For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोकुळचे चेअरमनपद मंत्री मुश्रीफ गटाकडे?

11:47 AM May 21, 2025 IST | Radhika Patil
गोकुळचे चेअरमनपद मंत्री मुश्रीफ गटाकडे
Advertisement

कोल्हापूर / धीरज बरगे :

Advertisement

गोकुळचा चेअरमन महायुतीचाच हवा या रणनितीमुळे गोकुळच्या चेअरमन पदासाठी शशीकांत पाटील-चुयेकर यांच्या नावासह वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ गटाचीही चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे चेअरमन पदासाठी सर्वमान्य चेहरा म्हणून पुढे आलेले संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव आता जर-तर मध्ये अडकले आहे. मंत्री मुश्रीफ गट चर्चेत आल्याने नविद मुश्रीफ, रणजीतसिंह पाटील, किसन चौगले यापैकी एका संचालकाला चेअरमन पदी संधी मिळू शकते. त्यामुळे सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांमध्ये ठरल्याप्रमाणे शशिकांत पाटील-चुयेकरच चेअरमन होणार का, मंत्री मुश्रीफ गटाला चेअरमन पदी पुन्हा संधी मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

गोकुळमध्ये झालेल्या सत्तांतरानंतर पहिली दोन वर्ष आमदार सतेज पाटील गटाचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांना चेअरमन पदी संधी देण्यात आली. यानंतरची दोन वर्ष मंत्री हसन मुश्रीफ गटाचे संचालक अरुण डोंगळे यांना चेअरमन करण्यात आले. डोंगळे यांची 25 मे रोजी चेअरमन पदाची मुदत संपत आहे. त्यामुळे गोकुळमध्ये चेअरमन बदलाच्या हालचाली सुरू होत्या. दरम्यान 14 मे रोजी विद्यमान चेअरमन अरुण डोंगळे यांनी थेट मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. भेटी दरम्यान झालेल्या चर्चेनंतर डोंगळे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा न देण्याबाबत सूचना केल्याने आपण चेअरमन पदाचा राजीनामा देणार नाही अशी भूमिका घेतली होती. डोंगळे यांच्या चेअरमन पदाच्या राजीनाम्यावरून आठवडाभर सुरू असलेल्या नाट्यामय घडामोडींवर मंगळवारी अखेर पडदा पडला असून चेअरमन डोंगळे यांनी त्यांच्या प्रतिनिधीकडून गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. 22 रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये त्यांचा राजीनामा मंजूर होईल.

Advertisement

दरम्यान राजीनामा देण्यापूर्वी सोमवारी दुपारी चेअरमन डोंगळे यांनी मुंबई गाठली होती. तर मंगळवारी मंत्री मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन निवडणुकीदरम्यान ठरलेल्या फॉर्मुल्याची वस्तूस्थिती सांगणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार चेअरमन डोंगळे यांनी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर राजभवनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन राजीनामा देत असल्याचे सांगितले. तसेच मंत्री मुश्रीफ यांनी देखील मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन चर्चा केली. चेअरमन महायुतीचाच हवा या भूमिकेवर वरिष्ठ नेते कायम असल्याचे समजते. त्यामुळे गोकुळमध्ये पुन्हा मंत्री हसन मुश्रीफ गटाचा चेअरमन होण्याची दाट शक्यता आहे.

  • चुयेकर यांच्या समोर मुश्रीफ गटाचे आव्हान

गोकुळचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचे सुपुत्र म्हणून गोकुळच्या सत्ताधारी आघाडीकडून संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव चेअरमन पदासाठी पुढे करण्यात आले. पाटील यांचा चेहरा सर्व मान्य होईल अशी अपेक्षा होती. मात्र महायुतीचाच चेअरमन व्हावा या रणनितीमुळे चुयेकर यांच्या समोर मुश्रीफ गटाचेच आव्हान उभे असणार आहे.

  • राजकीय जोडणीतून चुयेकर यांचे नाव पुढे

गोकुळमधील सत्ताधारी आघाडीत महायुती व महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्यामुळे पुढील वर्षभरासाठी होणाऱ्या चेअरमन निवडीवर पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांचा प्रभाव आहे. तोंडावर गोकुळची निवडणूक असल्याने सत्ताधारी आघाडीमधील नेते नाराज होऊ नयेत या उद्देशाने गोकुळचे संस्थापक स्व. आनंदराव पाटील चुयेकर यांचे सुपुत्र म्हणून शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव पुढे केले तर नेते नाराज होणार नाहीत, या राजकीय जोडणीतून चुयेकर यांचे नाव पुढे आले असल्याची चर्चा आहे. पण चुयेकर यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे.

  • मंत्री मुश्रीफ गटात कोणाला संधी?

मंत्री हसन मुश्रीफ गटाचे गोकुळ मध्ये तीन संचालक आहेत तर ए. वाय. पाटील गटातून निवडून आलेले पण सध्या माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासोबत असणारे किसन चौगुले हे देखील तसे राष्ट्रवादीचेच संचालक आहेत. मुश्रीफ गटाचे अरुण डोंगळे यांना पुन्हा चेअरमन पदी संधी मिळणार नाही आहे. त्यामुळे मंत्री मुश्रीफ गटातून मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील यांचे चिरंजीव रणजीतसिंह पाटील आणि संचालक किसन चौगले यापैकी चेअरमनपदी कोणाला संधी मिळणार हे पुढील काळातच स्पष्ट होणार आहे.

  • नविद मुश्रीफ यांना संधी?

चेअरमन बदलाच्या घडामोडीत मंत्री मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेत प्रसारमाध्यमांशी बोलताना नविद मुश्रीफ यांना चेअरमन करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तर डोंगळे यांना पुन्हा संधी मिळणार नसल्याने रणजीतसिंह पाटील व किसन चौगुले हे दोनच संचालक मुश्रीफ गटाचे आहेत. पण राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील राजकारणातून या दोन्ही संचालकांच्या नावांना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून विरोध होण्याची शक्यता आहे. गोकुळमधील सत्ताधारी आघाडीमध्ये बिघाडी नको असेल तर नाविद मुश्रीफ यांचाच चेहरा सर्वमान्य होऊ शकतो. त्यामुळे महायुतीचाच चेअरमन व्हावा या रणनितीमुळे नाईलाजास्तव मंत्री मुश्रीफ यांना नविद मुश्रीफ यांनाच पुढील वर्षभरासाठी चेअरमन करावे लागणार आहे.

Advertisement
Tags :

.