युद्ध थांबण्याची शक्यता?
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धामुळे साऱ्या जगाची पाचावर धारण बसली आहे. जागतिक व्यापार व्यवस्थेचे ‘रक्त’ समजले जाणारे कच्चे इंधन तेल या युद्धामुळे प्रचंड महाग झाले आहे. तसेच त्याचा पुरवठाही खंडित आणि विस्कळीत झाला आहे. अनेक देशांमध्ये पेट्रोलचे आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. त्यामुळे वाहतूक महाग झाल्याने अन्य वस्तूंचे दरही वाढण्याची दाट शक्यता आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा साखळ्या तुटण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे जगाची अर्थव्यवस्था घसरणीला लागेल आणि मोठ्या प्रमाणात मंदी निर्माण होईल, याचे संकेत स्पष्टपणे मिळत आहेत. अशा स्थितीत सर्व जगाचीच इच्छा हे युद्ध लवकरात लवकर थांबावे, अशी असणार, यात शंका नाही. तथापि, हे युद्ध आता अमेरिका आणि इराण यांच्यातील प्रतिष्ठेचा विषय बनल्याने प्रथम कोण मागे सरणार, हा प्रश्न आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाचीही स्थिती अशीच आहे. ते गेली चार वर्षे चाललेले आहे आणि प्रतिष्ठेचा विषय बनल्याने ‘आधी कोण थांबणार’ हीच स्थिती आहे. इराणमध्ये आता हल्ला करण्यासारखे काही उरलेले नाही, असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केले असून हे युद्ध लवकरच थांबेल, अशी स्पष्टोक्तीही केली. खरे, तर इतके स्पष्ट संकेत मिळाल्यानंतर इराणनेही सकारात्मक प्रतिसाद द्यावयास हवा होता. तथापि, तो देश आजही आपल्या शेजारच्या सुन्नी मुस्लीम राष्ट्रांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करीत आहेच. त्यामुळे हे छोटे देश भयभीत झाले आहेत. या देशांवर इराण का हल्ले करीत आहे, हे अनाकलनीय आहे. कारण या देशांनी इराणवर हल्ले केलेले नाहीत. तसेच हे देश अमेरिकेच्या बाजूने युद्धात उतरलेलेही नाहीत. इराणने युद्ध थांबविण्यासाठी तीन अटीही घातल्या आहेत, अशी माहिती आहे. इराणच्या वैध अधिकारांचे संरक्षण झाले पाहिजे, युद्धामुळे इराणची हानी झाली आहे, ती भरुन दिली पाहिजे आणि भविष्यात असे हल्ले इराणवर होणार नाहीत, याची शाश्वती मिळाली पाहिजे, अशा या अटी आहेत. इराणचे वैध अधिकार म्हणजे नेमके कुठले, हे स्पष्ट झालेले नाही. हानीचा प्रश्न आला, तर इराणनेही युद्धात नसलेल्या देशांची हानी केलेलीच आहे. ती इराणने भरुन द्यावी, अशी मागणी त्या देशांनी केल्यास त्याला इराण राजी आहे काय, हे स्पष्ट नाही. भविष्यात असे हल्ले होणार नाहीत, याची शाश्वती इराणला कोणाकडून हवी आहे, हे देखील अस्पष्टच आहे. अशा प्रकारे या तीन्ही अटी संदिग्ध असल्याचे दिसून येते. त्यामुळे, त्यांचे नेमके स्वरुप जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत त्या मान्य होण्याची शक्यता कमी दिसते. इराणने बुधवारी आणि गुरुवारी पुन्हा शेजारच्या देशांवर हल्ले केल्याने ब्रेंट क्रूड तेलाचे दर, जे 110 डॉलर्सवरुन 90 डॉलर्सवर आले होते, ते पुन्हा 100 डॉलर्सवर पोहचले आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचे, म्हणजे युद्ध थांबण्यासंदर्भात अनिश्चितता निर्माण झाली आहे. ही स्थिती चांगली नाही, हे इराणनेही लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. इराण स्वत: अमेरिकेवर हल्ले करु शकत नाही. कारण तितक्या दूरच्या पल्ल्याची क्षेपणास्त्रे त्याच्याकडे नाहीत. त्यामुळे त्याने आजूबाजूच्या देशांवर राग काढण्याचे धोरण अवलंबिलेले दिसून येते. भारत आणि इराण यांचे संबंध चांगले आहेत. गुरुवारी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, एस. जयशंकर यांनी इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर, भारतासाठी तेल घेऊन येणाऱ्या काही नौका हार्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतापर्यंत पोहचल्याचे वृत्त आहे. ही सकारात्मक घटना असली, तरी मुळात हे युद्ध थांबणे, हाच सर्वोत्तम आणि सुस्थिरता आणणारा उपाय आहे. त्यामुळे या युद्धाच्या दोन्ही बाजूंनी जगाची स्थिती लक्षात घेऊन युद्ध आवरते घ्यावे, हे आवाहन साऱ्या जगाकडून त्यांना केले जात आहे. त्याचा त्यांनी गंभीरपणे विचार करावा. कारण, हे युद्ध लांबणे हे जसे जगासाठी विनाशकारी ठरेल, तसेच ते या दोन्ही बाजूंसाठीही घातकच ठरणार आहे. आज जगातल्या प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था एकमेकांमध्ये गुंतली आहे. परिणामी, एखाद्या देशाकडून दूर अंतरावर युद्धाचा प्रारंभ झाला, तरीही त्या देशाला त्याची झळ, त्याची काहीही चूक नसताना पोहचते. कित्येकदा प्रत्यक्ष युद्धात सहभागी असणाऱ्या देशांपेक्षाही सहभागी नसणाऱ्या देशांना अधिक झळ पोहचते. हा ‘पॅसिव्ह स्मोकिंग’सारखा प्रकार असतो. तेव्हा आता सर्वांनीच अधिक समंजसपणे धोरणे ठरवून आपल्यातील मतभेद दूर करुन जगाला दिलासा देण्याची आवश्यकता आहे. युद्ध करणाऱ्या देशांना त्यांच्या उत्तरदायित्वाची जाणीव करुन देण्यात आली पाहिजे. यासाठी, जे देश युद्धात नाहीत पण ज्यांना झळ पोहचत आहे, त्यांनी एकत्र येऊन एक आघाडी स्थापन करण्याची आवश्यकता आहे. तेलाचा अणि गॅसचा पुरवठा प्रत्येक देशाला सुरळीत व्हावा, म्हणून नवे तेलमार्ग आणि नव्या पुरवठा साखळ्या स्थापन करण्यात आल्या पाहिजेत. तेल पुरवठा करण्यासाठी एकाच मार्गावर अवलंबून राहणे किती चुकीचे ठरु शकते, ते गेल्या 10-12 दिवसांमध्ये दिसून आले. भविष्य काळातही मध्यपूर्वेत युद्धे होणारच नाहीत आणि अशी स्थिती पुन्हा निर्माण होणारच नाही, असे मुळीच नाही. त्यामुळे भविष्यासाठी उपाययोजना आतापासूनच करावयास हवी. भारताने गेल्या 10 वर्षांमध्ये यासंबंधात सूज्ञ धोरण अवलंबिलेले आहे. भारताला आपल्या आवश्यकतेच्या 85 टक्के तेल आणि 90 टक्के गॅस आयात करावा लागतो. ही स्थिती लक्षात घेऊन भारताने पन्नास ते साठ देशांशी तेलपुरवठ्याचे करार केले आहेत. त्यामुळे काही देशांकडून होणारा पुरवठा काही कारणांमुळे खंडित झाला, तरी एकदम घबराटीची स्थिती निर्माण होत नाही. भारताने आपल्या तेलसाठ्याच्या क्षमतेतही गेल्या 11 वर्षांमध्ये आठ ते नऊ पट वाढ केली आहे. सध्या भारताजवळ 80 ते 90 दिवस पुरेल इतका तेलसाठा असल्याचे सांगितले जाते. या दूरदृष्टीच्या धोरणाचा टंचाईच्या काळात निश्चितच लाभ होतो. म्हणून भारतात स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढले असले तरी पेट्रोल आणि डिझेलचे दर निदान अद्यापतरी वाढलेले नाहीत. पण युद्ध लवकर न थांबल्यास या दरांवरही दबाव येणार हे निश्चितच आहे. तेव्हा सध्या युद्ध थांबण्याची जी शक्यता दृष्टीपथात आली आहे, तिला बळ मिळावे आणि अंतिमत: हे युद्ध लवकरात लवकर थांबावे, हाच खरा उपाय आहे.