बळ्ळारीची वाटचाल रायलसीमाच्या दिशेने?
जनार्दन रेड्डी कारागृहात गेल्यानंतर सूर्यनारायण रेड्डी यांचे चिरंजीव भरत रेड्डी बळ्ळारीचे आमदार झाले. विधानसभेत सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रिपब्लिक बळ्ळारीतील जनार्दन रेड्डी यांचा दबदबा मोडून काढण्यासाठी शड्डू ठोकला होता. बेंगळूरहून बळ्ळारीपर्यंत पदयात्राही काढली होती. तेव्हा कोठे जनार्दन रेड्डीचा दबदबा थोडा कमी झाला होता. बळ्ळारीच्या राजकारणाला अशी पार्श्वभूमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने बळ्ळारीतील प्रवेश बंदी उठवल्याने आता जनार्दन रेड्डीचा ओढा बळ्ळारींकडे वाढला आहे.
रक्तरंजित राजकारणामुळे आंध्रप्रदेशमधील रायलसीमा एकेकाळी ठळक चर्चेत होती. आंध्रच्या सीमेवरच असलेल्या बळ्ळारीवरही रायलसीमाच्या राजकारणाचा पगडा आहे. गेल्या आठवड्यात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बळ्ळारीत राजकीय दंगल घडली आहे. आमदार नारा सतीश रेड्डी व माजी मंत्री जनार्दन रेड्डी व त्यांचे समर्थक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला आहे. खासगी गनमॅननी केलेल्या गोळीबारात राजशेखर रेड्डी(वय 25) या काँग्रेस कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. बऱ्याच काळानंतर बळ्ळारीच्या राजकारणाने उचल खाल्ली आहे. एकमेकांना संपवण्यासाठी दंगली घडविल्या जात आहेत. सध्या या मुद्द्यावर सत्ताधारी काँग्रेस व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. बळ्ळारीचे पालकमंत्री बी. झेड्. जमीरअहमद यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या आपल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये भरपाई दिली आहे.
1 जानेवारी 2026 रोजी सर्वत्र नववर्षाच्या स्वागतासाठीचा जल्लोष सुरू होता. तर बळ्ळारीत माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांच्या घरासमोर दंगल सुरू होती. एच. डी. कुमारस्वामी व बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारच्या स्थापनेसाठी जनार्दन रेड्डी आघाडीवर होते. सोनिया गांधी यांनी बळ्ळारीतून निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांच्यासमोर भाजपने कै. सुषमा स्वराज्य यांची उमेदवारी जाहीर केली. सुषमा स्वराज्य यांच्या पाठीशी जनार्दन रेड्डी व बी. श्रीरामुलू ही जोडी ठामपणे उभी होती. एकेकाळी त्यांचा मोठा दबदबा होता. खाण घोटाळ्यात अटक झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बळ्ळारीत प्रवेशबंदी केली. आंध्रप्रदेशमधील चंचलगुड कारागृहात काही वर्षे घालवावी लागली. जामीन मिळाल्यानंतरही बळ्ळारीला जाता आले नाही. एकीकडे तपास यंत्रणांचा ससेमिरा दुसरीकडे न्यायालयीन लढा, आदींमुळे जनार्दन रेड्डी त्रस्त झाले होते. शेवटी गंगावतीमध्ये नशीब आजमावून ते आमदार झाले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावरील बंदी उठवल्यानंतर आता बळ्ळारीत त्यांचे येणे-जाणे सुरू झाले.
एकेकाळचा जीवलग मित्र बी. श्रीरामुलू यांच्याबरोबरही वितुष्ट निर्माण झाले होते. आता दोघे पुन्हा एक झाले आहेत. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी नवा पक्षही सुरू केला. शेवटी आपला पक्ष भाजपमध्ये त्यांनी विलीन केला. जनार्दन रेड्डी यांचा दबदबा सुरू होण्याआधी नारा भरत रेड्डी यांचे वडील सूर्यनारायण रेड्डी हे बळ्ळारीचे आमदार होते. त्यांना मागे टाकून जनार्दन रेड्डी, बंधू करुणाकर रेड्डी, सोमशेखर रेड्डी ही तिन्ही भावंडे आमदार झाली. नंतर भाऊबंदकीही उफाळून आली. जनार्दन रेड्डी कारागृहात गेल्यानंतर सूर्यनारायण रेड्डी यांचे चिरंजीव भरत रेड्डी बळ्ळारीचे आमदार झाले. विधानसभेत सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रिपब्लिक बळ्ळारीतील जनार्दन रेड्डी यांचा दबदबा मोडून काढण्यासाठी शड्डू ठोकला होता. बेंगळूरहून बळ्ळारीपर्यंत पदयात्राही काढली होती. तेव्हा कोठे जनार्दन रेड्डीचा दबदबा थोडा कमी झाला होता. बळ्ळारीच्या राजकारणाला अशी पार्श्वभूमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने बळ्ळारीतील प्रवेश बंदी उठवल्याने आता जनार्दन रेड्डीचा ओढा बळ्ळारींकडे वाढला आहे.
गेल्या 30 वर्षांपासून सुरू असलेले राजकीय वैर पुन्हा उफाळून आले आहे. 1 जानेवारी रोजी दंगल घडण्यासारखे काहीच कारण नव्हते. 3 जानेवारीला बळ्ळारीत महर्षी वाल्मिकींच्या पुतळ्याचे अनावरण होणार होते. याचे बॅनर सर्वत्र लावण्यात येत होते. जनार्दन रेड्डी यांच्या घरासमोर बॅनर लावण्यास आक्षेप घेण्यात आला. भरत रेड्डी यांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप धुडकावून बॅनर लावला. त्या दिवशी जनार्दन रेड्डी गंगावतीला गेले होते. सायंकाळी ते बळ्ळारीत परतल्यानंतर ठिणगी पडली. बी. श्रीरामुलू यांनी मध्यस्थी करून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना यश आले नाही. एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. बळ्ळारीतील बहुतेक राजकीय नेते व खाणसम्राटांना खासगी गनमॅन आहेत. काही जणांच्या जीवाला धोका असल्यामुळे सरकारनेही त्यांना सुरक्षारक्षक पुरवले आहेत. तर काही धनिकांनी बिहार, उत्तरप्रदेश, पंजाबमधील गनमॅनना आपल्यासोबत ठेवले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्याचा बळी घेणारी गोळी गनमॅनच्या बंदुकीतून सुटली आहे, हे स्पष्ट झाले आहे. आयपीएस अधिकारी पवन नेज्जूर हे 1 जानेवारी रोजीच जिल्हा पोलीसप्रमुखपदी रुजू झाले होते. दुपारी त्यांनी पदभार स्वीकारला. सायंकाळी दंगल घडली. दुसऱ्या दिवशी सरकारने त्यांना निलंबित केले.
ही कारवाईही वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. केंद्रीयमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी तर काँग्रेस नेत्यांना वाचवण्यासाठी सरकारने राजशेखर रेड्डीच्या मृतदेहावर दोन वेळा पोस्टमॉर्टेम केल्याचा आरोप केला आहे. सरकारने हा आरोप फेटाळला असला तरी रायलसीमाला लागूनच असलेल्या बळ्ळारीच्या रक्तरंजित राजकारणाला आणखी किती बळी हवेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रायलसीमामधील रक्तरंजित राजकारणावर मध्यंतरी ‘रक्तचरित्र’ हा सिनेमा आला. दोन भागातील सिनेमा बघताना अंगावर काटा यायचा. प्रत्यक्षात काय परिस्थिती असणार? याची कल्पनाच केलेली बरी. आंध्रप्रदेशमध्ये एकेकाळी माओवादी कार्यकर्त्यांचाही जोर होता. त्यामुळे बळ्ळारीवर नक्षलवादाचाही पगडा आहे. 1 जानेवारीच्या घटनेनंतर तर सरकारने बहुतेक नेत्यांच्या खासगी गनमॅनकडे असणारी शस्त्रs जप्त केली आहेत. दंगल सुरू असतानाच राजकीय नेत्यांनी प्रक्षोभक भाषा केली. आपल्याच पक्षाच्या आमदाराचे प्रक्षोभक वक्तव्य मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना रुचले नाही. काँग्रेसने माजी मंत्री एच. एम. रेवण्णा यांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक समिती बळ्ळारीला पाठवली आहे. काँग्रेस व भाजप नेते एकमेकांविरुद्ध आरोप करीत आहेत.
जनार्दन रेड्डी यांच्या खुनाचा कट होता. त्यामुळेच त्यांच्या घराच्या दिशेने गोळीबार करण्यात आल्याचा आरोप बी. श्रीरामुलू यांनी केला आहे. दंगल पूर्वनियोजित होती. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वाहनामध्ये पेट्रोल बॉम्ब व शस्त्र होती, असा आरोपही भाजप नेत्यांनी केला आहे. जनार्दन रेड्डी यांच्या घराच्या आवारात काठ्या सापडल्या आहेत. त्यामुळे ते दंगल घडवण्याच्या तयारीत होते, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. जनार्दन रेड्डीना बळ्ळारीत प्रवेश बंदी होती. त्यावेळी कधीही दंगल घडली नाही. बळ्ळारी शांत होती. आता त्यांच्या आगमनाने दंगली वाढल्या आहेत, असे सांगत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी नारा भरत रेड्डी यांची पाठराखण केली आहे. वेळीच बळ्ळारीतील दहशतीवर कारवाई झाली नाही तर रायलसीमा सारखीच रक्तरंजित राजकारणाला सुरुवात होणार, याचे संकेत आहेत.
-रमेश हिरेमठ