For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅनडाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व धोक्यात?

06:17 AM Jan 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
कॅनडाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व धोक्यात
Advertisement

‘अमेरिका फॉर अमेरिकन्स’ या घोषणेवर प्रचारात भर देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता ‘कॅनडा फॉर अमेरिका’ या विचाराने पुरते पछाडलेले दिसतात. सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांचा शपथ ग्रहण सोहळा संपन्न होईल. तथापि, लोकानुययी विस्फोटक घोषणा करण्यात तरबेज असलेल्या ट्रम्प यांनी शेजारी असलेल्या कॅनडा या स्वतंत्र व सार्वभैम देशास अमेरिकेचे डावे राज्य बनवण्याचे इरादे शपथविधी पूर्वीच बोलून दाखवत एकच खळबळ माजवली आहे.

Advertisement

काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडीया अकाऊंटवर दोन नकाशे पाठवले. त्यापैकी एकात कॅनडाच्या नकाशावर युनायटेड स्टेटस् लिहिले आहे. तर कॅनडाच्या दुसऱ्या नकाशावर अमेरिकेचा ध्वज दाखवला आहे. अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ट्रम्प यांनी कॅनडातून आयात होणाऱ्या उत्पादनावर 25 टक्के आयात शुल्क आकारण्याची घोषणा केली होती.

या आकस्मिक व एकतर्फी निर्णयावर चर्चा करण्यासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टूडो डिसेंबरमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले. फ्लोरिडातील ट्रम्प यांच्या निवासस्थानी उभयतात चर्चा व भोजन कार्यक्रम झाला. याप्रसंगी ट्रूडोना अनपेक्षीतपणे कॅनडास अमेरिकेत विलीन करण्याचा प्रस्ताव ट्रम्प यांनी दिला. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना ट्रम्पनी पंतप्रधान टूडो यांचा उल्लेख कॅनडाचे राज्यपाल असा केला. या खोडसाळपणाचे तीव्र पडसाद कॅनडासह इतरत्र उमटले. यानंतर कॅनडा-अमेरिका यांच्यातील कृत्रिमरित्या रेखाटलेली सीमारेषा दूर केल्यास राष्ट्रीय सुरक्षा भक्कम होऊन अधिक आर्थिक विकास होऊ शकतो असे प्रतिपादन ट्रम्प यांनी केले.

Advertisement

कॅनडावर ताबा मिळविण्यासाठी सैन्य बळाचा वापर करणार नाही, आर्थिक बळाचा वापर करू असे ट्रम्प यांचे म्हणणे असले तरी, ते नेमके काय करतील याची शाश्वती कोणीच देऊ शकणार नाही. हे जाणणाऱ्या कॅनेडियन नेत्यांनी ट्रम्प यांच्या बेलगाम दर्पोक्तिचा तीव्र शब्दात धिक्कार केला आहे. जस्टिन ट्रूडो यांना ट्रम्प यांचा विलीनीकरणाचा प्रस्ताव फेटाळताना, कॅनडा हा स्वतंत्र व सार्वभौम देश  आहे तो अमेरिकेचा भाग होण्याची तीळमात्र शक्यता नाही असे विधान केले. कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जोली यांनी ट्रम्पना कॅनडाच्या स्वातंत्र्य व सामर्थ्यांची पुरेशी जाणीव नाही. त्यांच्या धमक्यांना आपला देश भीक घालणार नाही म्हणत निषेध नोंदवला.

कॅनडातील विरोधी पक्ष नेते पियर पॉलिवेयर यांनी, अमेरिका हा कॅनडाचा चांगला मित्र असला तरी हा स्वतंत्र व महान देश आपले सार्वभौमत्व गमावणार नाही अशी प्रतिक्रिया दिली. नुकतीच ट्रम्प यांच्या विलीनीकरण प्रस्तावावर कॅनडात जनमत चाचणी घेण्यात आली. त्यात असे दिसून आले की, कॅनडा अमेरिकेत विलीन होण्याची संकल्पना कॅनेडियन नागरिकांनी बहुमतांनी नाकारली आहे. कॅनडा अमेरिकेचे 51 वे राज्य बनण्यास 82 टक्के नागरिकांचा विरोध आहे. तर केवळ 13 टक्के लोकांनी विलीनीकरणास संमती दर्शविली आहे. यावरुन केवळ देशातील राजकीय नेतेच नव्हे तर जनता देखील ट्रम्प यांच्या विस्तारवादाविरोधात आहे हे स्पष्ट होते.

ट्रम्प कितीही म्हणत असले तरी, कॅनडास अमेरिकेस जोडण्याचे प्रयत्न इतिहासात वारंवार अयशस्वी झाल्याचे दिसते. 19 व्या शतकात अमेरिकन ‘मॅनिफेस्ट डेस्टिनी’ या लोकप्रिय धारणेनुसार देश म्हणून अमेरिकेने, अमेरिका खंडाच्या उत्तर भागात विस्तारून समृद्ध होणे हे विधीलिखीतच आहे असे मानले गेले. या नियतीरूपी संकेतास प्रमाण मानून कॅनडाचा भू-प्रदेश अमेरिकेस जोडण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. 1812 साली अमेरिकेने कॅनडावर केलेले आक्रमण तत्कालीन ब्रिटीश राजवटीने परतवून लावले. त्यापूर्वी कॅनडाच्या क्युबेक प्रांतावरील आक्रमणही अयशस्वी ठरले. याचप्रमाणे गेल्या शतकात कॅनडाकडून अमेरिकेशी अधिक जवळीक साधण्याचे प्रयत्न देखील नागरिकांनी नाकारल्याचे निदर्शनास येते. 1910 साली कॅनडाचे पंतप्रधान विल्फ्रिड लॉरियर यांच्या अमेरिकेशी जकात करार करण्याच्या प्रयत्नास इतका लोकविरोध झाला की, त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांचा दारूण पराभव झाला. 1980 च्या दशकात कॅनडाचे पंतप्रधान ब्रायन मुलरोनी यांनी कॅनडा-अमेरिका मुक्त व्यापार करार केला. परंतु या करारास नागरिकांचा मोठा विरोध झाला. तथापि, हा सारा इतिहास व वास्तव नजरेआड करीत, आजही ट्रम्प महाशय कॅनडा अमेरिकेत सामील झाला तर कॅनेडियन लोकांना आनंद होईल म्हणताहेत ही त्यांच्या खोटेपणाची खरी कमालच म्हणावी लागेल. काही निरीक्षकांच्या मते, ट्रम्प यांचा कॅनडावर दावा ही केवळ दबावतंत्राचा वापर करून कॅनडाकडून अधिक लाभ पदरी पाडून घेण्यासाठीची खेळी आहे. ही शक्यता पूर्णत: नाकारता येत नसली तरी या ट्रम्प तंत्रामागे अधिक उपद्रवकारक असे काही दडले असण्याच्या शक्यताही जाणवतात. सुमारे पावणेचार कोटी लोकसंख्या असलेला कॅनडा ब्रिटिश अंमलातून 1867 साली स्वतंत्र झालेला देश आहे. इतर तीन दिशांनी महासागराने वेढलेला हा देश दक्षिणेस अमेरिकेशी जोडला गेला आहे. दक्षिणेस कॅनडा व अमेरिकास विभागणारी 8,891 किलोमीटरची सीमारेषा जगातील कोणत्याही दोन देशांना विभागणारी सर्वात लांब सीमारेषा मानली जाते. जगातील अतीश्रीमंत देशांच्या यादीत कॅनडा पहिल्या दहात समाविष्ट आहे. क्षेत्रफळात जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेला हा देश जगात विरळ लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे.

कॅनडाच्या विलीनीकरणासाठी कॅनडाबरोबर व्यापारात होणारी तूट, या देशाच्या संरक्षणासाठी होणारा 200 अब्ज डॉलर्सचा खर्च, तेथून होणारी  स्थलांतरे, अंमली पदार्थांची तस्करी अशी नानाविध कारणे ट्रम्प पटलावर आणत आहेत. परंतु त्यांचे अंतस्थ हेतू काही वेगळेच दिसतात. बहूध्रुविय होणाऱ्या जगाचा कल आता बऱ्यापैकी आशियाकडे झुकताना दिसत आहे. अमेरिका प्रणित राजकारण, अर्थकारणाचे वर्चस्व डळमळीत होत चालले आहे. चीनी महासत्तेशी कडवी स्पर्धा करणाऱ्या अमेरिकेस निर्विवाद वर्चस्वाकडे घेऊन जाण्याचा मनसुबा ट्रम्प यांनी अनेकदा उघड केला आहे. दुसरीकडे व्यापारासाठी महत्वपूर्ण अशा दक्षिण चीनी समुद्रावर चीनने बऱ्यापैकी पकड बसवली आहे. तैवान, हाँगकाँग आणि आसपासच्या देशातील भू-प्रदेशांवर व संसाधनांवर ताबा मिळवण्यासाठीच्या चीनी कारवाया गतीमान झाल्या आहेत.

चीनच्या जगात सर्वसामार्थ्यशाली बनण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. ट्रम्प यांचा कॅनडाच्या विलिनीकरणाचा आग्रह याचप्रमाणे चीनशी साधर्म्य साधणारा ठरतो. कॅनडा जर अमेरिकेत विलिन झाला तर संपूर्ण दक्षिण अमेरिका खंडाइतका अथवा पूर्वीच्या सोव्हिएत युनियनप्रमाणे विस्तृत भू-प्रदेश अमेरिकेचा भाग बनेल. शिवाय कॅनडासारखा समृद्ध देश अमेरिकेस मिळाल्याने आर्थिक व ऊर्जा क्षेत्रात चीनला मागे टाकणारे सत्ता केंद्र म्हणून अमेरिकेचा नव्याने उदय होईल.

एकंदरीत इतर देश व संसाधने गिळंकृत करू पाहणारे चीनचे शी जिनपिंग, क्रिमियाचा घास घेऊन युक्रेन ताब्यात घेऊ पाहणारे रशियाचे ब्लादिमीर पुतिन, गाझापट्टी व पॅलेस्टाईनवर कब्जा मिळवण्याच्या प्रयत्नात असलेले इस्त्रायलचे नेतान्याहू या सत्ताधिशांच्या मांदियाळीत आता केवळ कॅनडाच नाही तर ग्रीनलँड व पनामा देखील अमेरिकेस हवा म्हणणाऱ्या ट्रम्प यांची भर पडली आहे. आधुनिक काळात पुन्हा एकदा साम्राज्यवादी, विस्तारवादी प्रवृत्ती डोके वर काढीत असल्याचे हे लक्षण आहे. यामुळे जागतिक अशांतता व तिसऱ्या महायुद्धाच्या शक्यता बळावल्या आहेत.

-अनिल आजगांवकर

Advertisement
Tags :

.