढे डॉलर खर्ची पडले ते पूर्णपणे वसूल करावयाचे होते आणि ट्रम्प यांना ते नुसते वसूलच करावयाचे नव्हते तर या निमित्ताने खनिज संपत्तीवर मालकी प्रस्थापित करून साधनशक्तीचा एक महत्त्वाचा स्रोत काबीज करावयाचा होता. त्यामुळे अमेरिकेतील संगणक उद्योग, तसेच अणू प्रकल्प यासाठी कच्चा माल उपलब्ध होऊ शकला असता. तिसरा मुद्दा असा होता की, रशियाला प्रतिशह देण्यात अमेरिका योजकतेने यशस्वी होईल कारण तिकडे रशियालाही खुश करता येईल आणि इकडे युक्रेनलाही आपल्या पंजात पकडता येऊ शकेल. चौथा महत्त्वाचा पैलू म्हणजे या करारामुळे युक्रेन व रशियाचे झालेले नुकसान भरून निघेल आणि पुनर्वसनाचा मोठा कार्यक्रम सुरू होईल. पाचव महत्त्वाचा पैलू म्हणजे युक्रेनमध्ये अस्थिरता कमी होईल. तेथे निवडणुका होतील आणि झेलेन्स्की यांचे भवितव्य ठरेल. सहावा महत्त्वाचा पैलू म्हणजे तीन वर्षे युद्धामुळे जे प्रचंड नुकसान झाले ते कमी करता येईल आणि युरोपीय राष्ट्रांना दूर ठेवून अमेरिकेला युक्रेन व रशिया या दोहोंवरही आपले वर्चस्व निर्माण करणे शक्य होईल.

दुर्मिळ पृथ्वी खनिजे?ं

युरोपियन युनियनच्या प्रभाव क्षेत्रात येणाऱ्या खनिज संपत्तीमध्ये 34 पैकी 22 महत्त्वाची खनिजे एकट्या युक्रेन देशात आहेत. ग्रॅफाईट हे सर्वात महत्त्वाचे खनिज युक्रेनमध्ये उपलब्ध आहे. जगातील एकूण साठ्यापैकी 6 टक्के हा धातू युक्रेनमध्ये सापडतो. तसेच लिथियम हा आकारमानाने सर्वात मोठा धातू आहे. आयर्न बॅटरीमध्ये वापरला जातो. तसेच ग्रॅफाईटचा वापर अणुभट्ट्यापासून पेन्सिलपर्यंत होतो. युक्रेनियन भूगर्भीय सर्व्हेक्षणानुसार त्याचा 6 टक्के साठा असून तो युरोपातील सर्वात मोठा साठा युक्रेनकडे आहे. लिथियम हा धातू जगातील साठ्यापैकी 1.2 टक्के युक्रेनकडे आहे. अंदाजे 500,000 मेट्रीक टन लिथियम युक्रेनकडे आहे. बॅटरी, सिरॅमिक आणि काचेसाठी लिथियम वापरला जातो. टायटेनियम हा आणखी एक महत्त्वाचा धातू असून त्याच्या जागतिक साठ्यापैकी 1 टक्के युक्रेनमध्ये आहे. त्याची अमेरिका आणि युरोपची मागणी 25 वर्षापर्यंत पूर्ण करण्याची क्षमता युक्रेनकडे आहे. जागतिक साठ्याच्या 2.4 टक्के युरेनियमचा साठा युक्रेनकडे आहे. अणुऊर्जा जनरेटरसाठी युरेनियमचा वापर केला जातो. रशिया आणि चीन जगातील सर्वात मोठा म्हणजे 55 टक्के युरेनियमचा पुरवठा  सध्या करतात. भूगर्भशास्त्र संस्थेच्या मते, टीव्ही आणि प्रकाशयोजनेत वापरल्या जाणाऱ्या लिथियम आणि ग्रॅफाईट व तत्सम दुर्मिळ पृथ्वी धातू युक्रेनमध्ये उपलब्ध आहेत. पवन ऊर्जेसाठी वापरण्यात येणाऱ्या टर्बाइन आणि बॅटरीमध्ये त्याचा उपयोग होतो. तसेच युरेनियमचा अणुऊर्जा प्रकल्पात बहुउद्देशीय वापर होतो. युक्रेनच्या सीमावर्ती भागातील 40 टक्के युरेनियम साठ्यावर आजही रशियाचा ताबा आहे.

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

Advertisement
Tags :

.