For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘बिडदी’चा दांडा गोतास काळ...?

06:30 AM Jul 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘बिडदी’चा दांडा गोतास काळ
Advertisement

वारंवार आपण कारागृहाला जाऊन आलो आहोत, असे मुख्यमंत्री सांगत असतात. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात कारावास भोगला आहे का? त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी पापभावना दिसून येतात. सत्ता कायमची नाही, सर्व काही काळ ठरवत असतो. मुख्यमंत्रिपदावर राहण्याची एक चांगली संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करा, असे सांगतानाच टाऊनशिपच्या नावाने शेतकऱ्यांवर अन्याय करू नका, असा सल्ला कुमारस्वामी यांनी दिला आहे. बिडदी टाऊनशिपचा मुद्दा येथेच संपेल, असे वाटत नाही.

Advertisement

कर्नाटकात मंत्रिमंडळ विस्तारासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हायकमांडच्या भेटीसाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे सध्या नवी दिल्लीत आहेत. त्यांच्या पाठोपाठ माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रभावी नेते सिद्धरामय्या व प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद हेही हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. या नेत्यांच्या बैठकीनंतर मंत्र्यांची यादी अंतिम होणार आहे. सर्व काही ठरल्याप्रमाणे झाले तर येत्या सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. 20 नव्या मंत्र्यांना संधी मिळणार आहे. आता मंत्रिपदासाठी अनुभवी नेत्यांची निवड करणार की नव्या चेहऱ्यांना संधी देणार? हे अद्याप ठरायचे आहे.

सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळात कोण असावे? कोणाचा सहभाग नसावा, याचा निर्णय ते स्वत: घ्यायचे. आता आपल्या मंत्रिमंडळात कोणाला घ्यावे? हे ठरविण्याचा अधिकार आपल्यालाच मिळावा, यावर डी. के. शिवकुमार ठाम असले तरी आपल्या समर्थकांना मंत्रिमंडळात पाठवण्यासाठी सिद्धरामय्या यांनीही यादी तयार केली आहे. हायकमांडसमोर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. आपल्या कारकीर्दीत मंत्रिपदावर असलेल्या प्रत्येकांना नव्या सरकारमध्ये संधी मिळावी, या मागणीवर सिद्धरामय्या अडून बसले आहेत. गुरुवारी नवी दिल्लीत काँग्रेस वरिष्ठांच्या उपस्थितीत बैठकही झाली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शुक्रवारी डेहराडूनमध्ये होणाऱ्या रॅलीत सहभागी होणार आहेत. त्याआधीच कर्नाटकाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Advertisement

एकीकडे मंत्रिमंडळ विस्तारासाठी नवी दिल्लीत वरिष्ठांच्या बैठका सुरू आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष सुरू होणार याची अटकळ होतीच. कारण, आजवर दक्षिणेतील वक्कलिग समाजावर आपल्याच घराण्याची पकड आहे, यापुढेही ती कायम रहावी यासाठी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा व केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांची धडपड सुरू आहे. मुख्यमंत्रिपदाची धुरा आपल्या खांद्यावर आल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी आपल्या समाजावरील आपली पकड अधिक घट्ट करण्याचे काम हाती घेतले आहे. या संघर्षातूनच कर्नाटकात नव्या संघर्षाने उचल खाल्ली आहे. बिडदी टाऊनशिपवरून शिवकुमार व कुमारस्वामी हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

बिडदी टाऊनशिपला भाजप-निजद युतीचा विरोध आहे. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी मोजणी करणाऱ्यांना अडवले म्हणून या शेतकऱ्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांवर दाखल झालेला एफआयआर मागे घ्या. नहून विधानसौधच्या आवारातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आपण धरणे धरू, असा इशारा माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी दिला आहे. देवेगौडा व कुमारस्वामी यांच्या वक्तव्याला शिवकुमार यांनीही तितक्याच ताकदीने उत्तर दिले आहे. आपल्याला पुन्हा कारागृहात पाठवण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. आपण कारागृहात राहूनच मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचलो आहोत. आपली कळ काढाल तर याद राखा, अशा शब्दात शिवकुमार यांनी कुमारस्वामी यांना आव्हान दिले आहे. खरेतर ही योजना कुमारस्वामी मुख्यमंत्री असताना सुरू झाली. त्यांच्याच काळात ती बारगळली. आता डी. के. शिवकुमार यांच्या कारकीर्दीत या योजनेला पुन्हा चालना मिळाली आहे.

वारंवार आपण कारागृहाला जाऊन आलो आहोत, असे मुख्यमंत्री सांगत असतात. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात कारावास भोगला आहे का? त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी पापभावना दिसून येतात. सत्ता कायमची नाही, सर्व काही काळ ठरवत असतो. मुख्यमंत्रिपदावर राहण्याची एक चांगली संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करा, असे सांगतानाच टाऊनशिपच्या नावाने शेतकऱ्यांवर अन्याय करू नका, असा सल्ला कुमारस्वामी यांनी दिला आहे. बिडदी टाऊनशिपचा मुद्दा येथेच संपेल, असे वाटत नाही. याच मुद्द्याचा वापर करीत भाजप-निजद युतीतील नेत्यांनी काँग्रेस सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवसापासून सावध पावले उचलणाऱ्या डी. के. शिवकुमार यांनीही विरोधकांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे.

एकीकडे विरोधकांवर हल्लाबोल करतानाच आपल्याला पुन्हा कारागृहात पाठवण्यासाठी षड्यंत्र केले जात आहे, असा आरोप करीत डी. के. शिवकुमार यांनी बचावात्मक खेळी खेळली आहे. शिवकुमार व कुमारस्वामी हे दोघे वक्कलिग समाजाचे नेते आहेत. आता समाजावर पकड कोणाची राहणार, या एकाच मुद्द्यावर बिडदी टाऊनशिपच्या निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एखाद्या जुन्या प्रकरणात डी. के. शिवकुमार यांना पुन्हा कारागृहात पाठवण्याची योजना सुरू आहे, याची भीती मुख्यमंत्र्यांना आहेच. राजकीय वर्तुळातही त्याची चर्चा सुरू आहे. आपण मुख्यमंत्री झालो, हे त्यांना बघवत नाही. म्हणून आपल्या विरुद्ध षड्यंत्र रचले आहे. आपण श्रीकृष्ण जन्मस्थानावर राहूनच इथपर्यंत पोहोचलो आहोत. आपल्याला पुन्हा तेथे पाठवायचे असेल तर तुमचे प्रयत्न सुरू राहू द्यात, अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर हा संघर्ष आणखी वाढणार आहे. कारण, निजदला दक्षिणेतील पाया घट्ट ठेवायचा आहे.

रमेश हिरेमठ

Advertisement
Tags :

.