कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राहुल पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित ?

11:10 AM May 10, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / कृष्णात चौगले :

Advertisement

राजकीय आयुष्यात अखेरच्या श्वासापर्यंत ‘काँग्रेस’सोबत एकनिष्ठ राहिलेले दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. पी.एन.पाटील यांचा प्रथम स्मृतीदिन 23 मे रोजी आहे. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशासाठी मुहूर्त निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. भोगावती साखर कारखान्याच्या आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी राहुल पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा असली तरी त्यामध्ये अनेक राजकीय कंगोरे दडले आहेत. भाजप प्रवेशासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची मते आजमावली असून बहुसंख्य कार्यकर्त्यांनी त्यांना ग्रीन सिग्नल दिला असल्याचे समजते.

Advertisement

काँग्रेससोबत निष्ठावंत असलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजपकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर राहुल पाटील त्यांचे राजकीय वारसदार ठरले. काँग्रेसकडून करवीर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार चंद्रदीप नरके यांच्याविरोधात त्यांनी निकराची झुंज दिली. पण त्यांचा काठावरचा पराभव झाला. भोगावती शिक्षण मंडळ, भोगावती सहकारी साखर कारखाना, गोकुळ दूध संघ, कोल्हापूर जिल्हा बँक, सूतगिरण यासह अनेक सहकारी संस्थांमध्ये पाटील गटाचा दबदबा आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या भोगावती साखर कारखान्यासह अन्य संस्था जिवंत ठेवण्यासाठी राहुल पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.

राहुल पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबतची चर्चा काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांपर्यंतही पोहोचली आहे. मात्र, ते असा कोणताही निर्णय घेणार नाहीत असे त्यांचे ठाम मत आहे. पण करवीर विधानसभा मतदारसंघातील आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन राहुल यांनी भाजप प्रवेशाबाबत त्यांची मते आजमावली आहेत. यामध्ये काही कार्यकर्त्यांनी दिवंगत नेते पी.एन.पाटील यांच्या राजकीय वाटचालीचा दाखला देत भाजपमध्ये जाण्यास विरोध केला. पण पाटील गटाकडे असणाऱ्या सहकारी संस्था आर्थिक उर्जितावस्थेत ठेवायच्या असतील, त्यांना सरकारचे बळ मिळवायचे असेल तर भाजपमध्ये जाण्यास हरकत नसल्याचे बहुसंख्य कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे राहुल यांच्या भाजपप्रवेशाचा निर्णय जवळपास पक्का झाला असून पी.एन.पाटील यांच्या स्मृती दिनानंतर म्हणजेच 23 मे नंतरचा मुहूर्त साधला जाणार असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती मजबूत करण्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार, पदाधिकारी, आणि कार्यकर्त्यांवर महायुतीने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांना महायुतीत घेण्यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत. यातूनच करवीर विधानसभा मतदारसंघात भाजपला बळकटी देण्यासाठी राहुल पाटील यांना पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गेली अनेक वर्षे पाटील गट हा काँग्रेससोबत निष्ठावंत म्हणून ओळखला जातो. अनेकदा मंत्रिपदावेळीही दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांना डावलले गेले. तरीही ते काँग्रेससोबत एकनिष्ठ राहिले. राहुल पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत सुमारे दोन हजार मतांनी पराभव झाला असला तरी करवीर विधानसभा मतदारसंघात त्यांचा प्रबळ गट कायम आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. जि..निवडणुकीचा विचार केल्यास करवीर तालुक्यात सर्वाधिक 11 जि..गट आहेत. गतनिवडणुकीत त्यापैकी बहुतांशी गटावर दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांच्या गटाची सत्ता होती. त्यामुळे राहुल पाटील यांचा भाजप प्रवेश केल्यास जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा करण्यासाठी आणखी बळ मिळणार आहे. परिणामी काँग्रेस पक्षाला त्याचा मोठा फटका बसणार आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article