For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिहार निवडणूक निकालामुळे सिद्धरामय्यांची खुर्ची शाबूत?

12:36 PM Nov 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
बिहार निवडणूक निकालामुळे सिद्धरामय्यांची खुर्ची शाबूत
Advertisement

‘नोव्हेंबर क्रांती’चा मुद्दा मागे पडण्याची शक्यता : शिवकुमारांच्या भूमिकेवर लक्ष

Advertisement

बेंगळूर : बिहार विधानसभा निवडणूक निकालाने महागठबंधनला मोठा धक्का बसला आहे. मतचोरीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारसह निवडणूक आयोगावर थेट आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी आता मौन बाळगले आहे. राज्यात मुख्यमंत्री बदल, अतिरिक्त उपमुख्यमंत्री नेमण्याच्या मागणीसह दिल्लीतील वरिष्ठांच्या भेटीसाठी प्रयत्न करणारे नेते आता गप्प झाले आहेत. त्यामुळे नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्रिपदाची अडीच वर्षे पूर्ण करणाऱ्या सिद्धरामय्या यांना बिहारचा निकाल वरदान असल्याचे मानले जात आहे. 2028 पर्यंत त्यांचे मुख्यमंत्रिपद शाबूत राहण्याची शक्यता आहे.

बिहार निवडणूक निकालानंतर राज्य राजकारणात मोठे बदल होतील, अशी चर्चा होती. ‘नोव्हेंबर क्रांती’वरही अनेकांनी उघडपणे प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र, बिहार निवडणुकीत पक्षला दणका बसल्याने राज्य काँग्रेसमधील नेतृत्व बदलासह मुख्यमंत्री बदलाचा मुद्दाही मागे पडण्याची शक्यता आहे. साहजिकच याचा लाभ सिद्धरामय्या यांना होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना करून आपल्या समर्थक आमदारांना मंत्रिपदे मिळवून देण्याची संधी सिद्धरामय्यांना प्राप्त झाली आहे. 2013 च्या विधानसभा निवडणुकीवेळीही सिद्धरामय्या यांनी पक्षातील विरोधकांना आपल्या पद्धतीने नियंत्रित केले होते.

Advertisement

आताही तशीच परिस्थिती आहे. सुरुवातीपासूनच बिहार निवडणूक निकालाचा राज्य राजकारणावर परिणाम होईल, असे गणित मांडले जात होते. बिहार निवडणुकीतील निकालावर विचारविमर्श करण्यात काँग्रेस वरिष्ठ नेते गुंतले आहेत. त्यामुळे त्यांनी सद्यस्थितीत कोणत्याही नेत्याने भेटीसाठी दिल्लीत येऊ नये, अशी ताकीद दिल्याचे समजते. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी करत असलेले उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे सध्या तटस्थ आहेत. ते पुढे कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.